मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

दिवाळी मिलन

 💥दिवाळी मिलन

(Just for Fun)




लोकनेते श्री.आ.बा. राजकारणे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी यावर्षी दिवाळी निमित्त एकत्र भेटण्याचं ठरवलं.दहावीनंतर प्रथमच ते एकमेकांना भेटणार होते.मात्र कामानिमित्त सर्वजण वेगवेगळ्या शहरात कार्यरत असल्याने,हे शक्य झालं नव्हतं.त्यामुळे,हे दिवाळी मिलन कुठे करायचं, याबद्दल त्यांची चर्चा सुरू झाली...


 'दिवाळी मिलनाला सर्वांनी बारामतीला यावं.मी सर्व मित्रांना माझ्या तर्फे घड्याळ भेट देईन.वरद काकांच्या गोल्डन ओक बंगल्यावर पार्टी करुया,जाम मजा येईल.' घड्याळाच्या कंपनीत काम करणारा सुजित आग्रहाने बोलला. याला मात्र हायकोर्टात वकिली करणाऱ्या,वीरेंद्रने स्पष्ट शब्दात नकार दिला.'सर्व मित्र नागपूरला आल्यास, मी सर्वांना पाठवडी रस्सा व सावजी चिकन खाऊ घालतो, मस्त माहोल करुया..काय बोलता मित्रांनो..',वीरेंद्र आवेशात बोलला.

 पेशाने चित्रकार असलेल्या विराजला व स्वतःचा फोटो स्टुडिओ असलेल्या उद्भवला यातलं काहीच रुचलं नाही...

'ते काही नाही..दहावीत असताना,तुम्ही आम्हाला गंडवून,फक्त भोलानाथला घेऊन  कशी मामलेदार मिसळ खाल्ली होती,हे आम्हाला चांगलं आठवतं..नव्हे हे लक्षात आहे'.उद्भव तावातावाने बोलला...

'ते काही नाही, यावेळी दिवाळी मिलन मुंबईला होणार म्हणजे होणार..कुणाचा बाप हे रोखू शकत नाही ' विराज बेभान होऊन बोलत होता..

बायोडिझेल कंपनीचा मालक असणारा बिपिन, पक्का खवय्या असल्याने व मुंबईचा वडापाव पुन्हा चाखायला मिळणार म्हणून लगेच तयार झाला.'अरे हो..हो,दिवाळी मिलन मुंबईलाच करुया..अजून तुझी अरेरावी करण्याची बालपणीची सवय गेली नाही वाटतं ' असे म्हणत, बिपिनने वीराजला डीवचलं.मग काय, वीरेंद्रही यासाठी तयार झाला.. सुजितला वाटलं, वरद काकांच्या नकळत,जीवाची मुंबई करून घेऊया.. म्हणून तोही राजी झाला.


 भोलानाथला वाटलं,की हजार रुपयाचं तिकीट काढून नागपूरला जाण्यापेक्षा, स्वतःच्या ऑटोने ठाण्याहून मुंबईला जाणं कधीही बरं.. त्यानेही संमती दर्शविली. अशाप्रकारे लोकनेते श्री.आ.बा. राजकारणे विद्यालयात शिकणाऱ्या या वर्ग मित्रांनी चर्चेअंती शिवाजी पार्कवर जमण्याचं निश्चित केलं.. ठरल्याप्रमाणे सर्व एकत्र आले. वीरेंद्रने सुतळी बॉम्बचा डबा सोबत आणला. बिपिन नागपूरच्या इतवारी मार्केट मधून इको फ्रेंडली फटाके घेऊन आला.सुजितने बारामतीहून फुलझडीचे पाकिट व रॉकेट आणले. विराज त्याच्या आवडीचा लक्ष्मी बॉम्ब घेऊन आला. तिकडे उद्भवने मिरची फटाके आणले. भोलानाथने चकरीचं पाकीट आणलं.फटाके फोडण्याची सुरुवात बिपीनने केली.बिपिनच्या इको फ्रेंडली फटाक्याने कुणालाही मजा आली नाही.मग सुजितने त्याचं रॉकेट बाहेर काढलं..'अरे,त्याची दिशा मंत्रालयाकडे कशाला करतोस?मंत्रालयाला आग लागली तर..?' असे म्हणत वीरेंद्रने रॉकेटची दिशा बदलली.'आता बघ, मी कसा सुतळी बॉम्ब फोडतो..व कसा उद्भवला घाबरवतो..' वीरेंद्र हातवारे करून बोलत होता..

.. ईकडे उद्भव  कॅमेऱ्याने दिवाळीचे क्षण टिपण्यात गर्क झाला होता..अचानक विरेंद्रने सुतळी बॉम्ब फोडला..त्याच्या आवाजाने उद्भवच्या छातीत धडकी भरली..' उद्भव,भिऊ नकोस,मी तुझ्या पाठीशी आहे..सुतळी बॉम्बपेक्षा भारी, लक्ष्मी बॉम्ब, माझ्याजवळ आहे.यांनी जास्तच त्रास दिला तर,आपण आबासाहेबांना सांगू.' विराजने उद्भवचे सांत्वन केले.एवढ्यात भोलानाथने चक्री पेटवली..ती विराज व उद्भवच्या पायाजवळ फिरू लागली..दोघांनी घाबरून एकमेकांना मिठी मारली..सुजित, वीरेंद्र,भोलानाथ व बिपिन,दोघांकडे पाहून हसू लागले..इकडे,विराज व उद्भव रागारागाने घरी निघून गेले...


'अरेच्चा..आपण दिवाळी फराळ केलाच नाही..उद्भव व विराज तर निघून गेले.दिवाळी मिलन करायला गेलो व दिवाळी विलाप करण्याची वेळ आली,असे वाटते'...बिपिन मधला वैदर्भीय माणूस जागा झाला.तेवढ्यात शिवाजी पार्कवर दोन मुलं फिरताना दिसली.वीरेंद्रने त्यांना त्यांची नावे विचारली.'माझे नाव विक्रमादित्य व हा समित.',असे विक्रमादित्य बारक्या आवाजात बोलला.'मग तुम्ही इथे एकटे का फिरत आहात?तुमचे पालक कुठे आहेत? मी माझ्या ऑटोने तुम्हाला घरी सोडून देवू का?' भोलानाथ  नेहमीप्रमाणे  मदतीच्या भावनेने बोलत होता..'काका आम्ही आमच्या बाबांसोबत इथे आलो होतो,आम्ही त्यांना शोधतोय,पण ते काही दिवस नाही.'.

..सुजितने पुणेरीबाणा दाखवत आपुलकीने चौकशी केली.' तुमच्या वडिलांचे नाव काय?'... मितभाषी असणारा समित मात्र लगेच उत्तरला,' उद्भव आकरे यांचा हा,विक्रमादित्य मुलगा आहे व विराज आकरे माझे वडील आहेत.'.

'अरे तुम्ही दोघं आमच्या मित्रांची मुलं आहात तर..इकडे या बाळांनो..,हा दिवाळी फराळ घ्या.. मी तुम्हाला घरी सोडून देतो..उद्भव व विराज जरा नाराज होवून घरी गेले.. तुम्ही त्यांची समजूत घालाल का?' भोलानाथ काकुळतीने बोलत होता..'हो काका,तुम्ही काही चिंता करू नका..तुमची मैत्री कायम राहावी,असेच आम्हाला वाटते.. तुमचा मेसेज एकदम परफेक्ट घरी पोचवतो..' रव्याच्या लाडवांवर ताव मारत,विक्रमादित्य बोलत होता.


'..बसा आता, ऑटोत..' भोलानाथ गिअर टाकत बोलला..' हॅप्पी दिवाळी,काका! '..हात उंचावून बाय बाय करत दोन्ही मुलं आनंदाने घरी निघुन गेली..बिपिन व वीरेंद्र,कौतुकाने बराच वेळ रस्त्याकडे पाहत राहिले..



✍️श्री.चंद्रभान अरुण शोभणे


Dt.21/10/2025

सोमवार, १३ ऑक्टोबर, २०२५

प्रितम


 🍁प्रितम


..बऱ्याच दिवसानंतर,मला रवीचा फोन आला. गाव सोडून सात - आठ वर्षे झाले असतील.यादरम्यान रवीने फोन केल्याचे मला तरी आठवत नव्हते.कधी गावाला गेलो तर त्याची भेट व्हायची. गावाकडच्या मित्रांचं कसं चाललंय, याबाबत मी त्याच्याशी चौकशी करायचो.तोही त्याच्यापरीने सगळ्यांविषयी सांगायचा.आज मात्र त्याच्या आवाजावरून काहीतरी विपरीत घडल्याचं मला जाणवलं."अरे, आपला प्रीतम गेला.."असे म्हणत तो रडू लागला. मीही काहीक्षण नि:शब्द झालो. काय बोलावे,मला काही सुचत नव्हतं. माझेही डोळे पाणावले.काय व कसं घडलं,हे विचारण्याचं मी धाडस करू शकलो नाही.


...अचानक प्रितमचं देखणं रूप माझ्या नजरेपुढे उभं राहीलं.वयाच्या अवघ्या तिशीत तो या जगाचा निरोप घेईल,असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. एका दलित शिक्षक दांपत्याच्या पोटी जन्मलेला प्रितम, नावाप्रमाणेच दोस्ता-मित्रांत प्रेमाची पेरणी करणारा होता. आई-वडिलांच्या नोकरीच्या अडचणींमुळे, बालपणापासूनच त्याला आजोळी ठेवण्याचे त्याच्या पालकांनी ठरविले. सुरुवातीचे काही दिवस वगळता, तो जास्तीत जास्त वेळ आजी-आजोबांच्या मायेच्या सावलीत वाढला.रूढार्थाने त्याला आई-वडिलांचे प्रेम काही लाभले नाही. आजी-आजोबा सुद्धा शिक्षक, शिवाय ते वारकरी संप्रदायाला मानणारे.त्यामुळे प्रितमवर बुद्धांच्या विचारांपेक्षा,विठ्ठल भक्तीचा प्रभाव कायमच जास्त राहिला.भूगावातील जिल्हा परिषद शाळेत त्याचं प्राथमिक शिक्षण झालं.आजी- आजोबांच्या अतिशय लाडात वाढलेला प्रितम, तसा अभ्यासात हुशार.वर्गात प्रथम येणारा नसला,तरी थोड्या अभ्यासाने उत्तम मार्क्स घेणारा.


..मात्र यादरम्यान त्याच्यात काहीतरी विचित्र बदल घडू लागला.त्याच्या वर्गमित्रांना हा बदल जाणवू लागला. अलीकडे प्रितम, काहीसा मुलींप्रमाणे वागतो..बोलतो.. व चालतो..,असे सगळ्यांना वाटू लागले.कदाचित प्रितमला हे जाणवत नसावं.शिवाय आजी-आजोबा त्याच्यावरील  प्रेमापोटी त्याकडे दुर्लक्ष करू लागले. दिवसांमागून दिवस जात होते.प्रितम आता सातवीत गेला.मित्रांच्या गळ्यात कारण नसताना हात घालणं..त्यांच्या गालांना हाताने स्पर्श करणं.. केसावरून हात फिरवणं.. यांसारख्या गोष्टी तो करू लागला.त्याला याचं काहीच वावगं वाटत नव्हतं.मित्रही त्याची याबाबत टिंगल-टवाळी करू लागले.वर्गातील मुलीही त्याला हसायच्या.असं असलं तरी मुलींशी  प्रितम अदबीनं वागायचा.त्याच्या आवाजात वेगळंच आर्जव होतं.वर्गातील मुली त्याच्याशी बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या.जणू प्रितम आपल्यातलाच एक  आहे,असं त्यांना वाटायचं...दुसरीकडे मुलांना मात्र हा गडी आपल्यातला नाही, असं वाटायचं. आयुष्याच्या या वळणावर प्रितमचा, जगावेगळा संघर्ष सुरू होता.


..आता प्रितमने किशोर वयात प्रवेश केला.दहावीचं वर्ष होतं.प्रितमचं असणं.. म्हणजे फुल टाइमपास, असं समीकरण या काळात झालं होतं. तोही हे सगळं हसण्यावारी न्यायचा.एव्हाना त्याला त्याच्यातल्या वेगळेपणाची स्पष्ट जाणीव झाली होती.त्याचा त्याने खुलेपणाने स्वीकार केला होता.त्यामुळे एखाद्याने त्याची चेष्टा केली तर तो दुप्पट प्रतिसाद द्यायचा व समोरच्याला चार लोकांत खजील करायचा.याच टप्प्यावर माझी व प्रितमची ओळख झाली.सुरुवातीला मला त्याच्या वागण्या- बोलण्याबद्दल पुरेशी कल्पना नव्हती.  मात्र मित्रांनी, सर्वप्रकार सांगितल्यानंतर, त्याच्यातलं वेगळेपण मीही स्वीकारलं.अधेमधे तो भेटायचा.बऱ्याच गोष्टींवर आम्ही भरभरून बोलायचो.


..दरम्यान प्रितम दहावी उत्तीर्ण झाला.अकरावीला त्याने तालुक्याच्या गावी प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये प्रितम आहे म्हटल्यावर, धमाल होणारच.. तोही त्याच्या वागण्या- बोलण्यातून त्याचं वेगळेपण दाखविण्याची एकही संधी सोडायचा नाही. वर्गातील मित्र- मैत्रिणी जरी त्याची चेष्टा करीत असले, तरी तो सगळ्यांच्या गळ्यातील ताईत होता.प्रेमाच्या धाग्यात सर्व मित्रांना प्रितमने बांधले होते. एरवी मित्रांनाही त्याची सवय झाली होती.ग्रामीण भागात लहानाचं मोठं होताना,प्रितम आपलं भावविश्व घेऊन जगत होता.


... प्रितमला वाचनाचा प्रचंड वेड होतं.मराठी साहित्य त्याच्यासाठी जीव की प्राण.पुढे बीएला मराठी साहित्य हा विषय घेतल्याने,त्याच्या वाचनात वैविध्य आलं.वि.स.खांडेकर, व.पु.काळे,ना.सी. फडके,पु.ल.देशपांडे, केशवसुत इत्यादी. साहित्यिकांच्या साहित्याचा त्याने अभ्यास केला. त्यामुळे त्याच्या भाषेला वेगळीच धार आली.तो आता लिखाण करू लागला..,कविता लिहू लागला.., परिसंवाद- वादविवाद स्पर्धांमध्ये विद्यापीठस्तरावर भाग घेऊ लागला.., पारितोषिके मिळवू लागला.. त्याच्यातल्या तरल मनाला कवितेमुळे एक ऊब मिळाली. कोणत्याही विषयावर बोलण्या इतपत,त्याने वाणीवर हुकूमत मिळवली.


.. प्रितम मला पुन्हा भेटला.निमित्त होतं,नागपूरातील एका संस्थेने आयोजित केलेल्या काव्यलेखन स्पर्धेचं.. वीस- बावीस वर्षांची तरुण मुलं या स्पर्धेत सहभागी होती.त्यामुळे त्यांच्या कवितेत वैविध्य व प्रगल्भता जाणवत नव्हती. इथे मात्र प्रितमने, 'गणिका ' नावाची कविता सादर केली. एका वैश्येचं दुःख त्याने कवितेतून मांडलं. त्याच्या रसाळ व हळुवार वाणीतून ती कविता ऐकताना,सर्व श्रोत्यांचं मन गलबलून आलं.जणू प्रितमने या कवितेच्या माध्यमातून,स्वतःच जीवनच उलघडलं होतं.स्पर्धेचा निकाल जाहीर झाला व अर्थातच प्रितमला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.मला वाटलं,इथून पुढे प्रितम,एक प्रख्यात कवी होणार.मात्र नियतीला काही औरच मंजूर होतं..


.. बीएच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला, पेपर सोडवतांना, त्याच्याजवळ कागदाचा एक चिटोरा सापडला व याकारणाने पर्यवेक्षकांनी त्याला पेपर सोडवू दिला नाही.त्यामुळे तो, त्यावर्षी बीए पूर्ण करू शकला नाही. हळव्या प्रितमसाठी हा मोठा आघात होता.त्याने त्याक्षणी ठरवलं की,मी यापुढे शिक्षण घेणार नाही.घरी आल्यानंतर त्याने आजी-आजोबा व आई-वडिलांना याबाबत सांगितलं. "मी आता कीर्तनकार होणार.. व आळंदीला जाऊन कीर्तनाचं प्रशिक्षण घेणार" त्याच्या हट्टापोटी,अनिच्छेने का असेना,घरच्यांनी त्यासाठी होकार दिला.आळंदी येथे रीतसर कीर्तनाचं प्रशिक्षण प्रितमने पूर्ण केलं.अनेक अभंग त्याला तोंडपाठ होते. रामायण- महाभारतातील किस्से,तो त्याच्या रसाळ वाणीने रंगवून सांगायचा. मराठी भाषेवर त्याचं तसंही प्रभुत्व होतच.आता प्रीतम ह.भ.प.प्रितम महाराज म्हणून पंचक्रोशीत ओळखला जाऊ लागला.गावातील मंडळांमध्ये त्याची कीर्तनं होऊ लागली.नव्या पिढीतील असल्याने,प्रितमने त्याच्या कीर्तनात आधुनिक काळातील प्रश्नांची सांगड घातली. गमतीदार किस्स्यांच्या संगतीने तो समाज प्रबोधन करू लागला. त्याच्या कीर्तनाला गर्दी होऊ लागली. विदर्भातील अनेक जिल्ह्यातून लोकं त्याला कीर्तनासाठी बोलवू  लागले.हजारो गावांमध्ये त्याचं कीर्तन होऊ लागलं. गावातील मोठमोठाले आसामी व नेते त्याच्या पायांवर माथा टेकवू लागले. प्रितम आता खुश होता. जनमाणसाच्या गराड्यात वावरणं, त्याला तसंही आवडत होतं.त्याला आता अध्यात्माची ओढ लागली होती. अगदी मध्यप्रदेशातल्या मराठी भागामधूनही प्रीतमला बोलावणे येऊ लागले.त्याची लोकप्रियता आता महाराष्ट्राची सीमा ओलांडू लागली. आता पुन्हा मला वाटलं की,प्रितम महाराष्ट्र गाजवणार.. एक नामवंत कीर्तनकार होणार.. इथे पुन्हा नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.


...अचानक प्रितमची एका प्रसंगी इस्कॉनच्या कृष्णभक्ताशी भेट झाली व तो इस्कॉन संप्रदायाकडे आकर्षित झाला.स्वामी प्रभुपाद यांनी स्थापन केलेल्या इस्कॉन संप्रदायाची शिकवण त्याला आवडू लागली. कृष्णभक्तीची ओढ खुणावू लागली. कृष्ण सर्वव्यापी आहे.तो सर्व शक्तिमान आहे,ही त्याची पक्की समज झाली. तो इस्कॉन संप्रदायाशी जोडला गेला.कृष्णमंदिरात तो नित्यनेमाने जाऊ लागला.तो आता जेव्हा भेटायचा तेव्हा कृष्णाविषयी भरभरून बोलायचा.मी आता माझं उर्वरित आयुष्य कृष्णाच्या चरणी समर्पित करणार आहे,असं सांगायचा.मी त्याच्याशी याबाबत वाद घालायचो.तो माझं म्हणणं खोडायचा.तू स्वतः अनुभवल्याशिवाय या विषयावर बोलू नकोस,असं म्हणायचा. मित्रप्रेमापोटी मी विषय बदलायचो. यानंतर मात्र माझी व प्रितमची कधीच प्रत्यक्ष भेट झाली नाही.मित्रांना त्याच्याविषयी विचारायचो.ते त्यांना माहीत असलेलं सांगायचे. एक तिशीतला तरुण अचानक शिक्षण सोडतो काय.. आध्यात्मिक मार्ग निवडतो काय.. व पुढे कृष्णभक्ति कडे वळतो काय.. सगळंच कसं अकल्पनीय वाटायचं. प्रितम मात्र त्याच्या धुंदीत जगत होता.हा मार्ग त्याने स्वतः निवडला होता.एरवी त्याच्या वेगळेपणामुळे, त्याच्याकडे यापेक्षा सुरक्षित व सन्मान देणारा मार्गही त्याच्या दृष्टीने नसावा.म्हणूनच त्याने हा मार्ग निवडला असावा,अशी मी माझी समजूत करून घेतली.


..आज जेव्हा रवीचा फोन आला व प्रितम या जगात नाही,असं समजल्यावर प्रितमचा संपूर्ण जीवन प्रवास डोळ्यांसमोर  नकळत तरळून गेला.गावाकडे चौकशी केली तेव्हा कळलं.. प्रितमच्या पायाला गँगरीन झालं होतं.त्याने त्याकडे बरेच दिवस दुर्लक्ष केलं.दुर्लक्ष का केलं?हे अजूनही माझ्यासाठी अनुत्तरीत कोडं आहे.पुढे इन्फेक्शन वाढलं.त्याला बॉडी शॉक येऊन,त्याचा मृत्यू झाला.प्रितमच्या वादळी आयुष्याचा असा अनपेक्षित शेवट होईल,असं वाटलं नव्हतं. अजूनही प्रितम 'गणिका ' या त्याच्या कवितेतून.. त्याच्या मधाळ कीर्तनातून..त्याच्या हसण्यातून.. वागण्यातून.. बोलण्यातून.. त्याच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला खुणावत असतो.. सुखावत असतो.. हे मात्र नक्की...!



✍️श्री.चंद्रभान अरुण शोभणे


Dt.12/10/2025

रविवार, १० ऑगस्ट, २०२५

शंभरची नोट

 


🍁शंभरची नोट💵


15 ऑगस्ट म्हणजेच,स्वातंत्र्य दिनाचा उत्साह शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये ओसंडून वाहत होता.आदल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेचा गणवेश स्वच्छ धुऊन व इस्त्री करून घेतला. कित्येकांनी तर खिशाला लावायला व हातात पकडायला नजीकच्या दुकानातून तिरंगा खरेदी केला.काहींनी भाषणाची, समूहगीताची, तर काहींनी प्रभातफेरीत म्हणावयाची घोषवाक्ये,अगदी तोंडपाठ करून घेतली.शाळेच्या प्रांगणात पताका लावण्याची मुलांची लगबग बघण्यासारखी होती.शिक्षकही उत्साहाने एक-एक काम उरकत होते. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील, झेंडावंदन आटोपल्यावर,प्रभातफेरी गांधी चौकापर्यंत जाणार होती.गांधी चौकात गावातील सर्व खाजगी व जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी एकत्र यायचे.तेथील झेंडावंदन झाल्यानंतर,गावातील बाजार चौकात स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा पार पडायचा. एकंदरीत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गावात चैतन्यमय वातावरण असायचे.

  आज 15 ऑगस्ट रोजी,ग्रामपंचायत व शाळेतील झेंडावंदनाचा कार्यक्रम, ठरल्याप्रमाणे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. बँड पथकाच्या साथीने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बच्चे कंपनी, रांगेने व शिस्तबद्धरित्या प्रभात फेरीत सहभागी झाली होती.स्वच्छ व नीटनेटका गणवेश,हातात कागदी तिरंगा झेंडा,चेहऱ्यावर आनंद व घोषवाक्य म्हणत, विद्यार्थी गावातील मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करीत होते. रस्त्याच्या कडेला उभे असलेले गावातील नागरिक व पालक मोठ्या कौतुकाने विद्यार्थ्यांकडे बघत होते.त्यामुळे बँड पथकातील विद्यार्थ्यांना आणखीनच हुरूप चढत होता. बँड पथकाच्या पुढे इयत्ता चौथीचा आयुष मोठ्या दिमाखात,कापडी तिरंगा झेंडा मिरवत चालत होता. छातीजवळ झेंड्याचा दांडा धरून,आयुषची पाऊले बँडच्या तालावर एका लयीत पडत होती. एखाद्या सैन्याच्या आवेशात त्याची आगेकूच सुरू होती. त्याच्या नेतृत्वात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची प्रभातफेरी गांधी चौकाकडे निघाली होती.

   इयत्ता दुसरीच्या स्मितचे मात्र राहून- राहून,आयुषच्या  हातातील तिरंगी झेंड्याकडे लक्ष जात होते.वयाने लहान असल्याने त्याला आयुषप्रमाणे, प्रभातफेरीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नव्हती. स्मितचे बालमन मात्र हे मानायला मुळीच तयार नव्हते.कधी  तिरंगी झेंडा हाती पकडतो,असे स्मितला झाले होते. मजल-दरमजल करत,चिमुकली पाऊले गांधी चौकात पोहोचली. शाळेच्या शिक्षकांनी  मुलांना रांगेत उभे राहण्याच्या सूचना दिल्या.गावातील खाजगी शाळांची मुलं अजूनही गांधी चौकात गोळा व्हायची होती. नेहमीप्रमाणे जिल्हा परिषद शाळांची मुलेच सर्वात आधी गांधी चौकात पोहोचली होती. लहानग्या विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने संपूर्ण चौक गजबजून गेला होता.

  एवढ्यात स्मितचे खाली जमिनीवर पडलेल्या कागदी चिटोऱ्याकडे लक्ष गेले.तो जवळ जाऊन बघतो तर काय,त्याला ती एक नोट असल्याचे समजले. ओझरत्या नजरेने ती नोट त्याने न्याहाळली. त्यावरील अंक त्याने लगेच ओळखले. "अरे!ही तर शंभरची नोट आहे." क्षणभर स्मितला वाटलं की, ही शंभरची नोट आपल्या खिशात ठेवावी व ही नोट सापडल्याचे कुणालाही सांगू नये.दुसऱ्या दिवशी हे पैसे खाऊसाठी खर्च करावे.मस्त मजा करावी...मात्र दुसऱ्याच क्षणी,असे न करता, स्मितने शंभर रुपयाची नोट मला दिली."सर,ही घ्या,शंभर रुपयाची नोट.. मला चौकात सापडली." स्मितचं हे वागणं बघुन मला त्याचं प्रचंड कौतुक वाटलं.दुसरीत शिकणाऱ्या स्मित सारख्या मुलासाठी शंभर रुपयाची नोट म्हणजे फार मोठी रक्कम..या बालवयात बरीच मुलं पैसे सापडले की कुणाला सहसा सांगत नाहीत.. खाऊसाठी खर्च करतात.मात्र स्मितने लहान वयात दाखविलेली  प्रामाणिकता,अभिमानास्पद वाटली. मी स्मितला जवळ बोलावलं व त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली."स्मित,तुझा प्रामाणिकपणा पाहून मला तुझा फार अभिमान वाटतो.तुला काय हवं ते सांग?"मी  म्हणालो. "सर,मला आयुषप्रमाणे, तिरंगा झेंडा माझ्या हातात घ्यायचा आहे.बाकी मला काही नको."स्मित सहज बोलून गेला."अरे बस,एवढेच." मी स्मितला म्हणालो.मी लगेच आयुषला बोलावलं व  तिरंगा झेंडा स्मितच्या हाती द्यायला सांगितलं. स्मितने हातात तिरंगा झेंडा पकडताच सर्व मुलं त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागली.स्मितच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसत होती.नावाप्रमाणे स्मितच्या चेहऱ्यावर गोड स्मितहास्य उमटलं.त्याचा चेहरा आनंदाने उजळून निघाला.आपल्या प्रिय देशाचा राष्ट्रध्वज,हा बालवीर अभिमानाने मिरवू लागला...


..त्या शंभरच्या नोटेपेक्षा आयुष्यभर साथ देणारं प्रामाणिकपणाचं.. इमानदारीचं.. लाख मोलाचं ऐश्वर्य त्या दिवशी स्मितने कमावलं,हे नक्की..


✍️श्री.चंद्रभान अरुणजी शोभणे

(शिक्षण विस्तार अधिकारी,

पंचायत समिती,हिंगणा)


Dt.10/08/2025

सोमवार, ३१ मार्च, २०२५

गनिमीकावा

 

      गनिमीकावा




संकटे बहु येतील,

हरणे तुला ठाव नाही..

कोंडीत सापडाया,

गड्या तू कुणाचा साव नाही..!!

    भेटतील सरडे, 

    पदोपदी तुला रे..

    कुंपणापलिकडे,

    त्यांची धाव नाही..!!

पाठीत खंजीर खुपसाया,

टपलेत वैरी..

झेलू न शकशील तू,

असा घाव नाही..!!

      तू चाल तुझ्या ऐटीत,

      गाऊनिया गीत..

      तुला जिंकणारा,

      अद्याप डाव नाही..!!

रविवार, ३० मार्च, २०२५

सुखाची तोरणे


 🍁सुखाची तोरणे



स्वप्नांची व्हावी पूर्ती,

भरो सुखाची रांजणे..

नववर्षी यावे आकाशी,

सृजनाचे ते चांदणे..!!


अंधार मनीचा दूर व्हावा,

यावे माणुसकीने वागणे..

सौख्य नांदो मनोमनी

हेच आहे मागणे..!!

 

पेरले जरी कुणी,

वाटेवरती दाभणे..

जोडावी सदोदित माणसे,

व्हावी ही सुखाची साधने..!!

 

अपूर्ण हे पूर्ण व्हावे,

कुणा न पडो थांबणे..

गाठूनीया खिंडीत यावे,

असत्याला डांबणे..!!


 रंगात रंग मिसळून जावा,

उजळावी सर्वांची जीवने..

आनंदाची गुढी उंचावूनी,

दारी डोलावी सुखाची तोरणे..!!



Best of glocal marathi

दिवाळी मिलन

 💥दिवाळी मिलन (Just for Fun) लोकनेते श्री.आ.बा. राजकारणे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी यावर्षी दिवाळी निमित्त एकत्र भेटण्याचं ठरवलं.दह...