एक हात जन्मापासून कायम तुमच्या पाठीशी असतो..तुम्ही रडता-पडता,तेव्हा कदाचित तो तुमच्याजवळ नसतो.. पण जेव्हा जेव्हा तुम्ही अडता- नडता,तेव्हा मात्र त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो.. अंगाई गीते तो तुमच्यासाठी गात नाही.. पण तुमचे सर्व लाड पुरवल्याशिवाय मात्र तो राहत नाही.. सबंध आयुष्य खर्ची घालतो कुटुंबासाठी.. नसतोच त्याच्याकडे वेळ स्वतःसाठी... व्यक्त होतांना तो कदाचित कमी पडतो.. जीवनाच्या संघर्षात मात्र पुरेपूर लढतो.. ज्यांच्या फक्त असल्याने घराला घरपण येतं .. ज्याचं वागणंही तुम्हाला शहाणपण देतं.. ज्याला वाटतं,तुम्ही त्याच्यापेक्षाही मोठं व्हावं,असं वाटणारी जगातली एकमेव व्यक्ती,तो असतो..
जीवनात हार मानायची नाही,हे तो कायम मनी ठसतो..रुसतो, भांडतो बऱ्याचदा... न पटताही मांडतो म्हणणे अनेकदा.. तरी तुमच्यासाठी बऱ्याचदा माघार घेतो...न मागताही आधार देतो.. डोळ्यांत स्वप्न ठेवून तो जगत असतो.. शाश्वती नसतांनाही आपलं सर्वस्व उधळून देणारा केवळ तोच असतो.. चार व्यावहारिक गोष्टी,काळानुरूप शिकतो.. तुम्हाला खाजगी स्पेस देणारा कुटुंबात तोच पहिला असतो.. तटस्थ व स्थितप्रज्ञ राहून आपल्या अंगावर उचलून धरतो घर सबंध आयुष्यभर...सुखाचे चार दिवस यावे,मिळावी विश्रांती क्षणभर..हा असा बापमाणूस प्रत्येकात दडला आहे..ज्याच्यावाचून कुटुंबाचा गाडा अडला आहे..