भाग-3(नागपूरचं हवामान) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भाग-3(नागपूरचं हवामान) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ४ जून, २०२१

आम्ही नागपूरकर,भाग-3 (नागपूरचं हवामान)


"नागपूर" नाव घेताच, नागपूर बाहेरच्या लोकांची एकच प्रतिक्रिया येते,ती म्हणजे नागपूरचं "कडक उन्ह"."बोले तो एकदम कड$$क".तसं बघायला गेल्यास,नागपूरचा उन्हाळा,पुणे-मुंबई वाल्यांच्या नेहमीच चेष्टेचा विषय होतो. 'काय राव,तुमच्या नागपूरला किती कडक उन्हाळा ?तुम्ही राहतातच कसे ?असे डायलॉग वारंवार ऐकून आम्हा नागपूरकरांचे कान विटलेले आहेत.बरं, पण असे म्हणणारे मुंबईकर, पुणेकर,दुबई व अरब देशांमध्ये जेव्हा आनंदाने, विनातक्रार कामानिमित्त जातात,तेव्हा आम्हा नागपूरकरांना हसावं की रडावं, हेच समजत नाही. तसा उन्हाळा आमच्यासाठीही कठीण पण विपरीत परिस्थितीत जगतो, तोच तर खरा नागपूरकर. मुंबईच्या दमट,कोंदट हवेपेक्षा आम्हाला नागपूरची कोरडी हवा जरा जास्तच भावते. त्याला तुम्ही आमचं नागपूरवरचं आंधळं प्रेमही म्हणू शकता.उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना नागपुरी भाषेत "झाका"म्हणतात.यामुळे भर उन्हात फिरल्यास "उन्हाळी"(उन्हामुळे होणारा त्रास) लागल्यावाचून राहत नाही,व 'उन्हाळी"हा त्रास काय असतो,"हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे",या पठडीतला अनुभव.


पण या उन्हावर उपाय न शोधतील तर ते नागपूरकर कसले..उगाच नाही नागपूरला डेझर्ट कूलरची जननी म्हणून संबोधतात.कारण अशाप्रकारच्या कुलर्सचा शोध आमच्या नागपुरात लागला,अशी माहिती आहे. शिवाय सबंध भारताला हे "डेझर्ट कुलर्स" पुरविण्याचे काम नागपुरातून होत असते.म्हणून हा नागपुरी थंडावा आम्ही नागपूरकरांनी देशात पोहचविला,हेही नसे थोडके.हल्ली बाईकच्या  विशेष प्रकारच्या सीट्स आमच्या नागपुरात मिळतात,त्यामुळे भर उन्हात जरी तुमची  बाईक उभी असेल,तरी सीट गरम होत नाही,असे नवनवीन संशोधन नागपूरकर नेहमीच करीत असतात.मे महिन्यात तापमान 47-48 डिग्री सेल्सिअस ठरलेलं.अशाही तापमानात टपरीवर उकळता चहा पिणारे अवलिया तुम्हाला नागपुरातच भेटतील.


हल्ली फेसबुक व व्हाट्सएपच्या दुनियेत नागपूरच्या उन्हावर मिम्स प्रचंड प्रमाणात वायरल होताहेत.अशाप्रकारे "नागपूरचा उन्हाळा" social media वर हास्याचा ओलावा पसरवीत आहे,हे मात्र नक्की.

                   


 हिवाळ्यात आमच्याकडे 

"गुलाबी -बिलाबी" थंडी हा प्रकार नसतो. कडाक्याची थंडी पडल्याशिवाय आम्हा नागपूरकरांना हिवाळा आल्यासारखा वाटत नाही.तापमान जेव्हा 5 ℃ च्या खाली येतं तेव्हा,अंगात हुडहुडी भरल्यावर टपरीवरील"तर्री पोह्यांच्या" आस्वाद घेतांना व अद्रकवाली "चाय"पितांना ,दोस्तांसोबत "मेहफिल" जमविण्याची मजा काही औरच.भल्यापहाटे व्यायाम करण्याच्या नावावर मस्तपैकी शेकोटी पेटवून रमणारे बिलंदर सुद्धा तुम्हाला आमच्या नागपूरच्या मातीतच भेटतील.शिवाय, रात्रीच्या जेवणानंतर,गप्पांच्या ओघात मध्यरात्रीच्या चंद्राची साथसंगत करणारेही नागपूरकरच.असा हा "नागपूरी हिवाळा",बच्चे कंपनी ते आबालवृद्ध सर्वांनाच हवाहवासा वाटतो.

     


नागपुरात "पाऊस" मुंबईप्रमाणे अचानक येत नाही.तो येतो,ढगांच्या गडगडाटासह व विजेच्या कडकडाटासह.. आम्हा नागपूरकरांसारखं तोही वातावरणनिर्मिती--म्हणजेच आमच्या नागपुरी भाषेत"माहोल"केल्याशिवाय येत नाही.आमच्या नागपुरात तसा समाधानकारक पाऊस पडतो.दुष्काळ म्हणाल तर सहसा नसतोच.कधीकधी पाऊस असा काही बरसतो की,एरवी मृतप्राय असलेली,आमची 'नाग नदी' ओसंडून वाहू लागते व ती अजूनही जिवंत आहे,याची आम्हाला 'हा पाऊस' जाणीव करून देतो.पावसात भिजल्यावर गरमागरम मुंग पकोड्यांवर ताव मारण्यात आम्ही नागपूरकर अजिबात फिकीर करीत नाही.


फुटाळा तलावावर रिमझिम पावसात भिजत "भूट्टा"खाणारी तरुणाई,अंबाझरी ओव्हरफ्लो पॉईंटवर मॉन्सून celebrate करण्याची नवलाई,रामटेकच्या खिंडसी तलावाच्या दिशेने सुसाट पळण्याची घाई..


हे आम्हा नागपूरकरांचे मॉन्सून मधले "हॉट डेस्टिनेशन्स"..पावसाळ्यात आम्ही नागपूरकर नागपूरजवळच्या तमाम तलावांवर मनसोक्त भटकंती करतो.त्याच्या जोडीला नागपूर नजीकच्या हिरवाईचाही आनंद घेतो.



पावसाळ्यात अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याशिवाय आम्हा नागपूरकरांना 
पुरेपूर पाऊस झाला,याची खात्री पटत नाही.मग हवामान शास्त्रज्ञ कितीही अचूक अंदाज देवोत,अंबाझरी तलाव हा आम्हा नागपूरकरांचं पाऊस मोजण्याचं हक्काचं व विश्वासाचं "परिमाण" आहे.

थोडक्यात काय,तर,केवळ उन्हाळाच नाही तर, हिवाळा व पावसाळा हेही ऋतू आमच्या स्वभावाप्रमाणेच कडक असतात.ऋतूंचा हा राकटपणा,रांगडेपणा व बिनधास्तपणा आम्हा नागपूरकरांच्या स्वभावातही उतरलेला आहे व यातच आम्हा नागपूरकरांच्या "जिंदादिल"जगण्याचं रहस्य दडलेलं आहे.

Best of glocal marathi

गनिमीकावा

        गनिमीकावा संकटे बहु येतील, हरणे तुला ठाव नाही.. कोंडीत सापडाया, गड्या तू कुणाचा साव नाही..!!     भेटतील सरडे,      पदोपदी तुला रे.. ...