🎇दिवाळी गावाकडची
दिवाळी सणाची चाहूल लागताच,गावात घरोघरी साफसफाई व सारवणाची लगबग सुरू होते.घरातील स्त्रिया या दिवसांत जणू 'स्वच्छता अभियान' नेटाने राबवितांना दिसतात.पुरुषमंडळी आपापल्या परीने यात हातभार लावत असतात.पूर्वी चुन्याने घराच्या भिंती सारवल्या जायच्या.त्यानंतर डीसटेंपर व हल्ली पेंटचा सुद्धा यासाठी वापर होतांना दिसतो.एकंदरीत, गाव दिवाळीत स्वच्छ, लखलखीत व नवंकोरं झालेलं असतं.
गावाकडची दिवाळी ही खऱ्या अर्थाने असते कष्टकऱ्यांची.. शेतकऱ्यांची.यात शहरी बडेजाव व दिखाऊपणा नसतो.तर तो असतो, निसर्गाच्या संपन्नतेचा सोहळा. रूढअर्थाने दिवाळी पाच दिवसांची असली, तरी अलीकडच्या काळात, लक्ष्मीपूजन, गायगोंदण व भाऊबीज, हे तीन दिवस नागपूर जिल्ह्यात विशेषत्वाने साजरे केले जातात.
हिवाळ्यातली थंडी या दिवसांत स्थिरावलेली असते.ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने बच्चे कंपनीच्या आनंदाला उधाण आलेलं असतं. बाहेरगावी शहरांमध्ये नोकरीनिमित्त कामाला असणारे चाकरमानी, गावाकडची वाट धरतात. विदर्भात प्रामुख्याने कपाशीचे पीक असल्याने शेतातल्या पांढऱ्या सोन्याकडे बघून शेतकरी समाधानी आणि तृप्त झालेला असतो. इकडे शेतात कापूस वेचणीचा हंगाम असल्याने दिवाळीपूर्वी शेतमजुरांच्या हातात अल्पसा का असेना पैसा खुळखुळत असतो. वर्षभर कफल्लक आयुष्य जगणाऱ्या कष्टकऱ्यांच्या घरी हा दिवाळी सण संपन्नतेची स्वर्णीम लकेर घेऊन येत असतो.
घरापुढच्या ऐसपैस अंगणात, सडा-सारवण करून सकाळी रांगोळी घातली जाते.वर्षभर एकाच रंगाची रांगोळी घालणाऱ्या स्त्रिया, दिवाळीच्या दिवसांत मात्र आवर्जून रांगोळीत विविध रंग भरतांना दिसतात. सायंकाळी तर अंगणात रांगोळी घालण्याची जणू स्पर्धाच लागलेली दिसते.कुणाची रांगोळी मोठी,कुणाची रांगोळी अधिक सुंदर,याची चर्चा गावातील तमाम स्त्रिवर्गात असते.
बहुतेक घरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, सर्वार्थाने दिवाळी सण साजरा केला जातो.गावात या दिवसाला "मोठी दिवाळी"असंही म्हटलं जातं.घरात असलेल्या पैशा-अडक्याची व दाग -दागिन्यांची पूजा निष्ठेने व श्रद्धेने केली जाते.लहान थोर नवीन कपडे घालून मिरवतात.घरात गोडधोड केलं जातं.यात प्रामुख्याने, कोहळ्याचे बोंडं,अनारसे,रव्याचे वा बुंदीचे लाडू, शंकरपाळे इत्यादींचा समावेश होतो. शिवाय चकल्या,शेव,चिवडा व तत्सम फराळी पदार्थांची रेलचेलही असते. जिभेचे सर्व लाड या दिवसांत पुरविले जाते. दारात व अंगणात दिव्यांची आरास मांडली जाते. संपूर्ण गाव दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघते. आकाशातले तारेच जणू अंगणी विराजमान झाल्यासारखे भासतात.गावाकडच्या या दिव्यांच्या प्रकाशाची सर, शहरातल्या झगमगाटाला नाही,हे मात्र खरं.लहान मुलं,टिकल्या,रीळ, फुलझड्या तर मोठी मंडळी,लक्ष्मीबॉम्ब, सुतळीबॉम्ब,झाड,चकरी इत्यादी च्या साह्याने फटाके फोडून दिवाळीचा आनंद साजरा करतात.
गायगोंदणाच्या दिवशी शेतकरी वर्ग घरातील दुभत्या जनावरांना गेरूने रंगवितात.पूजा करून त्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. भाऊबीज हा दिवस,बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला दिवस.या दिवसाला गावात विशेष महत्त्व असते.लग्न झालेल्या गावातील मुली,माहेरच्या ओढीने सहकुटुंब गावात येतात.एकमेकांची ख्यालीखुशाली विचारली जाते. सुखदुःखाची देवाणघेवाण होते.बहीण भावाला ओवाळते.घरी लहान मुलांचा जणू कल्लाच असतो.आनंदाला उधाण आलेलं असतं.अनेक गावात मंडई उत्सव आयोजित केला जातो. करमणुकीचे कार्यक्रम, नात्यागोत्यातल्या, जुन्या जाणत्या मंडळींची भेट, घरोघरी पाहुणचार..असा भरगच्च आनंदोत्सव घेवून दिवाळी गावात येते."दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा"ही म्हण सार्थ करत,गावाकडची दिवाळी सर्व गावकऱ्यांच्या मनात आनंदाची पेरणी करून जाते,यात तिळमात्र शंका नाही.
Dt.10/11/2023
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा