![]() |
Courtesy-Unsplash~Auron Burden |
मी बँकेत कामानिमित्त गेलो असता, मला सतरा-अठरा वर्षाचा एक मुलगा भेटला .तो माझ्याजवळ आला व मला म्हणाला, "सर, ओळखलंत का ?"मी त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं व आठवू लागलो..काही क्षणातच मला त्याची ओळख पटली आणि आठवलं.'अरे,हा तर बादल आहे.'मी त्याला म्हटलं,"काय बादल ,इकडे कसा काय? तो म्हणाला,"सर,माझं बँकेत थोडं काम आहे, म्हणून मी इकडे आलेलो आहे.""बरं -बरं "म्हणत मी त्याच्याशी संवाद साधला." तू आता काय करतोस? ..शिक्षण कोणत्या वर्गापर्यंत घेतलंस ???इत्यादी.. बाबत मी त्याची चौकशी केली.त्यावर बादल म्हणाला," सर दहावीत माझे दोन विषय राहिले, त्यामुळे मी पुढचं शिक्षण सोडून दिलं व आता एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहे.यावर मी म्हटलं," काय बादल,बाकी सगळं ठीक आहे ना? बादलने स्मित हास्य करत,कामाबाबत समाधानी असल्याचं सांगितलं. त्यानंतर बादल व मी, दोघेही आपापलं बँकेतलं काम आटोपून निघून गेलो.
घरी आल्यानंतर मात्र माझ्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं व मला आठवला, सहाव्या वर्गात शिकणारा बादल... त्यावर्षी प्रथमच माझ्याकडे बादलचा वर्ग शिकविण्यासाठी आलेला होता.. त्याच्या वर्गात एकूण आठ मुले होती व त्या आठ मुलांपैकी एक.. बादल होता...याच वर्गातला बादलचा जोडीदार असणारा दुसरा मुलगा म्हणजे.. सुरज..जोडीदार अशा अर्थाने की, दोघांचीही अभ्यासाची पातळी सारखीच.. अगदी बाराखडीही वाचता न येण्याइतपत.. सहावीतले विद्यार्थी म्हटल्यावर त्यांना साधी बाराखडी वाचता येत नाही.. ते बघून माझ्या मनात विचार आला की, ही मुलं पुढे, व्यावहारिक जगात कशी काय टिकाव धरतील?ती स्वतःच्या पायावर उभी होतील की नाही?त्याचं भवितव्य कसं असेल?...काळाच्या पोटात काय दडलंय,याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. साधी मराठी बाराखडी वाचता येत नसूनही, बादल व सुरज शाळेत कधीही नियमित यायचे नाहीत.. त्यामागे त्यांची कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमी कारणीभूत होती. तशी दोघांची परिस्थिती हलाखीची असल्याने बादल व सूरज दोघेही, छोट्या-मोठ्या शेतीच्या कामाला जात असत..
नावाप्रमाणेच बादल हा वर्णाने काळासावळा तर सुरज निमगोरा होता. त्यांच्याकडे बघून मला नेहमी वाटायचं की त्यांच्या रंगांनी दोघांच्याही नावाला सार्थ केलेलं आहे.. बऱ्याचदा असाही योगायोग असायचा की,जेव्हा दिवसा ढगाळ वातावरण असायचं(ज्याला आमच्या नागपुरी भाषेत"बादल" म्हणतात) नेमकं, त्याच दिवशी बादल शाळेत यायचा. याउलट ज्या दिवशी स्वच्छ प्रकाश(ऊन) असायचं,त्या दिवशी सुरज शाळेत हजर असायचा तर बादल शाळेला दांडी मारायचा. ..मी नेहमी या विषयावर त्यांची गंमत करायचो.. एकंदरीत दोघेही अभ्यासात अगदी प्राथमिक स्तरावर होते आणि एवढं असूनही दोघे शाळेत नेहमी गैरहजर असायचे.
ज्या दिवशी दोघेही किंवा दोघांपैकी एक जरी शाळेत उपस्थित असला, की मी त्यांना बाराखडी शिकवायचो,त्यांच्याशी गप्पा करायचो. हळूहळू बादल व सुरज या दोघांना कुठेतरी वाटायला लागलं की, वाचता-लिहिता येणं, फार गरजेचं आहे. त्यामुळे बादल व सूरज शाळेत आल्यानंतर बाराखडी गिरवू लागले. पुढे टप्प्याटप्प्याने त्यांना "आ"ची मात्रा.".इ"ची मात्रा.. असं करत-करत, पुढचं वाचन मी त्यांना शिकूवू लागलो. कदाचित याआधी त्यांना एवढं आपुलकीने जवळ घेऊन कोणी बाराखडी शिकवली नसेल किंवा त्यांनी स्वतः त्याकडे फारसं लक्ष दिलं नसेल. सहावीत आल्यानंतर मात्र त्यांनी बाराखडी व वाचन शिकण्याचा थोडाफार प्रयत्न सुरू केला. सहावी व सातवी या दोन वर्षांमध्ये बादल व सूरज दोघेही कामापुरते काअसेना,वाचन करू लागले. सातवीनंतर जेव्हा दोघांची जिल्हा परिषदेच्या शाळेतून पुढे, खाजगी शाळेमध्ये आठव्या वर्गात जाण्याची वेळ आली, तेव्हा मी बादल व सुरज दोघांना जवळ बोलावून विचारले," आता तुम्हा दोघांना लिहित- वाचता येते ना,तर मग तुम्ही कोणत्या वर्गापर्यंत शिकणार? यावर बादल म्हणाला," बघू सर.." मी म्हटलं," बादल, बघू नाही... तर तुला कोणत्याही परिस्थितीत बारावीपर्यंत शिकायचं आहे आणि असं तू मला आज प्रॉमिस करायचं आहे." त्या बालवयात कदाचित त्याच्या बुद्धीला माझं म्हणणं पटल असेल.. म्हणून बादलने सातवीनंतर पुढे बारावीपर्यंत शिकण्याचं मला प्रॉमिस केलं..पुढे बादल व सुरजने आठवीसाठी एका खाजगी शाळेत प्रवेश घेतला.
मध्यंतरी बादलशी संपर्क झाला नाही.. मग अचानक इयत्ता आठवीत असताना.. शाळेतून घरी येतांना मला, बादल दिसला.. मी त्याला आवर्जून हाक मारली. बादलला विचारलं," काय बादल, काय म्हणते नवी शाळा?.. अभ्यास करतो की नाही? यावर बादलचं उत्तर विचार करायला भाग पडणारं होतं. तो म्हणाला ,"सर, त्या शाळेत मला कुणीच विचारत नाही. शिक्षकही मला जवळ बोलवत नाहीत. तुम्ही मला जवळ बोलवून एक- एक गोष्ट शिकवायचे, तिथे कोणी माझी साधी दखलही घेत नाही." बादलचे हे उत्तर ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला... वाटलं की,जर या मुलांना थोडं आपुलकीनं वागवलं, तर कदाचित ही मुलं फार नाही.. परंतु स्वतःच्या पायावर उभी होण्याइतपत शिक्षण.. नक्कीच घेवू शकतील.. त्यानंतर मी बादलला समजावलं," अरे बादल, त्या शाळेत जास्त मुलं असल्यामुळे कदाचित तिथले शिक्षक तुझ्याकडे वैयक्तिक लक्ष देत नसतील." त्यावर बादलने नेहमीप्रमाणे स्मितहास्य केलं व घराच्या दिशेने निघून गेला.
त्यानंतर बऱ्याच दिवसांनी बादलशी बँकेत झालेली ही माझी भेट.. सुरज बद्दल चौकशी केली असता तो नववी नंतर पुढे शिकला नाही,असं बादलने मला सांगितलं. बादल आजच्या स्पर्धेच्या व व्यवहारी जगात छोटं-मोठं का असेना काम करून स्वतःचं आयुष्य इमाने-इतबारे जगतो आहे ..फार उच्च शिक्षण जरी त्याने घेतलं नसलं तरी तो स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा आहे...तशाही त्याच्या स्वतःच्या आयुष्याकडून फार अपेक्षा नव्हत्याच... कदाचित त्यामागे त्याची आर्थिक-सामाजिक परिस्थिती असेल किंवा त्याला कुणी तसं,स्वप्न बघायला शिकवलं नसेल..काही का असेना.. परंतु बादल प्रामाणिकपणे काम करून, समाजामध्ये चांगला नागरिक म्हणून जगतो आहे,याचं मला समाधान वाटलं.
मागे वळून बघितल्यावर वाटतं की, असे कित्येक बादल व सूरज आपल्या समाजात आहेत की ज्यांचे मूलभूत शिक्षण,अनेक कारणांनी होत नाही... याचा अर्थ त्यांची शिकायची इच्छा नसते किंवा ते जीवनात काहीच करू शकत नाहीत असे नाही... आपण थोडंजरी त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघितलं तर ही मुलं समाजासाठी त्यांच्या परीने योगदान देऊ शकतील... एकंदरीत शिक्षक व समाजाचा एक संवेदनशील घटक म्हणून अशा बादल आणि सूरज,यांना प्रोत्साहित करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे,असं मला वाटतं..