अखेर महाराष्ट्र शासनाने," इयत्ता 5 ते 8 चे वर्ग 27 जानेवारीपासून सुरु होणार.."अशी घोषणा केली. जवळपास 10 महिन्यानंतर शाळा सुरू होणार असल्याने,आता मला दररोज 50-60 किलोमीटर अंतर अपडाऊन करावे लागणार होते. म्हणून मी माझ्या बाईकची सर्व्हिसिंग करण्याचे ठरविले. याआधी अनेक ठिकाणी सर्व्हिसिंगचा अनुभव घेतल्यानंतर, शेवटी मित्राच्या ओळखीने निझामभाईंकडे जाण्याचे निश्चित केले.
अजनी चौकातून,FCI गोडाऊनच्या रोडने गेल्यास,चुनाभट्टी भागात निझामभाईंचे फुटपाथवर दुकान आहे.त्यांचा मोबाईल नंबर मिळविला व त्यांना कॉल केला."आऊ क्या,बाईक लेके,आज अर्जंट सर्व्हिसिंग करनी है"मी म्हटले."खाली बैठा हूं, कोई बाईक नही है,आओ कभीभी"निझामभाई बोलले.मी अर्ध्या तासाच्या आत तिथे हजर झालो.तसं म्हणाल तर तिथे आणखी दुसरी दुकानं आहेत.तीही फुटपाथवरचं.मी मात्र यांपैकी निझामभाईंकडे बाईक सर्व्हिसिंग करणार होतो. दुकान कसलं,लाकडी-टिनांनी जोडलेला मोठा ठेलाच तो.त्यासमोर मोडक्या-तोडक्या, जुन्या, भंगार गाड्या अस्ताव्यस्त ठेवलेल्या... काही नव्या गाड्या दुरुस्तीसाठी आलेल्या... व अशा जुन्या-नव्या गाड्यांच्या गराड्यात पन्नाशीच्या आसपास असलेले निझामभाई,त्यांच्या कामात गढलेले मला दिसले.मित्राचा संदर्भ दिल्यावर व लांबून आलो असे सांगितल्यावर,त्यांनी माझी गाडी लगेच सर्व्हिसिंगला घेतली.सर्वप्रथम गाडी वॉशिंग सेंटर मधून धुवून आणण्यात आली व त्यानंतर गाडीच्या एकेक भागाची चाचपणी करून, निझामभाईंनी आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या."गाडीमें कुछ नया सामान डालना है क्या?"मी विचारलं."अभी जरूरत नही,बाद मे आओगे तो देखेंगे"निझामभाई म्हणाले.दरवेळी गाडी सर्व्हिसिंगला नेल्यावर,"साहाब,गाडी का ये पार्ट गया है..वो खराब हो गया है.."असं म्हणत शेकडो रुपये विनाकारण उकळणाऱ्या मेकॅनिकचा यापूर्वीचा अनुभव असल्याने, निझामभाईंचे हे शब्द मला आश्चर्यचकित करीत होते."आजकल की नई गाडीया एकदम भंगार आ रही है,पुरानीच गाडी मजबुत है"अशी पुस्तीही त्यांनी जोडली.व "नई गाडीयो का इंजन बहुत हलका है,पांच साल के अंदर खराब होता है."असं सांगून त्यांनी, माझ्या सामान्य ज्ञानात भर टाकली.
सर्व्हिसिंग झाल्यावर,"बिल कितना हुआ?"मी विचारलं."250 रु."निझामभाईंनी उत्तर दिलं. पैसे दिल्यावर ते म्हणाले,"चलो चाय पिते है"असं म्हणत त्यांनी त्यांच्या नेहमीच्या चहाच्या टपरीवर नेलं व दोन हाफ चहा मागितला.चहाचे घोट घेता-घेता त्यांनी आपला जीवनप्रवास सांगायला सुरुवात केली."मेरे पिताजी रेल्वे मे ड्रायव्हर थे,उन्होने चुनाभट्टी झोपडपट्टीमें घर बनाया.रोज के झगडे और शराबी लोगो की बस्ती होने की वजहसे,पढाई छुट गयी.मेरे दोस्त कोईभी नही पढे, और मैं भी.इसलिए,आज फुटपाथपर दुकान चला रहा हूं" लेकीन,मेरा लडका बी. कॉम.पढ रहा है और साथ में VCA(विदर्भ क्रिकेट असोसिएशन)के लिए अंडर 19,क्रिकेट खेलता है, अच्छा प्लेयर है,शायद,रणजी खेलेगा..दिनरात मेहनत करता है"पोराच्या कर्तृत्वाविषयी सांगतांना,निझामभाईंच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक जाणवत होती."लडकी मोहता सायन्स कॉलेजमे B.Sc पढ रही है"असं सांगून मुलीलाही उत्तम शिक्षण दिल्याचे निझामभाईंनी सांगितले. मी उत्सुकतेपोटी विचारलं,"निझामभाई ,ऑटोमोबाईल लाईन मे,जादातर,मुस्लिम लोग ही क्यों होते है?त्यावर त्यांनी अतिशय समर्पक उत्तर दिलं"मुस्लिम समाज मे लडके,जादा पढते नही,शायद इसिलिये..मगर आजकल कुछ-कुछ लडके पढ रहे है."असं सांगून समाधान व्यक्त केलं."वाठोडा मे प्लॉट खरीद रखा है,वहा एक दुकान और नया घर बनाना है,मैं मेरे परिवार को अच्छा भविष्य देना चाहता हूं."असा आशावाद निझामभाईंनी व्यक्त केला. फुटपाथवर दररोज हात काळे करून,मळक्या कपड्यात,उन्हा-तान्हात राबून,त्यांनी केलेली प्रगती व मुलांना दिलेलं उत्तम शिक्षण तसेच स्वतःच्या आयुष्याला दिलेली सोनेरी झळाळी,नक्कीच अचंबित करणारी वाटली. आपल्यातले पांढरपेशे,नोकरवर्ग, अतिशय कम्फर्टेबल जिणं जगूनही,कदाचित आयुष्याला आकार देऊ शकत नाही,इथे मात्र फुटपाथवर जगून, निझामभाईंनी,जीवनाचा विजयपथ गाठला,हे नक्कीच कौतुकास्पद आहे.मी बाईकला किक मारली,परंतु रस्त्याने जातांना,जॉली LLB मधला अर्षद वारसीचा डायलॉग मला आठवला,"कौन है ये लोग, कहासे आते है ये लोग.."व निझामभाईंच्या रूपाने, फुटपाथवर काम करणाऱ्या, दुकान थाटणाऱ्या,तमाम लोकांच्या अस्तित्वाची नव्याने ओळख करवून गेला....!!