आम्हा नागपूरकरांच्या जिभेचे ,जरा जास्तच चोचले आहेत.असं-तसं आम्हाला अजिबात जमत नाही. साधे कांदे पोहे घ्या ...
जगाच्या पाठीवर पोह्यांमध्ये तर्रीदार रस्सा टाकून खाणारे फक्त आम्ही नागपूरकरच.पोह्यांमध्ये तर्रीदार रस्सा टाकून खाल्ल्या जाणाऱ्या पोह्यांना आम्ही नागपूरकर "तर्री पोहा"किंवा "चना पोहा" या नावाने संबोधतो. सकाळ झाली रे झाली की,तुम्हाला नागपुरातल्या चौकाचौकात टपऱ्यांवर तर्री पोहा विकणारे भेटतील. मॉर्निंग वॉकला जाणारे,बाहेरगावाहून नागपुरात येणारे,होस्टेल मध्ये राहणारे विद्यार्थी,बॅचलर्स,अशांसाठी तर्री पोहा म्हणजे आवडीचा ब्रेकफास्ट.नागपुरात,दहा रुपयांत एक हाफ तर वीस रुपयात एक प्लेट पोहे,अगदी सहज मिळतात.जोपर्यंत प्लेटमध्ये घेतलेले पोहे तर्रीदार रस्स्यात तरंगत नाही व त्यात अर्धे चिरलेले लालचुटूक टमाटर(टमाटे) विराजमान होत नाही, तोपर्यंत अस्सल नागपूरकराला पोहे खाल्ल्याचे समाधान मिळत नाही,हे मात्र नक्की. शिवाय,जे पोहे खाल्ल्यानंतर, तर्रीचा ठसका लागत नाही व नाका-डोळ्यांत पाणी येत नाही,अशा पोह्यांना अस्सल नागपूरकर पोहेच मानत नाही.एवढा मान खवय्या नागपूरकरांच्या लेखी तर्री पोह्यांना आहे.नागपुरात पोहे खातांना रस्सा वारंवार मागण्यात.. ग्राहक व तो देण्यात.. विक्रेता, अजिबात संकोच करत नाही.जणू तो नागपूरकरांचा मूलभूत हक्कच आहे,असा सर्वांचा समज आहे.
सांगायचं तात्पर्य,नागपूरचं हवामान जरी "कोरडं"असलं तरी पोहे मात्र आम्हाला तर्रीदार रस्स्याने "ओले" झालेलेच आवडतात.अशा तर्री पोह्यांचे नागपूरकर 'दिवाने' आहेत. कामधंद्या निमित्त आम्ही नागपूरकर जगात,कुठेही गेलो तरी,साधं "तर्री पोहे"हे नाव जरी ऐकलं तरी, आम्हाला नागपूरची ओढ लागल्यापासून राहत नाही.
आधी सांगितल्याप्रमाणे, नागपुरात तर्री पोहे विकणारे असंख्य आहेत.तसेच नागपुरातल्या प्रत्येक भागात त्या-त्या भागातले तर्री पोहेवाले प्रसिद्ध आहेत.या सर्वांमधले, हॉट डेस्टिनेशन म्हणजे केपी ग्राउंडचे पोहे.के. पी.ग्राऊंड म्हणजे कस्तुरचंद पार्क. आमच्या नागपूरचं जणू "शिवाजी पार्क".जिथे देशातल्या मोठमोठाल्या राजकारण्यांनी सभा गाजवल्या ते ठिकाण.केपी ग्राउंड जवळ मिळणारे तर्री पोहे खाण्यासाठी नागपुरातल्या श्रीमंतांपासून ते सामान्यातले सामान्य लोकं गर्दी करतात.नागपुरात येऊन इथल्या तर्री पोह्यांचा आस्वाद न घेता जाणारा सेलेब्रिटी विरळाच.राजकारणी,बॉलीवूड स्टार, मराठी सिनेस्टार.. सर्वांनी इथल्या तर्री पोह्यांची चव कधी ना कधी चाखली आहे.इथल्या तर्री पोह्यांचे वैशिष्ट्य म्हणजे इथला ठसकेबाज रस्सा व पोह्यांवर अलगदपणे पेश केले जाणारे अर्धे लाल टमाटर(टमाटे). टमाटरमुळे पोह्यांना आंबट-तिखट अशी चव प्राप्त होते व आपल्या जिभेचे सर्व टेस्ट बड्स तृप्त होतात.एवढेच नाही तर इथले काही पोहेवाले दरवर्षी इमानेइतबारे इन्कम टॅक्स भरतात व काही त्यांच्या मिळकतीच्या जोरावर जगभ्रमंतीही करतात.अशी माहिती आहे. टी. व्ही. चॅनेल्सवर तसेच प्रसिद्ध youtube चॅनेल्सवर सुद्धा हे पोहेवाले झळकलेले आहेत. यावरून,तुम्हा सर्वांना,नागपुरातल्या प्रसिद्ध तर्री पोह्यांचा महिमा नक्कीच कळला असेल... नागपुरात येणाऱ्या प्रत्येकाने तर्री पोह्यांचा आवर्जून आस्वाद घ्यावा,यासाठी ...एक अस्सल नागपूरकर म्हणून...अल्पसा प्रयत्न!!