गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०

होम्या

Courtesy:Unsplash-Jonathan Kho

 होय....बरोबर वाचलंत तुम्ही."होम्या" हेच त्याचं नाव.आज तो वयाच्या पन्नाशीत तरी असावा.
पण तुम्हा- आम्हासारखा, तो वाढत्या वयानुसार'श्री..श्रीमान..राव..'झाला नाही.सर्वांसाठी तो आजही "होम्याचं"आहे.वीस-पंचेवीस वर्षांपूर्वी, मी पाहिलेला व आज दिसणारा "होम्या" यात म्हणाल तर, फक्त 'उन्नीस-बीसचा फरक'. याअर्थी "होम्या"देवानंद या सदाबहार अभिनेत्यापेक्षाही चिरतरुण..


Courtesy:Unsplash-Lakshya Jain

आई-वडील, भाऊ-बहीण,ही रक्ताची नाती एकेकाळी जपणारा,आज रस्त्याने दिसणाऱ्या प्रत्येकात 'माणूस' शोधत फिरत असतो. त्याने 
रक्ताची नाती अजूनही जपून ठेवलीत.. त्याच्या हृदयाच्या बंदिस्त कप्प्यात..म्हणून कधी-कधी त्याची पावलं आपसूक वळतात,घराच्या दिशेने..इतर वेळी मात्र, "हे विश्वची माझे घर "असाच असतो त्याचा मुक्तसंचार....


Courtesy:Unsplash-Shail Sharma

सर्वसामान्यांसारखं, शिकावं, नोकरी-धंदा करावा, लग्न करून संसार थाटावा, असं चौकटीबद्ध आयुष्य कदाचित त्याच्या प्राक्तनी नसावं..म्हणून,'ऊन,वारा,पाऊस,थंडी'कशाचीही तमा न बाळगता,तो वर्षभर मोकळ्या आकाशाखाली बिनधास्तपणे वावरतअसतो.
गावातील कुत्र्यांशी त्याचं जिवाभावाचं मैत्र.अंधारात फिरताना,'साप,विंचू'त्याला चावतील तर मजाल..दिवसाच्या उजेडापेक्षा रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधाराशी त्याची खास दोस्ती..


Courtesy:Unsplash-Dynamic Wang

गावातलं,शेंबडं पोरंही तुम्हाला त्याची ओळख हिरहिरीने सांगेल,एवढी त्याची ख्याती.. लहान मुलं झोपत नसतील,तर "होम्या"येईल,झोप लवकर,जणू "होम्या"म्हणजे, शोले चित्रपटातला  गब्बर असल्यासारखा,त्याचा 'धाक' दाखवून लहान मुलांना झोपविणाऱ्या 'आया'गावात कमी नाहीत.अख्ख्या आयुष्यात, साधा मच्छरही न मारणाऱ्या "होम्याचं"नाव ऐकून लहान मुलं झोपतातचं कसे??हे मला कधीही न उलघडलेलं कोडं आहे.


Courtesy:Unsplash-Patric Hendry

हिमालयात न जाता,कुठलीही तपस्या-तप,न करता,विरक्त,आयुष्य जगणारा,"होम्या" एखाद्या 'योग्यापेक्षा'मला कमी भासत नाही.कारण, त्याला ना कशाचा मोह, ना कुठली अभिलाषा. त्याला कुणी हिणवल्यास,झिडकारल्यास,रागावतो तो काहीवेळेस..पण लगेच विसरूनही जातो.मानापमान,अहंकार,छद्मीपणा,या गोष्टी त्याच्यापासून कोसो दूर..त्याचा स्वतःचीच सुरू आहे मुक्तसंवाद ...वर्षानुवर्षे..तरी,कधीकाळी, हरवलेला "होमराज"अजूनही "होम्याला" गवसला नाही,हेही तितकंच खरं.. 


Courtesy:Unsplash-Parij Borgohain

गावात वाटलं त्या,घरी जावं,कुणी भाकरतुकडा दिला,तर तो खाऊन पुढची वाट धरावी.. 
चहाच्या टपरीजवळ किंवा पानटपरीवर तासनतास उगाचंच बसावं.. मग,कुणाला दया आल्यास,मिळतो त्याला घोटभर चहा व खर्रा.एवढीच काय ती त्याची चंगळ.इतरांचं अनुकरण करत,तोही चघळत बसतो, खर्रा बराचवेळ. त्यामुळं,मिळतं त्याला काही वेळापूरतं समाधान..आपणही'सर्वसामान्य'असल्याचं.गावात लग्न समारंभ व कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असल्यास,ती असते त्याच्यासाठी, मेजवानी.मग काय, जेवतो तो मनसोक्त, तृप्तीची ढेकर येईस्तोवर...


Courtesy:Unsplash-Richard Saunders

कधीकधी त्याच्या रक्ताच्या नात्यातले व गावातील संवेदनशील लोकं,देतात त्याची नखशिखांत आंघोळ घालून,तर कधी कुणी देतो त्याला,नवीन कापडं..कोणी कटिंग-दाढीचा खर्च करतात.मग काय,"होम्या"तुम्हाला गावात शोधूनही सापडायचा नाही."होमराज"म्हणाल तर मात्र लगेच सापडेल. एकेकाळी अभ्यासात गती असणारा,देखणा "होमराज"गावाला पुन्हा एकदा नव्याने भेटतो.परंतु "होम्याला"तो सापडत नाही.पुढे,दोन-चार दिवसात "होमराजला", "होम्या"पुन्हा कडकडून मिठी मारतो व "होमराज"पुन्हा एकदा,काही महिन्यांसाठी अंतर्धान पावतो.


Courtesy:Unsplash-Anna Vi

"होम्याला" कधी ताप-ज्वर आल्याचं,निदान मी तरी  ऐकलं नाही.आलाही असेल कधी,मात्र आपल्यासारखी दवाखान्याची पायरी त्याला खचितच चढावी लागते."होम्यासारखी" मानसिक संतुलन गमावलेली माणसं,गावा- गावात,शहरांत,खितपत पडलेली आपल्याला दिसतात.काहींना साखळदंडाने बांधून कोंडलं जातं, त्यांच्याच घरी,एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखं...कुणी दिसतो भररस्त्यात बेभान फिरतांना, तर कुणी एखाद्या पुलाशेजारी निचपत पडलेला दिसतो. कुणी साधत असतो ,अदृश्याशी संवाद.त्यांना स्वतःचं भान नसतं. मळक्या- फाटक्या,कपड्यात वावरणारी,वाढलेली दाढी व लांब,मेणचट केस असलेली,कधीकधी तर..डुकरांसोबत, उकिरड्यावर उष्ट फेकलेलं अन्न खाणारी...हाडामासाची माणसं 
आपल्याला अवतीभवती दिसतात.त्यातली काही अवलिया म्हणून समाजात पूजली जातात. पुढे त्यांची भव्य-दिव्य मंदिरं,दर्गे बनतात. स्वतःच्या आयुष्याचा अर्थही न गवसणाऱ्यांच्या,प्रवचनांची,उपदेशांची पुस्तकं बाजारात येतात. खिशात दमडी न बाळगणार्‍यांना लोकं,लाखोंची देणगी,हयात असताना व नसतानाही देतात. दुसरीकडे, त्यांचे बांधव,दोन वेळेच्या जेवणासाठी व अंगभर कपड्यांसाठी,फकिराचंं जिणं जगत असतात.व "मूकनायक"बनून आपल्याला सांगत असतात,जीवनाचा खरा अर्थ..

 

Courtesy:Unsplash-K.Mitch Hodge

आजच्या घडीला,जगात जवळपास पंधरा टक्के लोकसंख्या, शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंग असणाऱ्यांची आहे.भारत सरकारने अपंगांसाठीच्या UNCRPWD(Convention on 'Rights of person with disability') या संयुक्त राष्ट्रांच्या कराराला 2007 मधे मान्यता दिली.शिवाय, अपंगांसाठी PWD(Person with disability)act 1995,व संशोधित कायदा,(Revised),RPWD act, 2016, पारीत करून शारीरिक व मानसिकरित्या अक्षम असणाऱ्या व्यक्तींच्या हक्क व अधिकारांची त्यात तरतूद केली आहे.असे असले तरी,खासकरून, मानसिकरित्या अक्षम व्यक्तींच्या समस्या, महिला,मागासवर्ग व अल्पसंख्यांकांपेक्षा गंभीर स्वरूपाच्या आहेत.कारण, त्यांना त्यांच्या,आजाराची व अधिकारांची काहीच कल्पना नसते.जगाच्या तुलनेत, आपण अशा लोकांसाठी आजतागायत फार काही भरीव करू शकलेलो नाही.आज या सर्वांसाठी सामाजिक व शासकीय पातळीवर तात्काळ उपाययोजना करणे,गरजेचे झाले आहे.                                    असे असतांना,आपण मात्र होम्यासारख्या लोकांचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार अजूनही पदोपदी नाकारत असतो..त्यांच्यातल्या माणसाला व त्यांच्या कुटुंबाला गरज आहे,मायेची,सहकार्याची व खंबीर पाठिंब्याची.कारण, समाज म्हणून आपल्याकडून त्यांच्या कुटुंबाची कळत - नकळत,अवहेलना झालेली असते.त्यांच्या कुटुंबाने अनंत संकटांचा मुकाबला केलेला असतो.त्यांच्या कष्टांची व संघर्षाची आपण कल्पनाही करू शकत नाही.म्हणून,संविधानाने दिलेला समानतेचा अधिकार जर आपण समाज म्हणून अशा, व्यक्तींना देऊ शकलो तर यापेक्षा उत्तम कार्य दुसरं असू शकत नाही.

To watch "Homya",do visit my youtube channel-Glocal Marathi,at link below


मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

Cycology




 'सायकल ' शब्द उच्चारताच ,नकळत आपण भूतकाळात जातो.आठवतात आपल्याला,सायकलच्या सीटमागे असणारी सिनेमांची नावं..तिचा तो साजशृंगार..व सायकल मालकाची ती ऐट... ..सारंच कसं आता घडल्यासारखं...गावाकडच्या जुन्या बनावटीच्या जेन्ट्स व लेडीज सायकलला आम्ही 'बाजीराव -मस्तानी'म्हणायचो,हेही आठवतं..व आठवतात, 'सायकल चालवणे'शिकतांना घडलेले अपघात...अपघातही एक नाही तर अनेक...त्यांच्या तऱ्हाही निराळ्या...शिवाय आई-वडिलांच्या हातचा खाल्लेला मार वेगळाच...असे प्रसंग तुम्हा-आम्हा,सर्वांच्या जीवनात कमी-अधिक प्रमाणात घडलेले आहेत, हे मात्र नक्की.सायकल शिकताना अपघात न घडलेला,स्वतःचे हात-पाय न मोडून घेणारा,नाहीच काही तर,सायकलवरनं पडून 'हातापायाला खरचटलं' असे न म्हणणारा,जगात शोधुनही सापडायचा नाही. मला वाटतं, आपण जर एवढ्यांदा सायकलवरनं पडलो तर,सामान्यजनांसाठीसायकलरूपी स्वस्त, पर्यावरणपूरक, प्रवासाचं साधन निर्माण करणारा अवलिया, 'मॅकमिलन' सायकल तयार करताना, कितीदा खाली पडला असणार??याची गणतीच नाही.


सायकलच्या इतिहासाचा धांडोळा घेतल्यास,आपल्याला समजतं,की,दोन चाकं मागे-पुढे जोडून सहज चालू शकतात,ही कल्पनाच मुळी किती अद्भुत व अचाट होती. त्यामुळे सायकलचा शोध हा विमानाच्या शोधापेक्षा कमी नाही,असे मला नेहमीच वाटत आले आहे. 



एवढं सगळं, सायकलपुराण सांगायचं कारण म्हणजे,कोरोना विषाणूच्या महामारीमुळे ,पुन्हा एकदा गरीब, बिचाऱ्या, सायकलकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.लॉकडाउन ते अनलॉक, या कालखंडात सायकलचा खप पाचपट वाढल्याचे,अनेक जाणकार व्यक्तींच्या तोंडून आम्ही आमच्या, कानांनी ऐकलं आहे.एक वेळ नव्या-कोर्‍या 'पल्सर' गाडीकडे कुणी ढुंकूनही बघणार नाही. मात्र ,एखादी 'रेसिंग  सायकल' रस्त्याने कुणी चालवताना दिसल्यास, सामान्यांच्या नजरा,त्या सायकलवर खिळल्याशिवाय राहत नाही.असा अनुभव अनेकांना आला असेल,यात मला तिळमात्र शंका नाही.         
फिटनेस मिळवण्याचं,स्वस्त व आरोग्यदायी,साधन म्हणून संपूर्ण जग आज सायकलकडे बघत आहे.युरोपीय देश,अमेरिका ,चीन यांनी केव्हाच सायकलला स्वीकारले आहे. आम्ही मात्र गरीब देश असूनही, बुलेटने 'धुरळा'उडवीत आहोत. काही दिवसांपूर्वी नागपूरच्या महापौरांनी नागपूरमध्ये 'डेडिकेटेड सायकल ट्रॅक' तयार करणार असल्याची व नागपूर शहराला 'सायकल कॅपिटल ऑफ इंडिया 'करण्याची घोषणा केली. पुढे या घोषणेचं काय होईल, ते काळच सांगेल.तूर्तास कुणाला येवो न येवो ,सायकलला मात्र "अच्छे दिन"आले आहेत,हे नक्की.


सहज वाटलं, आपणनही या 'सायकल अभियानात'आपला खारीचा वाटा उचलावा,  म्हणून आम्ही,मित्रांनी सायकलने एक लांब रपेट मारण्याचे ठरविले.मग काय,आदल्यादिवशी नियोजन केले व दुसऱ्या दिवशी सकाळी मोहगाव( झिल्पी) डॅमकडे जाण्याचे ठरले. दुसऱ्या दिवशी सकाळी जवळपास साडेसहा वाजता सगळ्यांनी आपापल्या सायकली काढल्या व घरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहगाव (झिल्पी )येथे जाण्यासाठी बायपास रोडवर  भेटलो.

एका टपरीवर नागपूरच्या प्रसिध्द 'तर्री पोह्याचा'आस्वाद घेतला व त्यानंतर कडक,वाफाळलेला चहा घेऊन मोहगावच्या रस्त्याने मार्गस्थ झालो.                                                                     


हिंगणा-मोहगाव रस्त्याच्या दुतर्फा, बागायती शेती,संत्र्यांच्या बागा व अनेक फार्म हाऊसेस असल्याने,तसेच रस्ता नव्याने तयार झालेला असल्याने ,सायकलिंग करण्यात वेगळीच मौज वाटत होती. मधे थांबत, बसत, गप्पागोष्टी करत, आम्ही पुढे जात होतो.कारण आमची ना कुणाशी स्पर्धा होती,ना आम्ही 'व्यावसायिक सायकलपटू' होतो.आम्ही होतो,हौशी सायकलपटू.सायकलीही बहुतेकांकडे साध्याच होत्या.पण उत्साह मात्र 'खास' होता.                               

लोकं पन्नास -शंभर किलोमीटर सायकलिंग करतात,आपण नाही तेवढे,पण दहा किलोमीटर तर जाऊच शकतो,असा विश्वास सर्वांच्या ठायी होता.पंधरा वर्षे या एकाच रस्त्याने नोकरीनिमित्त अपडाऊन केले असल्याने, रस्ता तसा नेहमीचा 'परिचित' होता. परंतु,सायकलने या रस्त्याने होणारा आमचा हा   'पहिलाच' प्रवास असल्याने,रस्ता जणू नव्याने आपली ओळख करून देत  असल्याची अनुभूती आम्हा सर्वांना येत होती.


   




 

 मजल- दरमजल करत मोहगावला पोहचलो.गाव ओलांडल्यावर आम्हाला, झिल्पी डॅम व मोहगावच्या दरम्यान ,तेथील स्थानिक युवकाने "आसरा"नावाचं एक नवंकोरं फॅमिली रेस्टॉरंट सुरु केलेलं दिसलं.सकाळची वेळ असल्याने ते बंद होतं, मात्र त्या रेस्टॉरंटचा थाट काही औरच होता.हिरवाईने नटलेल्या टेकडीच्या पायथ्याशी, अतिशय सुसज्ज, नीटनेटके व देखणे असे हे रेस्टॉरंट, पर्यटकांना नक्कीच खुणावत असणार,याची मनोमन खात्री पटली. शिवाय, इथे अस्सल गावरान जेवण व नाश्ता मिळतो,असे विचारपूस केल्यावर कळले.पुढे कधीतरी येथील जेवणाचा आस्वाद घेऊ,असे मनाशी ठरवून आम्ही झिल्पी डॅमच्या वाटेने जाऊ लागलो.                           


 दरम्यान, रस्त्याच्या कडेला विदर्भातील पाहिले 'डेट्स फार्म'अर्थात 'खजुराची शेती'दिसली.ही शेती 'थंगावेलू'आडनाव असणाऱ्या 'साऊथ इंडियन'माणसाची होती,हे कळल्यावर त्याचे विशेष कौतुक वाटले.कारण, आम्ही 'मराठी माणसं' गावची वेस ओलांडताना हजारदा विचार करतो. इथे मात्र,एक दक्षिणेतला माणूस नागपूर सारख्या शहरात,त्यातल्या त्यात एका खेड्यात येऊन,विदर्भात किंबहुना महाराष्ट्रात खजुराच्या शेतीचा पहिला प्रयोग काय करतो,तसेच 'ऍग्रो टुरिझम'सारख्या संकल्पना,शेतकरी आत्महत्या होणाऱ्या विदर्भात यशस्वीपणे राबवतो, हे सगळंच अचंबित करणारं आहे.             

 पुढे,काहीसा चढाई असलेला मार्ग मागे सारून आम्ही आमच्या "डेस्टिनेशन"ला पोहोचलो. नेहमीप्रमाणे इथेही फोटोग्राफी करण्यास आम्ही अजिबात कसूर केली नाही.                                       

डॅमच्या बाजूने, "मैत्रबन"या वृद्धांच्या निवासी ग्रामकडे जाणाऱ्या रस्त्याने आम्ही डॅमचं बॅकवॉटर बघत पुढे जात होतो.या परिसरात आम्हाला नागपूरच्या मोठया राजकीय पुढाऱ्यांचे फार्म हाऊस असल्याचे कळले.तसेच या परिसरात लवकरच सिद्धिविनायक मंदिराचं निर्माण कार्य सुरू होणार असल्याचे समजले. इथे आम्ही मंदिराच्या कारागिरांशी संवाद साधला.

       



आता आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.रस्त्याला उतार असल्याने हा प्रवास जलदगतीने होत होता.प्रवासाचा काहीसा क्षीण जाणवत होता,पण उत्साह अजूनही कायम होता.पुढच्या टूरचे नियोजन करीत,कधी आम्ही हिंगणा बायपासजवळ पोहोचलो, आमचे आम्हालाच कळले नाही.परत इथे,गरमागरम समोस्यावर आम्ही ताव मारला, चहा घेऊन,सर्वांनी आपापल्या घरची वाट धरली.

     


 या प्रवासात,'आनंद' हा पैशाने विकत घेता येत नाही,हे प्रकर्षाने जाणवलं.जीवनातल्या साध्या, सोप्या वाटणाऱ्या गोष्टींत लाखमोलाचा आनंद व आभाळभर सुख दडलेलं असतं,आपण मात्र ते घेण्यात कमी पडतो, हेही अनुभवलं. मोठमोठ्या कार ड्राईव्ह करून, जे थ्रील तुम्हा-आम्हाला येणार नाही,ते थ्रील सायकलिंग तुम्हाला देते,असे म्हणणे अतिशयोक्ती नाही,याची प्रचिती स्वतः अनुभवल्यावरच आली.म्हणून,कोरोना महामारीच्या निमित्ताने,पुन्हा एकदा जीवनाकडे डोळसपणे पाहूया व जीवनाच्या छोट्या छोट्या क्षणांना भरभरून जगुया,धन्यवाद.
To watch our more cycle stories,do visit,my youtube channel,Glocal Marathi,at link below



Best of glocal marathi

गनिमीकावा

        गनिमीकावा संकटे बहु येतील, हरणे तुला ठाव नाही.. कोंडीत सापडाया, गड्या तू कुणाचा साव नाही..!!     भेटतील सरडे,      पदोपदी तुला रे.. ...