💥दिवाळी मिलन
(Just for Fun)
लोकनेते श्री.आ.बा. राजकारणे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी यावर्षी दिवाळी निमित्त एकत्र भेटण्याचं ठरवलं.दहावीनंतर प्रथमच ते एकमेकांना भेटणार होते.मात्र कामानिमित्त सर्वजण वेगवेगळ्या शहरात कार्यरत असल्याने,हे शक्य झालं नव्हतं.त्यामुळे,हे दिवाळी मिलन कुठे करायचं, याबद्दल त्यांची चर्चा सुरू झाली...
'दिवाळी मिलनाला सर्वांनी बारामतीला यावं.मी सर्व मित्रांना माझ्या तर्फे घड्याळ भेट देईन.वरद काकांच्या गोल्डन ओक बंगल्यावर पार्टी करुया,जाम मजा येईल.' घड्याळाच्या कंपनीत काम करणारा सुजित आग्रहाने बोलला. याला मात्र हायकोर्टात वकिली करणाऱ्या,वीरेंद्रने स्पष्ट शब्दात नकार दिला.'सर्व मित्र नागपूरला आल्यास, मी सर्वांना पाठवडी रस्सा व सावजी चिकन खाऊ घालतो, मस्त माहोल करुया..काय बोलता मित्रांनो..',वीरेंद्र आवेशात बोलला.
पेशाने चित्रकार असलेल्या विराजला व स्वतःचा फोटो स्टुडिओ असलेल्या उद्भवला यातलं काहीच रुचलं नाही...
'ते काही नाही..दहावीत असताना,तुम्ही आम्हाला गंडवून,फक्त भोलानाथला घेऊन कशी मामलेदार मिसळ खाल्ली होती,हे आम्हाला चांगलं आठवतं..नव्हे हे लक्षात आहे'.उद्भव तावातावाने बोलला...
'ते काही नाही, यावेळी दिवाळी मिलन मुंबईला होणार म्हणजे होणार..कुणाचा बाप हे रोखू शकत नाही ' विराज बेभान होऊन बोलत होता..
बायोडिझेल कंपनीचा मालक असणारा बिपिन, पक्का खवय्या असल्याने व मुंबईचा वडापाव पुन्हा चाखायला मिळणार म्हणून लगेच तयार झाला.'अरे हो..हो,दिवाळी मिलन मुंबईलाच करुया..अजून तुझी अरेरावी करण्याची बालपणीची सवय गेली नाही वाटतं ' असे म्हणत, बिपिनने वीराजला डीवचलं.मग काय, वीरेंद्रही यासाठी तयार झाला.. सुजितला वाटलं, वरद काकांच्या नकळत,जीवाची मुंबई करून घेऊया.. म्हणून तोही राजी झाला.
भोलानाथला वाटलं,की हजार रुपयाचं तिकीट काढून नागपूरला जाण्यापेक्षा, स्वतःच्या ऑटोने ठाण्याहून मुंबईला जाणं कधीही बरं.. त्यानेही संमती दर्शविली. अशाप्रकारे लोकनेते श्री.आ.बा. राजकारणे विद्यालयात शिकणाऱ्या या वर्ग मित्रांनी चर्चेअंती शिवाजी पार्कवर जमण्याचं निश्चित केलं.. ठरल्याप्रमाणे सर्व एकत्र आले. वीरेंद्रने सुतळी बॉम्बचा डबा सोबत आणला. बिपिन नागपूरच्या इतवारी मार्केट मधून इको फ्रेंडली फटाके घेऊन आला.सुजितने बारामतीहून फुलझडीचे पाकिट व रॉकेट आणले. विराज त्याच्या आवडीचा लक्ष्मी बॉम्ब घेऊन आला. तिकडे उद्भवने मिरची फटाके आणले. भोलानाथने चकरीचं पाकीट आणलं.फटाके फोडण्याची सुरुवात बिपीनने केली.बिपिनच्या इको फ्रेंडली फटाक्याने कुणालाही मजा आली नाही.मग सुजितने त्याचं रॉकेट बाहेर काढलं..'अरे,त्याची दिशा मंत्रालयाकडे कशाला करतोस?मंत्रालयाला आग लागली तर..?' असे म्हणत वीरेंद्रने रॉकेटची दिशा बदलली.'आता बघ, मी कसा सुतळी बॉम्ब फोडतो..व कसा उद्भवला घाबरवतो..' वीरेंद्र हातवारे करून बोलत होता..
.. ईकडे उद्भव कॅमेऱ्याने दिवाळीचे क्षण टिपण्यात गर्क झाला होता..अचानक विरेंद्रने सुतळी बॉम्ब फोडला..त्याच्या आवाजाने उद्भवच्या छातीत धडकी भरली..' उद्भव,भिऊ नकोस,मी तुझ्या पाठीशी आहे..सुतळी बॉम्बपेक्षा भारी, लक्ष्मी बॉम्ब, माझ्याजवळ आहे.यांनी जास्तच त्रास दिला तर,आपण आबासाहेबांना सांगू.' विराजने उद्भवचे सांत्वन केले.एवढ्यात भोलानाथने चक्री पेटवली..ती विराज व उद्भवच्या पायाजवळ फिरू लागली..दोघांनी घाबरून एकमेकांना मिठी मारली..सुजित, वीरेंद्र,भोलानाथ व बिपिन,दोघांकडे पाहून हसू लागले..इकडे,विराज व उद्भव रागारागाने घरी निघून गेले...
'अरेच्चा..आपण दिवाळी फराळ केलाच नाही..उद्भव व विराज तर निघून गेले.दिवाळी मिलन करायला गेलो व दिवाळी विलाप करण्याची वेळ आली,असे वाटते'...बिपिन मधला वैदर्भीय माणूस जागा झाला.तेवढ्यात शिवाजी पार्कवर दोन मुलं फिरताना दिसली.वीरेंद्रने त्यांना त्यांची नावे विचारली.'माझे नाव विक्रमादित्य व हा समित.',असे विक्रमादित्य बारक्या आवाजात बोलला.'मग तुम्ही इथे एकटे का फिरत आहात?तुमचे पालक कुठे आहेत? मी माझ्या ऑटोने तुम्हाला घरी सोडून देवू का?' भोलानाथ नेहमीप्रमाणे मदतीच्या भावनेने बोलत होता..'काका आम्ही आमच्या बाबांसोबत इथे आलो होतो,आम्ही त्यांना शोधतोय,पण ते काही दिवस नाही.'.
..सुजितने पुणेरीबाणा दाखवत आपुलकीने चौकशी केली.' तुमच्या वडिलांचे नाव काय?'... मितभाषी असणारा समित मात्र लगेच उत्तरला,' उद्भव आकरे यांचा हा,विक्रमादित्य मुलगा आहे व विराज आकरे माझे वडील आहेत.'.
'अरे तुम्ही दोघं आमच्या मित्रांची मुलं आहात तर..इकडे या बाळांनो..,हा दिवाळी फराळ घ्या.. मी तुम्हाला घरी सोडून देतो..उद्भव व विराज जरा नाराज होवून घरी गेले.. तुम्ही त्यांची समजूत घालाल का?' भोलानाथ काकुळतीने बोलत होता..'हो काका,तुम्ही काही चिंता करू नका..तुमची मैत्री कायम राहावी,असेच आम्हाला वाटते.. तुमचा मेसेज एकदम परफेक्ट घरी पोचवतो..' रव्याच्या लाडवांवर ताव मारत,विक्रमादित्य बोलत होता.
'..बसा आता, ऑटोत..' भोलानाथ गिअर टाकत बोलला..' हॅप्पी दिवाळी,काका! '..हात उंचावून बाय बाय करत दोन्ही मुलं आनंदाने घरी निघुन गेली..बिपिन व वीरेंद्र,कौतुकाने बराच वेळ रस्त्याकडे पाहत राहिले..
✍️श्री.चंद्रभान अरुण शोभणे
Dt.21/10/2025

