🍁शंभरची नोट💵
15 ऑगस्ट म्हणजेच,स्वातंत्र्य दिनाचा उत्साह शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये ओसंडून वाहत होता.आदल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेचा गणवेश स्वच्छ धुऊन व इस्त्री करून घेतला. कित्येकांनी तर खिशाला लावायला व हातात पकडायला नजीकच्या दुकानातून तिरंगा खरेदी केला.काहींनी भाषणाची, समूहगीताची, तर काहींनी प्रभातफेरीत म्हणावयाची घोषवाक्ये,अगदी तोंडपाठ करून घेतली.शाळेच्या प्रांगणात पताका लावण्याची मुलांची लगबग बघण्यासारखी होती.शिक्षकही उत्साहाने एक-एक काम उरकत होते. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील, झेंडावंदन आटोपल्यावर,प्रभातफेरी गांधी चौकापर्यंत जाणार होती.गांधी चौकात गावातील सर्व खाजगी व जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी एकत्र यायचे.तेथील झेंडावंदन झाल्यानंतर,गावातील बाजार चौकात स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा पार पडायचा. एकंदरीत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गावात चैतन्यमय वातावरण असायचे.
आज 15 ऑगस्ट रोजी,ग्रामपंचायत व शाळेतील झेंडावंदनाचा कार्यक्रम, ठरल्याप्रमाणे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. बँड पथकाच्या साथीने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बच्चे कंपनी, रांगेने व शिस्तबद्धरित्या प्रभात फेरीत सहभागी झाली होती.स्वच्छ व नीटनेटका गणवेश,हातात कागदी तिरंगा झेंडा,चेहऱ्यावर आनंद व घोषवाक्य म्हणत, विद्यार्थी गावातील मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करीत होते. रस्त्याच्या कडेला उभे असलेले गावातील नागरिक व पालक मोठ्या कौतुकाने विद्यार्थ्यांकडे बघत होते.त्यामुळे बँड पथकातील विद्यार्थ्यांना आणखीनच हुरूप चढत होता. बँड पथकाच्या पुढे इयत्ता चौथीचा आयुष मोठ्या दिमाखात,कापडी तिरंगा झेंडा मिरवत चालत होता. छातीजवळ झेंड्याचा दांडा धरून,आयुषची पाऊले बँडच्या तालावर एका लयीत पडत होती. एखाद्या सैन्याच्या आवेशात त्याची आगेकूच सुरू होती. त्याच्या नेतृत्वात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची प्रभातफेरी गांधी चौकाकडे निघाली होती.
इयत्ता दुसरीच्या स्मितचे मात्र राहून- राहून,आयुषच्या हातातील तिरंगी झेंड्याकडे लक्ष जात होते.वयाने लहान असल्याने त्याला आयुषप्रमाणे, प्रभातफेरीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नव्हती. स्मितचे बालमन मात्र हे मानायला मुळीच तयार नव्हते.कधी तिरंगी झेंडा हाती पकडतो,असे स्मितला झाले होते. मजल-दरमजल करत,चिमुकली पाऊले गांधी चौकात पोहोचली. शाळेच्या शिक्षकांनी मुलांना रांगेत उभे राहण्याच्या सूचना दिल्या.गावातील खाजगी शाळांची मुलं अजूनही गांधी चौकात गोळा व्हायची होती. नेहमीप्रमाणे जिल्हा परिषद शाळांची मुलेच सर्वात आधी गांधी चौकात पोहोचली होती. लहानग्या विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने संपूर्ण चौक गजबजून गेला होता.
एवढ्यात स्मितचे खाली जमिनीवर पडलेल्या कागदी चिटोऱ्याकडे लक्ष गेले.तो जवळ जाऊन बघतो तर काय,त्याला ती एक नोट असल्याचे समजले. ओझरत्या नजरेने ती नोट त्याने न्याहाळली. त्यावरील अंक त्याने लगेच ओळखले. "अरे!ही तर शंभरची नोट आहे." क्षणभर स्मितला वाटलं की, ही शंभरची नोट आपल्या खिशात ठेवावी व ही नोट सापडल्याचे कुणालाही सांगू नये.दुसऱ्या दिवशी हे पैसे खाऊसाठी खर्च करावे.मस्त मजा करावी...मात्र दुसऱ्याच क्षणी,असे न करता, स्मितने शंभर रुपयाची नोट मला दिली."सर,ही घ्या,शंभर रुपयाची नोट.. मला चौकात सापडली." स्मितचं हे वागणं बघुन मला त्याचं प्रचंड कौतुक वाटलं.दुसरीत शिकणाऱ्या स्मित सारख्या मुलासाठी शंभर रुपयाची नोट म्हणजे फार मोठी रक्कम..या बालवयात बरीच मुलं पैसे सापडले की कुणाला सहसा सांगत नाहीत.. खाऊसाठी खर्च करतात.मात्र स्मितने लहान वयात दाखविलेली प्रामाणिकता,अभिमानास्पद वाटली. मी स्मितला जवळ बोलावलं व त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली."स्मित,तुझा प्रामाणिकपणा पाहून मला तुझा फार अभिमान वाटतो.तुला काय हवं ते सांग?"मी म्हणालो. "सर,मला आयुषप्रमाणे, तिरंगा झेंडा माझ्या हातात घ्यायचा आहे.बाकी मला काही नको."स्मित सहज बोलून गेला."अरे बस,एवढेच." मी स्मितला म्हणालो.मी लगेच आयुषला बोलावलं व तिरंगा झेंडा स्मितच्या हाती द्यायला सांगितलं. स्मितने हातात तिरंगा झेंडा पकडताच सर्व मुलं त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागली.स्मितच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसत होती.नावाप्रमाणे स्मितच्या चेहऱ्यावर गोड स्मितहास्य उमटलं.त्याचा चेहरा आनंदाने उजळून निघाला.आपल्या प्रिय देशाचा राष्ट्रध्वज,हा बालवीर अभिमानाने मिरवू लागला...
..त्या शंभरच्या नोटेपेक्षा आयुष्यभर साथ देणारं प्रामाणिकपणाचं.. इमानदारीचं.. लाख मोलाचं ऐश्वर्य त्या दिवशी स्मितने कमावलं,हे नक्की..
✍️श्री.चंद्रभान अरुणजी शोभणे
(शिक्षण विस्तार अधिकारी,
पंचायत समिती,हिंगणा)
Dt.10/08/2025