शुक्रवार, ४ जून, २०२१

आम्ही नागपूरकर,भाग-3 (नागपूरचं हवामान)


"नागपूर" नाव घेताच, नागपूर बाहेरच्या लोकांची एकच प्रतिक्रिया येते,ती म्हणजे नागपूरचं "कडक उन्ह"."बोले तो एकदम कड$$क".तसं बघायला गेल्यास,नागपूरचा उन्हाळा,पुणे-मुंबई वाल्यांच्या नेहमीच चेष्टेचा विषय होतो. 'काय राव,तुमच्या नागपूरला किती कडक उन्हाळा ?तुम्ही राहतातच कसे ?असे डायलॉग वारंवार ऐकून आम्हा नागपूरकरांचे कान विटलेले आहेत.बरं, पण असे म्हणणारे मुंबईकर, पुणेकर,दुबई व अरब देशांमध्ये जेव्हा आनंदाने, विनातक्रार कामानिमित्त जातात,तेव्हा आम्हा नागपूरकरांना हसावं की रडावं, हेच समजत नाही. तसा उन्हाळा आमच्यासाठीही कठीण पण विपरीत परिस्थितीत जगतो, तोच तर खरा नागपूरकर. मुंबईच्या दमट,कोंदट हवेपेक्षा आम्हाला नागपूरची कोरडी हवा जरा जास्तच भावते. त्याला तुम्ही आमचं नागपूरवरचं आंधळं प्रेमही म्हणू शकता.उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना नागपुरी भाषेत "झाका"म्हणतात.यामुळे भर उन्हात फिरल्यास "उन्हाळी"(उन्हामुळे होणारा त्रास) लागल्यावाचून राहत नाही,व 'उन्हाळी"हा त्रास काय असतो,"हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे",या पठडीतला अनुभव.


पण या उन्हावर उपाय न शोधतील तर ते नागपूरकर कसले..उगाच नाही नागपूरला डेझर्ट कूलरची जननी म्हणून संबोधतात.कारण अशाप्रकारच्या कुलर्सचा शोध आमच्या नागपुरात लागला,अशी माहिती आहे. शिवाय सबंध भारताला हे "डेझर्ट कुलर्स" पुरविण्याचे काम नागपुरातून होत असते.म्हणून हा नागपुरी थंडावा आम्ही नागपूरकरांनी देशात पोहचविला,हेही नसे थोडके.हल्ली बाईकच्या  विशेष प्रकारच्या सीट्स आमच्या नागपुरात मिळतात,त्यामुळे भर उन्हात जरी तुमची  बाईक उभी असेल,तरी सीट गरम होत नाही,असे नवनवीन संशोधन नागपूरकर नेहमीच करीत असतात.मे महिन्यात तापमान 47-48 डिग्री सेल्सिअस ठरलेलं.अशाही तापमानात टपरीवर उकळता चहा पिणारे अवलिया तुम्हाला नागपुरातच भेटतील.


हल्ली फेसबुक व व्हाट्सएपच्या दुनियेत नागपूरच्या उन्हावर मिम्स प्रचंड प्रमाणात वायरल होताहेत.अशाप्रकारे "नागपूरचा उन्हाळा" social media वर हास्याचा ओलावा पसरवीत आहे,हे मात्र नक्की.

                   


 हिवाळ्यात आमच्याकडे 

"गुलाबी -बिलाबी" थंडी हा प्रकार नसतो. कडाक्याची थंडी पडल्याशिवाय आम्हा नागपूरकरांना हिवाळा आल्यासारखा वाटत नाही.तापमान जेव्हा 5 ℃ च्या खाली येतं तेव्हा,अंगात हुडहुडी भरल्यावर टपरीवरील"तर्री पोह्यांच्या" आस्वाद घेतांना व अद्रकवाली "चाय"पितांना ,दोस्तांसोबत "मेहफिल" जमविण्याची मजा काही औरच.भल्यापहाटे व्यायाम करण्याच्या नावावर मस्तपैकी शेकोटी पेटवून रमणारे बिलंदर सुद्धा तुम्हाला आमच्या नागपूरच्या मातीतच भेटतील.शिवाय, रात्रीच्या जेवणानंतर,गप्पांच्या ओघात मध्यरात्रीच्या चंद्राची साथसंगत करणारेही नागपूरकरच.असा हा "नागपूरी हिवाळा",बच्चे कंपनी ते आबालवृद्ध सर्वांनाच हवाहवासा वाटतो.

     


नागपुरात "पाऊस" मुंबईप्रमाणे अचानक येत नाही.तो येतो,ढगांच्या गडगडाटासह व विजेच्या कडकडाटासह.. आम्हा नागपूरकरांसारखं तोही वातावरणनिर्मिती--म्हणजेच आमच्या नागपुरी भाषेत"माहोल"केल्याशिवाय येत नाही.आमच्या नागपुरात तसा समाधानकारक पाऊस पडतो.दुष्काळ म्हणाल तर सहसा नसतोच.कधीकधी पाऊस असा काही बरसतो की,एरवी मृतप्राय असलेली,आमची 'नाग नदी' ओसंडून वाहू लागते व ती अजूनही जिवंत आहे,याची आम्हाला 'हा पाऊस' जाणीव करून देतो.पावसात भिजल्यावर गरमागरम मुंग पकोड्यांवर ताव मारण्यात आम्ही नागपूरकर अजिबात फिकीर करीत नाही.


फुटाळा तलावावर रिमझिम पावसात भिजत "भूट्टा"खाणारी तरुणाई,अंबाझरी ओव्हरफ्लो पॉईंटवर मॉन्सून celebrate करण्याची नवलाई,रामटेकच्या खिंडसी तलावाच्या दिशेने सुसाट पळण्याची घाई..


हे आम्हा नागपूरकरांचे मॉन्सून मधले "हॉट डेस्टिनेशन्स"..पावसाळ्यात आम्ही नागपूरकर नागपूरजवळच्या तमाम तलावांवर मनसोक्त भटकंती करतो.त्याच्या जोडीला नागपूर नजीकच्या हिरवाईचाही आनंद घेतो.



पावसाळ्यात अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याशिवाय आम्हा नागपूरकरांना 
पुरेपूर पाऊस झाला,याची खात्री पटत नाही.मग हवामान शास्त्रज्ञ कितीही अचूक अंदाज देवोत,अंबाझरी तलाव हा आम्हा नागपूरकरांचं पाऊस मोजण्याचं हक्काचं व विश्वासाचं "परिमाण" आहे.

थोडक्यात काय,तर,केवळ उन्हाळाच नाही तर, हिवाळा व पावसाळा हेही ऋतू आमच्या स्वभावाप्रमाणेच कडक असतात.ऋतूंचा हा राकटपणा,रांगडेपणा व बिनधास्तपणा आम्हा नागपूरकरांच्या स्वभावातही उतरलेला आहे व यातच आम्हा नागपूरकरांच्या "जिंदादिल"जगण्याचं रहस्य दडलेलं आहे.

रविवार, ४ एप्रिल, २०२१

Positive

Courtesy:Unsplash-Miguel Bruna

 होस्टेलच्या रुमचं दार उघडून विरेंद्र म्हणजेच आमचा 'वीरू' आत आला.वीरूच्या चेहऱ्यावर नेहमीचं तेज दिसत नव्हतं.तो अतिशय खिन्न व उदास वाटत होता. त्याला अशा अवस्थेत बहुदा होस्टेलच्या एकाही मुलानं आजवर बघितलं नव्हतं.म्हणून आम्हा सर्वांना त्याचं प्रचंड आश्चर्य व कुतूहल वाटत होतं.वीरू आल्या- आल्या आपल्या बेडवर लोटला व अंगावर चादर पांघरूण झोपी गेला. झोपतो कशाचा..झोपेचं सोंगच करत होता. असं असलं तरी त्यानं काही केल्या पांघरूण डोक्यावरून काढलं नाही व रुममधल्या कुणाशीही चकार शब्द तो बोलला नाही.

    वीरूबद्दल सांगायचं झाल्यास,वीरू हा विशीतला देखणा,हँडसम, चार्मिंग..वगैरे वगैरे.. मुलगा.नागपूर जिल्ह्यातील नरखेड या गावचा.बारावीची परीक्षा विज्ञान शाखेतून पास झालेला.अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धिमत्तेचा धनी.घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याला बारावी नंतर शिक्षण बंद करून मोलमजुरीची कामे करावी लागली.यात त्याचा संबंध मजूर व कष्टकरी वर्गाशी आला.व त्यांच्यासोबत काम करता-करता,जीवनाकडे डोळसपणे बघण्याची  दृष्टी त्याला प्राप्त झाली. कष्टकऱ्यांच्या जगण्याची धडपड पाहून त्याला शिक्षणाचं महत्त्व जाणवलं व तब्बल वर्षभर कष्टाची,अंगमेहनतीची कामे केल्यानंतर, स्थानिक आमदाराच्या शिफारशींच्या आधारे,स्पेशल केसद्वारे तो उशिराच शासकीय हॉस्टेल मध्ये दाखल झाला.

     


बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असूनही त्याने एलएलबीला प्रवेश घेतला.कमी वयात जास्त कटू अनुभव घेणारा, वीरू मूलतः चंचल, अस्थिर स्वभावाचा होता. तरी,प्रसंगी अतिशय प्रगल्भ वाटायचा..कधीही परिस्थितीशी हार न मानणारा..होस्टेलच्या लहान मोठ्यांशी नेहमी खोड्या..चेंगळ.. मस्ती करणारा वीरू,आज मात्र पार हादरून गेल्यासारखा भासत होता.अचानक त्यानं सर्वांशी बोलणं सोडून दिलं.हल्ली तो दिवसभर रूममधून गायब असायचा.कॉलेजची लेक्चर्स तो बंक करू लागला.एकटाच विनाकारण रस्त्याने फिरत बसायचा.जणू तो आम्हा सर्वांना किंबहुना अवतीभवतीच्या जगाला टाळत होता.त्याच्यातला तो आधीचा आत्मविश्वास.. कुछ भी कर जाने की जिद..डोळ्यातली ती चमक कुठेतरी हरवली होती.आता त्याचं जेवणही कमी होऊ लागलं होतं.त्याच्या वागण्या, बोलण्यात,दिसण्यात व असण्यात झालेला आमूलाग्र बदल सर्वांना बोचत होता.त्याला चिडवणारी सिनियर मुलं व त्याच्याशी मस्ती करणारी ज्युनियर मुलं वीरूच्या अशा वागण्याने पार कोड्यात पडली होती.हसावं की रडावं,अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती.                                                      वीरूचा जिवलग मित्र सुमित, यामुळे अधिकच बेचैन झाला.वीरू व सुमित म्हणजे लंगोटी यार.. दो जिस्म एक जान ..म्हणून वीरूच्या या अवस्थेचे कारण केवळ सुमितच जाणून घेऊ शकेल,यात कुणालाच तिळमात्र शंका नव्हती .

रूममध्ये एकांतात सुमितने वीरुला विचारलं,

"यार वीरू, काय झालं?सांगशील की नाही ?"

"कसं सांगू ?काय सांगू?काहीच सुचत नाही."  वीरू बोलला."अरे सांग एकदाचं, डोक्यावरचं ओझं हलकं कर.मैं हूं ना!टेक ईट ईझी!सुमितने त्याला धीर दिला.वीरूही हे ओझं दोन दिवसांपासून वाहत होता. त्यालाही आपलं मन मोकळं करायचं होतं.सुमितच्या बोलण्याने 

त्याला हिम्मत आली.व तो सांगू लागला," सुमित तुला आठवतं, मी गेल्या आठवड्यात ब्लड डोनेशन करायला एका ब्लड बँकेत गेलो होतो."

सुमित -"हो आठवतय ना.त्याचं काय ?"

वीरू-"अरे मला वाटलं, माझं रक्त 

कुणा गरजू व्यक्तीच्या कामी येईल,म्हणून मी ब्लड डोनेट केलं.व रूमवर आलो.थोडी विश्रांती घेतली व आपल्या कामाला लागलो."

सुमित-" त्यात काय एवढं उदास होण्यासारखं. तू तर एक उत्तम काम केलं आहेस.

वीरू-"तुला माहिती आहे का? आपण जेव्हा ब्लड डोनेट करतो तेव्हा आपल्या रक्ताची संपूर्ण चाचणी केली जाते.व त्यानंतरच ते लाभार्थी रुग्णाला दिलं जातं."

सुमित-"हो,मग त्यात काय एव्हढं."

वीरू-"त्यातच तर खरी गोम आहे.त्या ब्लड बँकेतून मला परवा फोन आला.व त्यांनी मला तुमचं रक्त एचआयव्ही इंफेक्टेड असल्याचं सांगितलं व  तुम्ही एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे तुमचं रक्त ब्लड डोनेशनसाठी रिजेक्ट करण्यात आल्याचही सांगितलं.आता मात्र सुमितही पार हादरून गेला. त्याला काय बोलावं हेच सुचेना. काही वेळ दोघेही नि:शब्द होते.मग स्वतःला सावरून सुमित बोलला, "यार वीरू,तु कसा काय एचआयव्ही पॉझिटिव्ह असू शकतो ?कारण एच आय व्ही एड्स, दूषित रक्त, असुरक्षित यौनसंबंध यांसारख्या कारणाने होतो.तुझ्या बाबतीत मात्र यापैकी काही घडलं असेल असं मला वाटत नाही".

Courtesy:Unsplash-Sergey Mikheev

वीरू मात्र रडक्या आवाजात सुमितला सांगू लागला."सुमित,मलाही असच वाटत होतं.

मग मी खूप विचार केला. माझ्या जीवनातले अनेक बरेवाईट प्रसंग आठवू लागलो.विचार करता-करता एका प्रसंगाजवळ येऊन थांबलो.

सुमित-"कोणता प्रसंग वीरू?,तु कधी सांगितलं नाहीस."

वीरू-" हो यार, राहूनच गेलं सांगायचं.बरं,आता सांगतो.तुला ठाऊक आहे,मी बारावीनंतर वर्षभर मोलमजुरीची कामं केली, मिळेल ते काम केलं.मजुरांसोबत काम करताना माझं भावविश्व पार बदलून गेलं होतं. तिथे मला पक्या भेटला. तो तिशीतला तरी असेल. त्याला बाई-बाटलीचा भारी नाद होता.मेहनत करून कमावलेली कमाई तो या दोन गोष्टींवर उधळायचा. एक दिवस पक्या मला म्हणाला,

"काय वीरू चालतो का GJमध्ये.मला काही कळेना.हे GJम्हणजे काय?त्यावर पक्या म्हणाला,वीरू नागपूरला चल, तुला दाखवतो गंगा - जमुना.तूझी भेट घडवून देतो एखाद्या बाईशी.नाहीतर असाच राहशील बिनकामाचा!!"

तेव्हा उत्सुकतेपोटी मी गेलो त्याच्यासोबत,

एका रविवारी त्या वैश्या वस्तीत.

मला त्याने एका अंधाऱ्या खोलीत ढकलून दिलं व  काम झाल्यावर दोनशे रुपये देण्याचंही सांगितलं.भांबावलेल्या अवस्थेत मी पंधरा-वीस मिनिटात तेथून बाहेर पडलो.व पक्याची वाट न बघता सरळ आपलं गाव गाठलं.हीच काय ती चूक, माझ्या हातून झाली असावी,असं मला राहून-राहून वाटतं.

सुमित वीरूचं बोलणं, निर्विकार चेहऱ्याने ऐकत होता. आता त्यालाही वीरू एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं पटलं होतं.वीरुचं दुःख दूर करण्याच्या प्रयत्नात,सुमितही अंत:र्बाह्य दुखावला गेला.त्याच्या मित्रावर ओढवलेलं, हे अरिष्ट कसं दूर होईल, याचाच तो आता विचार करू लागला.                                          दोन दिवसानंतर....

वीरू त्याच्या नेहमीच्या हसर्‍या चेहर्‍याने सुमितच्या रूमवर आला.त्याच्या चेहर्‍यावरील आनंद गगनात मावत नव्हता. सुमितला आश्चर्य वाटलं,काल-परवापर्यंत दुःखाच्या महासागरात बुडालेला वीरू, आज इतका आनंदी कसा?परंतु काही का असेना,याचं त्यालाही बरं वाटलं.

सुमित-"वीरू,आज तू एकदम खुश दिसतोय, झालं तरी काय?"

वीरू-"यार सुमित,आत्ताच मला त्या ब्लड बँकेतून फोन आला.त्यांच्याशी बोलून मी धावत-पळत तुझ्याकडे आलो बघ."

सुमित-"अरे,असं काय बोलणं झालं तुझं फोनवर?"

वीरू-"त्या ब्लड बँकेत म्हणे ..भलताच घोळ झाला.त्याचं झालं असं, माझी ब्लड रिपोर्ट व दुसऱ्या एचआयव्ही पॉझिटिव्ह पेशंटची ब्लड रिपोर्ट एकाखाली एक असल्यामुळे,

तिथल्या कंप्यूटर ऑपरेटरने त्या पॉझिटिव पेशंटची रिपोर्ट,माझी रिपोर्ट समजून मला कॉल केला. मग नंतर त्यांनी त्याचा जेव्हा follow up घेतला तेव्हा त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी लगेच मला कॉल करून माझी माफी मागितली. मी मात्र त्यांना चांगलच खडसावलं.पण शेवटी,'अंत भला तो सब भला' म्हणून विषय सोडून दिला.गेल्या दोन दिवसापासून माझ्या जीवाची जी घालमेल होती ती संपली एकदाची..आज मला जणू पुनर्जन्म मिळाला असं वाटतंय.आज मी एचआयव्ही पॉझिटिव्ह जरी ठरलो नसलो,तरी विचारांनी मात्र पॉझिटिव्ह झालो हे नक्की!!"असं म्हणून वीरूने आनंदाच्या भरात सुमितला मिठी मारली. 

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१

फुटपाथ

 


अखेर महाराष्ट्र शासनाने," इयत्ता 5 ते 8 चे वर्ग 27 जानेवारीपासून सुरु होणार.."अशी घोषणा केली. जवळपास 10 महिन्यानंतर शाळा सुरू होणार असल्याने,आता मला दररोज 50-60 किलोमीटर अंतर अपडाऊन करावे लागणार होते. म्हणून मी माझ्या बाईकची सर्व्हिसिंग करण्याचे ठरविले. याआधी अनेक ठिकाणी सर्व्हिसिंगचा अनुभव घेतल्यानंतर, शेवटी मित्राच्या ओळखीने निझामभाईंकडे जाण्याचे निश्चित केले. 

अजनी चौकातून,FCI गोडाऊनच्या रोडने गेल्यास,चुनाभट्टी भागात निझामभाईंचे फुटपाथवर दुकान आहे.त्यांचा मोबाईल नंबर मिळविला व त्यांना कॉल केला."आऊ क्या,बाईक लेके,आज अर्जंट सर्व्हिसिंग करनी है"मी म्हटले."खाली बैठा हूं, कोई बाईक नही है,आओ कभीभी"निझामभाई बोलले.मी अर्ध्या तासाच्या आत तिथे हजर झालो.तसं म्हणाल तर तिथे आणखी दुसरी दुकानं आहेत.तीही फुटपाथवरचं.मी मात्र यांपैकी निझामभाईंकडे बाईक सर्व्हिसिंग करणार होतो. दुकान कसलं,लाकडी-टिनांनी जोडलेला मोठा ठेलाच तो.त्यासमोर मोडक्या-तोडक्या, जुन्या, भंगार गाड्या अस्ताव्यस्त ठेवलेल्या... काही नव्या गाड्या दुरुस्तीसाठी आलेल्या... व अशा जुन्या-नव्या गाड्यांच्या गराड्यात पन्नाशीच्या आसपास असलेले निझामभाई,त्यांच्या कामात गढलेले मला दिसले.मित्राचा संदर्भ दिल्यावर व लांबून आलो असे सांगितल्यावर,त्यांनी माझी गाडी लगेच सर्व्हिसिंगला घेतली.सर्वप्रथम गाडी वॉशिंग सेंटर मधून धुवून आणण्यात आली व त्यानंतर गाडीच्या एकेक भागाची चाचपणी करून, निझामभाईंनी आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या."गाडीमें कुछ नया सामान डालना है क्या?"मी विचारलं."अभी जरूरत नही,बाद मे आओगे तो देखेंगे"निझामभाई म्हणाले.दरवेळी गाडी सर्व्हिसिंगला नेल्यावर,"साहाब,गाडी का ये पार्ट गया है..वो खराब हो गया है.."असं म्हणत शेकडो रुपये विनाकारण उकळणाऱ्या मेकॅनिकचा यापूर्वीचा अनुभव असल्याने, निझामभाईंचे हे शब्द मला आश्चर्यचकित करीत होते."आजकल की नई गाडीया एकदम भंगार आ रही है,पुरानीच गाडी मजबुत है"अशी पुस्तीही त्यांनी जोडली.व "नई गाडीयो का इंजन बहुत हलका है,पांच साल के अंदर खराब होता है."असं सांगून त्यांनी, माझ्या सामान्य ज्ञानात भर टाकली.


 सर्व्हिसिंग झाल्यावर,"बिल कितना हुआ?"मी विचारलं."250 रु."निझामभाईंनी उत्तर दिलं. पैसे दिल्यावर ते म्हणाले,"चलो चाय पिते है"असं म्हणत त्यांनी त्यांच्या नेहमीच्या चहाच्या टपरीवर नेलं व दोन हाफ चहा मागितला.चहाचे घोट घेता-घेता त्यांनी आपला जीवनप्रवास सांगायला सुरुवात केली."मेरे पिताजी रेल्वे मे ड्रायव्हर थे,उन्होने चुनाभट्टी झोपडपट्टीमें घर बनाया.रोज के झगडे और शराबी लोगो की बस्ती होने की वजहसे,पढाई छुट गयी.मेरे दोस्त कोईभी नही पढे, और मैं भी.इसलिए,आज फुटपाथपर दुकान चला रहा हूं" लेकीन,मेरा लडका बी. कॉम.पढ रहा है और साथ में VCA(विदर्भ क्रिकेट असोसिएशन)के लिए अंडर 19,क्रिकेट खेलता है, अच्छा प्लेयर है,शायद,रणजी खेलेगा..दिनरात मेहनत करता है"पोराच्या कर्तृत्वाविषयी सांगतांना,निझामभाईंच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक जाणवत होती."लडकी मोहता सायन्स कॉलेजमे B.Sc पढ रही है"असं सांगून मुलीलाही उत्तम शिक्षण दिल्याचे निझामभाईंनी सांगितले. मी उत्सुकतेपोटी विचारलं,"निझामभाई ,ऑटोमोबाईल लाईन मे,जादातर,मुस्लिम लोग ही क्यों होते है?त्यावर त्यांनी अतिशय समर्पक उत्तर दिलं"मुस्लिम समाज मे लडके,जादा पढते नही,शायद इसिलिये..मगर आजकल कुछ-कुछ लडके पढ रहे है."असं सांगून समाधान व्यक्त केलं."वाठोडा मे प्लॉट खरीद रखा है,वहा एक दुकान और नया घर बनाना है,मैं मेरे परिवार को अच्छा भविष्य देना चाहता हूं."असा आशावाद निझामभाईंनी व्यक्त केला. फुटपाथवर दररोज हात काळे करून,मळक्या कपड्यात,उन्हा-तान्हात राबून,त्यांनी केलेली प्रगती व मुलांना दिलेलं उत्तम शिक्षण तसेच स्वतःच्या आयुष्याला दिलेली सोनेरी झळाळी,नक्कीच अचंबित करणारी वाटली. आपल्यातले पांढरपेशे,नोकरवर्ग, अतिशय कम्फर्टेबल जिणं जगूनही,कदाचित आयुष्याला आकार देऊ शकत नाही,इथे मात्र फुटपाथवर जगून, निझामभाईंनी,जीवनाचा विजयपथ गाठला,हे नक्कीच कौतुकास्पद आहे.मी बाईकला किक मारली,परंतु रस्त्याने जातांना,जॉली LLB मधला अर्षद वारसीचा डायलॉग मला आठवला,"कौन है ये लोग, कहासे आते है ये लोग.."व निझामभाईंच्या रूपाने, फुटपाथवर काम करणाऱ्या, दुकान थाटणाऱ्या,तमाम लोकांच्या अस्तित्वाची नव्याने ओळख करवून गेला....!!

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

जपान व महाराष्ट्र ??

Courtesy:Unsplash-Jaikishan Patel

नुकतीच एक बातमी वाचण्यात आली.
"महाराष्ट्र शासन 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करणार..." खाजगीकरणाचे समर्थक यामुळे भलतेच खुश झाले असणार!!
नाहीतरी लोकं म्हणतच असतात,
दहा-बारा विद्यार्थ्यांसाठी महिन्याला लाख रुपये पगार असणारे शिक्षक हवेत कशाला??शिवाय
एवढे कमी विद्यार्थी असूनही सर्वच मुलं कुठे प्रगत असतात.. त्यातही असतातच काही अभ्यासात मागे..तर मग काय,यावर एकच उपाय,नव्या शैक्षणिक धोरणात प्रस्तावित असलेल्या ,केंद्रीय शाळेच्या संकल्पनेप्रमाणे ,जोडून देता येईल, अशा लहान -लहान शाळा, केंद्रीय शाळेशी...
मग काय बघायलाच नको.. 'प्रत्येक वर्गाला स्वतंत्र वर्गखोली व  शिक्षक, संगणक कक्ष ,मोठं क्रीडांगण, विषयवार व तासिकेनुसार अध्यापक.. सारं कसं आलबेल असेल..मूलं येतील खाजगी वाहनात बसून.. अगदी शहरी इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्यांप्रमाणे..स्कूल बॅग, वॉटर बॅग, सूटबूट घालून.. सगळं कसं .."ऑल इज वेल!!"
  
Courtesy:Unsplash-Jaikishan Patel

असं झाल्यास आनंदच आहे,परंतु वास्तविक परिस्थिती काही औरच आहे.गेली पंधरा वर्षे ग्रामीण,आदिवासी भागात,शिक्षक म्हणून काम करताना आलेला अनुभव बघता,नव्या शैक्षणिक धोरणात रंगविण्यात आलेलं, हे गुलाबी चित्र अंतर्मनाला काही केल्या पटत नाही. भारताची किंबहुना महाराष्ट्राची एकंदरीत समाजरचना बघता आपल्या लक्षात येतं की,शेकडो वर्षांच्या सामाजिक व आर्थिक घुसळणीतून निर्माण झालेल्या विकासाच्या संधीचा लाभ समाजातील, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या संपन्न घटकांनी घेतलेला आपल्याला दिसतो व समाजातल्या या घटकाने कधीचेच शहराकडे किंबहुना त्याहीपलीकडे..भारताबाहेर.. प्रस्थान केलेलं आढळतं.मात्र,मागे उरलेला, आदिवासी व मागास समाज अजूनही लहान-लहान खेड्यांत वसलेला व  विखुरलेला आहे.असंख्य खेडी अशी आहेत की ज्यांमध्ये तुम्हाला संपन्न घटकांचे वास्तव्य अजिबात दिसणार नाही.जे असतील त्यांनी त्यांची पर्यायी व्यवस्था नजीकच्या शहरात केलेली आहे किंवा त्यांच्या मुलांना शहरातील शाळांमध्ये दाखल तरी केलेले आहे.सांगायचे तात्पर्य, आजच्या घडीला दुर्गम, आदिवासी व ग्रामीण भागातील लहान लहान खेड्यांत,सरकारी शाळेत शिकणारी मुलं,प्रामुख्याने तळागाळातील समाजाची आहेत. त्यांच्यासाठी शाळा हे विकासाचे मंदिर आहे.शाळेतूनच त्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त होत असतो.शाळा म्हणजे आशा, स्वप्न,महत्त्वाकांक्षा.. सारंच काही आहे,त्यांच्यासाठी... शाळा एखाद्या दीपस्तंभासारखी त्यांच्यासाठी आजतागायत काम करत आलेली आहे .याच लहान लहान शाळांमध्ये बाराखडी गिरवणारे आज समाजाला दिशा देण्याचे काम करीत आहेत.या भागात रोजगाराची पुरेशी साधने नाहीत तसेच  दारिद्र्य व कुपोषण त्यांच्या पाचवीला पुजलेलं आहे. अशा समाजासाठी, शिक्षण हे अति आवश्यक व जीवनावश्यक अशी बाब आहे.मग महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय बहुसंख्य मागास समाजाला मिळालेली विकासाची संधी हिरावून घेणारा आहे,असं काहीसं चित्र या निर्णयामुळे निर्माण झालेलं आहे. कोठारी कमिशनने शिक्षणावर जीडीपीच्या सहा टक्के खर्च करण्याचे सुचवले असताना तो आपण आजतागायत करू शकलेलो नाही. दोन-तीन टक्क्यांच्या वर हा खर्च गेला नाही. असे असतानाही आपण आखडता हात का घेत आहोत??हे न उलगडलेलं कोडं आहे.खर्च वाचवायचाच असेल तर अनेक मार्ग आहेत. मात्र शिक्षणावर केलेला खर्च एखाद्या वस्तूच्या स्वरूपात समजण्यात येऊ नये.ही गुंतवणूक देशाचं उज्ज्वल भवितव्य घडविण्याचं काम करत असते.
  
Courtesy:Unsplash-Himanshu Singh

एकीकडे आपल्या महाराष्ट्रात 20 पेक्षा कमी  पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जात असताना ,दुसरीकडे जगाच्या एका कोपऱ्यातील.. एक चिमुकला देश, जपान.. येथून एक वेगळी बातमी  कानावर आली..ती बातमी म्हणजे .."जपानमध्ये 'शिराताकी' गावात राहणाऱ्या 'काना हराडा'या  विद्यार्थिनीसाठी जपान शासन , रेल्वे स्टेशन बंद करण्याचं नियोजन असताना,एकटीसाठी ट्रेन सुरू ठेवते. ती विद्यार्थिनी पस्तीस किलोमीटर अंतर पार करून  ट्रेनने दररोज शाळेत जाते व जपान शासन ती पदवीधर होईपर्यंत ,पुढील पाच वर्षे म्हणजे 2021 पर्यंत रेल्वे स्टेशन व ट्रेन सुरू ठेवतं.. अशी मानसिकता व विचारसरणी असणारा देशचं राखेतून भरारी घेवू शकतो. म्हणूनच हा चिमुकला देश जगातील प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आज मिरवतो आहे व दुसरीकडे आपल्या देशात,महाराष्ट्रात आपण, 20 पेक्षा कमी विद्यार्थी असणाऱ्या सरकारी शाळा फक्त आर्थिक कारणास्तव बंद करण्याचं ठरवतो, हा विरोधाभास भारत व जपान
त्यांच्या विकासातील फरका बद्दल बरच काही सांगून जातो...

To watch more interesting videos,do visit,"Glocal Marathi"youtube channel.




शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०

आम्ही नागपूरकर-भाग-2 (तर्री पोहा)

 


आम्हा नागपूरकरांच्या जिभेचे ,जरा जास्तच चोचले आहेत.असं-तसं आम्हाला अजिबात जमत नाही. साधे कांदे पोहे घ्या ...


 


जगाच्या पाठीवर पोह्यांमध्ये तर्रीदार रस्सा टाकून खाणारे फक्त आम्ही नागपूरकरच.पोह्यांमध्ये तर्रीदार रस्सा टाकून खाल्ल्या जाणाऱ्या पोह्यांना आम्ही नागपूरकर "तर्री पोहा"किंवा "चना पोहा" या नावाने संबोधतो. सकाळ झाली रे झाली की,तुम्हाला नागपुरातल्या चौकाचौकात टपऱ्यांवर तर्री पोहा विकणारे भेटतील. मॉर्निंग वॉकला जाणारे,बाहेरगावाहून नागपुरात येणारे,होस्टेल मध्ये राहणारे विद्यार्थी,बॅचलर्स,अशांसाठी तर्री पोहा म्हणजे आवडीचा ब्रेकफास्ट.नागपुरात,दहा रुपयांत एक हाफ तर वीस रुपयात एक प्लेट पोहे,अगदी सहज मिळतात.जोपर्यंत प्लेटमध्ये घेतलेले पोहे तर्रीदार रस्स्यात तरंगत नाही व त्यात अर्धे चिरलेले लालचुटूक टमाटर(टमाटे) विराजमान होत नाही, तोपर्यंत अस्सल नागपूरकराला पोहे खाल्ल्याचे समाधान मिळत नाही,हे मात्र नक्की. शिवाय,जे पोहे खाल्ल्यानंतर, तर्रीचा ठसका लागत नाही व नाका-डोळ्यांत पाणी येत नाही,अशा पोह्यांना अस्सल नागपूरकर पोहेच मानत नाही.एवढा मान खवय्या नागपूरकरांच्या लेखी तर्री पोह्यांना आहे.नागपुरात पोहे खातांना रस्सा वारंवार मागण्यात.. ग्राहक व तो देण्यात.. विक्रेता, अजिबात संकोच करत नाही.जणू तो नागपूरकरांचा मूलभूत हक्कच आहे,असा सर्वांचा समज आहे.


   


सांगायचं तात्पर्य,नागपूरचं हवामान जरी "कोरडं"असलं तरी पोहे मात्र आम्हाला तर्रीदार रस्स्याने "ओले" झालेलेच आवडतात.अशा तर्री पोह्यांचे नागपूरकर 'दिवाने' आहेत. कामधंद्या निमित्त आम्ही नागपूरकर जगात,कुठेही गेलो तरी,साधं "तर्री पोहे"हे नाव जरी ऐकलं तरी, आम्हाला नागपूरची ओढ लागल्यापासून राहत नाही.   

                 


 आधी सांगितल्याप्रमाणे, नागपुरात तर्री पोहे विकणारे असंख्य आहेत.तसेच नागपुरातल्या प्रत्येक भागात त्या-त्या भागातले तर्री पोहेवाले प्रसिद्ध आहेत.या सर्वांमधले, हॉट डेस्टिनेशन म्हणजे केपी ग्राउंडचे पोहे.के. पी.ग्राऊंड म्हणजे कस्तुरचंद पार्क. आमच्या नागपूरचं जणू "शिवाजी पार्क".जिथे देशातल्या मोठमोठाल्या राजकारण्यांनी सभा गाजवल्या ते ठिकाण.केपी ग्राउंड जवळ मिळणारे तर्री पोहे खाण्यासाठी नागपुरातल्या श्रीमंतांपासून ते सामान्यातले सामान्य लोकं गर्दी करतात.नागपुरात येऊन इथल्या तर्री पोह्यांचा आस्वाद न घेता जाणारा सेलेब्रिटी विरळाच.राजकारणी,बॉलीवूड स्टार, मराठी सिनेस्टार.. सर्वांनी इथल्या तर्री पोह्यांची चव कधी ना कधी चाखली आहे.इथल्या तर्री पोह्यांचे वैशिष्ट्य म्हणजे इथला ठसकेबाज रस्सा व पोह्यांवर अलगदपणे पेश केले जाणारे अर्धे लाल टमाटर(टमाटे). टमाटरमुळे पोह्यांना आंबट-तिखट अशी चव प्राप्त होते व आपल्या जिभेचे सर्व टेस्ट बड्स तृप्त होतात.एवढेच नाही तर इथले काही पोहेवाले दरवर्षी इमानेइतबारे इन्कम टॅक्स भरतात व  काही त्यांच्या मिळकतीच्या जोरावर जगभ्रमंतीही करतात.अशी माहिती आहे. टी. व्ही. चॅनेल्सवर तसेच प्रसिद्ध youtube चॅनेल्सवर सुद्धा हे पोहेवाले झळकलेले आहेत.                                   यावरून,तुम्हा सर्वांना,नागपुरातल्या प्रसिद्ध तर्री पोह्यांचा महिमा नक्कीच कळला असेल... नागपुरात येणाऱ्या प्रत्येकाने तर्री पोह्यांचा आवर्जून आस्वाद घ्यावा,यासाठी ...एक अस्सल नागपूरकर म्हणून...अल्पसा प्रयत्न!!

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०

आम्ही नागपूरकर-भाग 1(नागपुरी बोली)



Courtesy:Unsplash-Harish Fulpadia

मित्रांनो,खरं तर आजवर नागपूरकरांची वैशिष्ट्ये नागपूरकरांनी कमी व नागपूर बाहेरच्या लेखकांनीच जास्त सांगितलेली आपल्याला दिसतात. त्यामुळे "अस्सल नागपूरकर" कसा असतो? याचे त्यांनी केलेले वर्णन अगदी वरवरचे व ऐकीव माहितीवरून केल्याचे आपणांस दिसते. मुंबईकर,पुणेकर, सातारकर... इत्यादी.बद्दल मी बोलणार नाही,मात्र या सर्वांबद्दल आदर बाळगून,"आम्ही नागपूरकर"काय चीज आहोत?हे गुणदोषांसह सांगण्याचा हा अल्पसा प्रयत्न..

                           


 सर्वप्रथम,नागपूरकरांची जडणघडण जाणून घ्यायची असेल तर आपल्याला नागपूरचे भौगोलिक स्थान जाणून घ्यावे लागेल.नागपूर जिल्ह्याची उत्तरेकडील सीमा मध्यप्रदेशला लागून असल्याने व एकेकाळी नागपूर ही "सीपी अँड बेरार"प्रांताची राजधानी असल्याने तिथे पूर्वापार हिंदी भाषिक लोक कामा-धंद्यानिमित्त येत आलेले आहेत. त्यामुळे नागपूरवर हिंदीचा प्रभाव ओघाने आलाच व ते नैसर्गिकही आहे.कारण नदीच्या वाहत्या प्रवाहाप्रमाणे भाषा सुद्धा प्रवाही असते. प्रवाह थांबला तर त्याचे डबके होते,म्हणून नागपूरमध्ये मराठी व हिंदीचा अद्भुत संगम होवून हा प्रवाह अखंड वाहत आलेला आहे. ज्याप्रमाणे इंग्रजीने जगातल्या सर्व भाषा स्वतःमध्ये सामावून घेतल्या, त्याप्रमाणे आम्ही नागपूरकरांनी मराठी सोबत हिंदीला आपलेसे केले.मग आमच्या भाषेवर एखादा पुणेकर म्हणतो,"काय राव,तुमची भाषा,अगदी भेसळ आहे. ना धड हिंदी ना धड मराठी.मग अशा पुणेकराला, भूगोल नव्याने शिकण्याची नितांत गरज आहे,असं मला वाटतं.कारण, उदाहरण द्यायचं झाल्यास, पुण्याला एकही हिंदी भाषिक प्रदेशाची सीमा खेटून नसल्याने व चहूबाजूंनी मराठीभाषी जिल्ह्यांच्या सीमा असल्याने त्यांनी मराठीचे शुद्ध रूप जपले तर त्यात काय एवढं नवल??त्यापेक्षा आम्ही नागपूरकरांनी हिंदीला,आपलंसं करून, आमची स्वतःची "नागपुरी बोली"जन्माला घातली,याची साधी दखल कुणी आजतागायत घेतली नाही.शिवाय हिंदी आत्मसात करून केंद्रीय सेवांत,स्वतःचा ठसा उमटविला व महाराष्ट्राचा मान वाढविला, याचेही कुणी कौतुक करत नाही.

                                       

Courtesy:Unsplash-Mayank Mishra

  ते सोडा.. सोलापुरात बोलली जाणारी कानडीचा प्रभाव असलेली मराठी,खान्देशातली अहिराणी,खानदेशी मराठी,कोकणातली कोकणी,मालवणी मराठी,मराठवाड्यातली मराठी...यादी बरीच मोठी होईल,या मराठीला बोल लावलेलं फारसं ऐकण्यात येत नाही.मात्र नागपुरी मराठीची नेहमीच चेष्टा केली जाते.या सर्व शुद्ध मराठी आहेत काय?नक्कीच नाही. कारण प्रत्येक बोलीला अंगभूत सौंदर्य असतं व तिने ते आत्मसन्मानाने मिरवायला हवं,आम्ही ते मिरवतो, कोण काय म्हणेल याची आम्ही फिकीर करत नाही.म्हणून आम्ही नागपूरकर जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तर, आपल्या खास नागपुरी मित्रांसोबत,"का बे, काहून बे,कायले बे..." बोलणारच.ही आहे अस्सल नागपूरकराची ओळख. अगदी पुणे,मुंबई, पॅरिस,लंडन,न्यूयॉर्क..कुठेही असू द्या,असं बोलण्याने आमची "wavelength"लगेच जुळते. नाही तर, " कशाला?काय रे ?.. "हे आमच्यासाठी अगदी मिळमिळीत,फिक्क्या वरणासारखं....असं नव्हे की आम्हाला "काय रे?कसा आहेस ?कशाला रे?.. असे बोलता येत नाही,परंतु त्यामुळे आमच्या बोलण्यातून सहजता,उत्स्फूर्तता पार निघून जाते.


आता फळांचंच बघा, द्राक्षांना अस्सल नागपूरकर कधीच द्राक्षं म्हणणार नाही...बरोबर ओळखलंत,तो "अंगुर" म्हणेल.आता काही म्हणतील हा तर हिंदी शब्द आहे.अगदी बरोबर. पण आम्ही नागपूरकरांनी त्याला एवढं आपलंसं केलं आहे की कुणाचाही तो हिंदी शब्द आहे,यावर विश्वास बसत नाही.द्राक्षं म्हणणारा नागपुरात तुम्हाला दिवा घेऊन शोधलं तरी सापडायचा नाही.द्राक्षाप्रमाणे सफरचंदाचेही तसेच.नागपुरात त्याला कुणीही सफरचंद म्हणत नाही,इथे हिंदीतला "सेब",..अपभ्रंश होवून मराठीत "सेप" बनतो.'सेफ'नाही बरं का.अशी अनेक उदाहरणे देता येतील.पालेभाज्यांना आमच्या नागपुरात उर्वरीत महाराष्ट्रापेक्षा स्वतंत्र ओळख आहे.तुमची स्त्रीलिंगी कोथिंबीर आमच्या इथे पुल्लिंगी "सांभार"बनून ऐटीत मिरवते.उच्च विद्याविभूषित सुद्धा सर्रास सांभार म्हणतो व त्यात त्याला अजिबात संकोच वाटत नाही.बटाटे हे "आलू"व टमाटे "टमाटर"या हिंदी नावांनी ओळखले जातात.शिवाय जुने-जाणते "भेदरं"या नावाने टमाट्यांना संबोधतात.माकडासारख्या प्राण्याला आम्ही नागपूरकरांनी हिंदीतील "बंदर" व नागपुरी मराठीत "वांनेर"हे नवीन नाव दिलंआहे.बकरी हा हिंदी शब्द "शेळी"ला पर्यायी शब्द म्हणून आमच्या कित्येक पिढ्यांनी स्वीकारला आहे.नागपुरात बऱ्याचदा चहाचा "चाय" व सरबतचे "शरबत"झालेलं तुम्हाला दिसेल. औषधांच्या दुकानाच्या बोर्डावर "औषधी" कमी व "दवाई"हे जास्त लिहिलेलं आढळेल.इतकेच नाही तर"पटता है तो टेक नही तो रामटेक"अशा म्हणीही आमच्या नागपुरात प्रचलित आहेत.असे अनेक दाखले देता येतील.त्यावर तुम्ही म्हणाल ही मराठी मिश्रित हिंदी आहे का हिंदी मिश्रित मराठी? असे वाटणे साहजिक आहे,परंतु याच रुपात आमच्या इथे मराठी गेल्या कित्येक शतकांपासून नांदत आली आहे.

 

Courtesy:Unsplash-Sidharth Singh

नागपुरात वऱ्हाडी बोली, झाडी बोली या दोन्ही बोली एकाचवेळी अगदी लाडीगोडीने राहत आलेल्या आहेत.अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमेकडील भागावर वऱ्हाडी बोलीचा जास्त प्रभाव आहे.यात नरखेड,काटोल,कळमेश्वर व काही प्रमाणात सावनेर तालुक्याचा भाग येतो.तर भंडारा,चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेजवळच्या तालुक्यांवर झाडी बोलीचा प्रभाव आढळतो.यात कुही,मौदा,भिवापूर व उमरेड या तालुक्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. कामठी, पारशिवनी,रामटेक या तालुक्यांवर हिंदी भाषेचा प्रभाव जाणवतो.हिंगणा तालुक्याची बोली प्रामुख्याने वऱ्हाडी व काही अंशी झाडी बोलीचा प्रभाव असलेली भासते.नागपूर शहराचं म्हणाल तर इथे हिंदी,वऱ्हाडी,झाडी,व इतर बोलींचा मिलाफ झाल्याचे आपणास दिसते.काही भाषा तज्ज्ञ विदर्भाला मराठी भाषेची जननी संबोधतात.मराठीतील सर्वात प्राचीन काव्यग्रंथ "विवेकसिंधु" मुकुंदराज या श्रेष्ठ कवीने नागपूर जिल्ह्यातील "आंभोरा"येथे, वैनगंगा नदीच्या किनारी लिहिल्याच्या नोंदी आहेत.शिवाय मुकुंदराज यांचे जन्मस्थळ आमच्या विदर्भात भंडारा जिल्ह्यातील पवनी ही ऐतिहासिक नगरी असल्याचे दाखले प्राचीन  ग्रंथात मिळतात.म्हणून आमच्या मराठीवरील प्रेमावर कुणी शंका घेतलेलं आम्हाला अजिबात खपत नाही.

   


एवढा सगळा खटाटोप करण्याचं कारण म्हणजे,जागतिकीकरणाच्या लाटेत नागपूरकर तरुण,देशाच्या नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात कामधंद्यांतनिमित्त पोचलेला आहे.तिथे वास्तव्य करीत असतांना,नागपूरकरांना,त्यांच्या भाषेविषयी मस्करीचा सामना करावा लावतो. "आपला तो बाळू,दुसऱ्याचं ते कारटं"या न्यायाने नागपुरी मराठीची अवहेलना काही संकुचित विचारसरणी असणाऱ्यांकडून नेहमी केली जाते.अशा अल्पज्ञानी लोकांची तोंडं कायमची बंद करण्यासाठी व त्यांच्या बुद्धीचा आवाका अधिक व्यापक करण्यासाठी हा लेख.आवडल्यास आपल्या नागपूरकर मित्रांना नक्की शेयर करा.

To watch more interesting stories do visit ,my youtube channel"Glocal Marathi".

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०

होम्या

Courtesy:Unsplash-Jonathan Kho

 होय....बरोबर वाचलंत तुम्ही."होम्या" हेच त्याचं नाव.आज तो वयाच्या पन्नाशीत तरी असावा.
पण तुम्हा- आम्हासारखा, तो वाढत्या वयानुसार'श्री..श्रीमान..राव..'झाला नाही.सर्वांसाठी तो आजही "होम्याचं"आहे.वीस-पंचेवीस वर्षांपूर्वी, मी पाहिलेला व आज दिसणारा "होम्या" यात म्हणाल तर, फक्त 'उन्नीस-बीसचा फरक'. याअर्थी "होम्या"देवानंद या सदाबहार अभिनेत्यापेक्षाही चिरतरुण..


Courtesy:Unsplash-Lakshya Jain

आई-वडील, भाऊ-बहीण,ही रक्ताची नाती एकेकाळी जपणारा,आज रस्त्याने दिसणाऱ्या प्रत्येकात 'माणूस' शोधत फिरत असतो. त्याने 
रक्ताची नाती अजूनही जपून ठेवलीत.. त्याच्या हृदयाच्या बंदिस्त कप्प्यात..म्हणून कधी-कधी त्याची पावलं आपसूक वळतात,घराच्या दिशेने..इतर वेळी मात्र, "हे विश्वची माझे घर "असाच असतो त्याचा मुक्तसंचार....


Courtesy:Unsplash-Shail Sharma

सर्वसामान्यांसारखं, शिकावं, नोकरी-धंदा करावा, लग्न करून संसार थाटावा, असं चौकटीबद्ध आयुष्य कदाचित त्याच्या प्राक्तनी नसावं..म्हणून,'ऊन,वारा,पाऊस,थंडी'कशाचीही तमा न बाळगता,तो वर्षभर मोकळ्या आकाशाखाली बिनधास्तपणे वावरतअसतो.
गावातील कुत्र्यांशी त्याचं जिवाभावाचं मैत्र.अंधारात फिरताना,'साप,विंचू'त्याला चावतील तर मजाल..दिवसाच्या उजेडापेक्षा रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधाराशी त्याची खास दोस्ती..


Courtesy:Unsplash-Dynamic Wang

गावातलं,शेंबडं पोरंही तुम्हाला त्याची ओळख हिरहिरीने सांगेल,एवढी त्याची ख्याती.. लहान मुलं झोपत नसतील,तर "होम्या"येईल,झोप लवकर,जणू "होम्या"म्हणजे, शोले चित्रपटातला  गब्बर असल्यासारखा,त्याचा 'धाक' दाखवून लहान मुलांना झोपविणाऱ्या 'आया'गावात कमी नाहीत.अख्ख्या आयुष्यात, साधा मच्छरही न मारणाऱ्या "होम्याचं"नाव ऐकून लहान मुलं झोपतातचं कसे??हे मला कधीही न उलघडलेलं कोडं आहे.


Courtesy:Unsplash-Patric Hendry

हिमालयात न जाता,कुठलीही तपस्या-तप,न करता,विरक्त,आयुष्य जगणारा,"होम्या" एखाद्या 'योग्यापेक्षा'मला कमी भासत नाही.कारण, त्याला ना कशाचा मोह, ना कुठली अभिलाषा. त्याला कुणी हिणवल्यास,झिडकारल्यास,रागावतो तो काहीवेळेस..पण लगेच विसरूनही जातो.मानापमान,अहंकार,छद्मीपणा,या गोष्टी त्याच्यापासून कोसो दूर..त्याचा स्वतःचीच सुरू आहे मुक्तसंवाद ...वर्षानुवर्षे..तरी,कधीकाळी, हरवलेला "होमराज"अजूनही "होम्याला" गवसला नाही,हेही तितकंच खरं.. 


Courtesy:Unsplash-Parij Borgohain

गावात वाटलं त्या,घरी जावं,कुणी भाकरतुकडा दिला,तर तो खाऊन पुढची वाट धरावी.. 
चहाच्या टपरीजवळ किंवा पानटपरीवर तासनतास उगाचंच बसावं.. मग,कुणाला दया आल्यास,मिळतो त्याला घोटभर चहा व खर्रा.एवढीच काय ती त्याची चंगळ.इतरांचं अनुकरण करत,तोही चघळत बसतो, खर्रा बराचवेळ. त्यामुळं,मिळतं त्याला काही वेळापूरतं समाधान..आपणही'सर्वसामान्य'असल्याचं.गावात लग्न समारंभ व कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असल्यास,ती असते त्याच्यासाठी, मेजवानी.मग काय, जेवतो तो मनसोक्त, तृप्तीची ढेकर येईस्तोवर...


Courtesy:Unsplash-Richard Saunders

कधीकधी त्याच्या रक्ताच्या नात्यातले व गावातील संवेदनशील लोकं,देतात त्याची नखशिखांत आंघोळ घालून,तर कधी कुणी देतो त्याला,नवीन कापडं..कोणी कटिंग-दाढीचा खर्च करतात.मग काय,"होम्या"तुम्हाला गावात शोधूनही सापडायचा नाही."होमराज"म्हणाल तर मात्र लगेच सापडेल. एकेकाळी अभ्यासात गती असणारा,देखणा "होमराज"गावाला पुन्हा एकदा नव्याने भेटतो.परंतु "होम्याला"तो सापडत नाही.पुढे,दोन-चार दिवसात "होमराजला", "होम्या"पुन्हा कडकडून मिठी मारतो व "होमराज"पुन्हा एकदा,काही महिन्यांसाठी अंतर्धान पावतो.


Courtesy:Unsplash-Anna Vi

"होम्याला" कधी ताप-ज्वर आल्याचं,निदान मी तरी  ऐकलं नाही.आलाही असेल कधी,मात्र आपल्यासारखी दवाखान्याची पायरी त्याला खचितच चढावी लागते."होम्यासारखी" मानसिक संतुलन गमावलेली माणसं,गावा- गावात,शहरांत,खितपत पडलेली आपल्याला दिसतात.काहींना साखळदंडाने बांधून कोंडलं जातं, त्यांच्याच घरी,एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखं...कुणी दिसतो भररस्त्यात बेभान फिरतांना, तर कुणी एखाद्या पुलाशेजारी निचपत पडलेला दिसतो. कुणी साधत असतो ,अदृश्याशी संवाद.त्यांना स्वतःचं भान नसतं. मळक्या- फाटक्या,कपड्यात वावरणारी,वाढलेली दाढी व लांब,मेणचट केस असलेली,कधीकधी तर..डुकरांसोबत, उकिरड्यावर उष्ट फेकलेलं अन्न खाणारी...हाडामासाची माणसं 
आपल्याला अवतीभवती दिसतात.त्यातली काही अवलिया म्हणून समाजात पूजली जातात. पुढे त्यांची भव्य-दिव्य मंदिरं,दर्गे बनतात. स्वतःच्या आयुष्याचा अर्थही न गवसणाऱ्यांच्या,प्रवचनांची,उपदेशांची पुस्तकं बाजारात येतात. खिशात दमडी न बाळगणार्‍यांना लोकं,लाखोंची देणगी,हयात असताना व नसतानाही देतात. दुसरीकडे, त्यांचे बांधव,दोन वेळेच्या जेवणासाठी व अंगभर कपड्यांसाठी,फकिराचंं जिणं जगत असतात.व "मूकनायक"बनून आपल्याला सांगत असतात,जीवनाचा खरा अर्थ..

 

Courtesy:Unsplash-K.Mitch Hodge

आजच्या घडीला,जगात जवळपास पंधरा टक्के लोकसंख्या, शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंग असणाऱ्यांची आहे.भारत सरकारने अपंगांसाठीच्या UNCRPWD(Convention on 'Rights of person with disability') या संयुक्त राष्ट्रांच्या कराराला 2007 मधे मान्यता दिली.शिवाय, अपंगांसाठी PWD(Person with disability)act 1995,व संशोधित कायदा,(Revised),RPWD act, 2016, पारीत करून शारीरिक व मानसिकरित्या अक्षम असणाऱ्या व्यक्तींच्या हक्क व अधिकारांची त्यात तरतूद केली आहे.असे असले तरी,खासकरून, मानसिकरित्या अक्षम व्यक्तींच्या समस्या, महिला,मागासवर्ग व अल्पसंख्यांकांपेक्षा गंभीर स्वरूपाच्या आहेत.कारण, त्यांना त्यांच्या,आजाराची व अधिकारांची काहीच कल्पना नसते.जगाच्या तुलनेत, आपण अशा लोकांसाठी आजतागायत फार काही भरीव करू शकलेलो नाही.आज या सर्वांसाठी सामाजिक व शासकीय पातळीवर तात्काळ उपाययोजना करणे,गरजेचे झाले आहे.                                    असे असतांना,आपण मात्र होम्यासारख्या लोकांचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार अजूनही पदोपदी नाकारत असतो..त्यांच्यातल्या माणसाला व त्यांच्या कुटुंबाला गरज आहे,मायेची,सहकार्याची व खंबीर पाठिंब्याची.कारण, समाज म्हणून आपल्याकडून त्यांच्या कुटुंबाची कळत - नकळत,अवहेलना झालेली असते.त्यांच्या कुटुंबाने अनंत संकटांचा मुकाबला केलेला असतो.त्यांच्या कष्टांची व संघर्षाची आपण कल्पनाही करू शकत नाही.म्हणून,संविधानाने दिलेला समानतेचा अधिकार जर आपण समाज म्हणून अशा, व्यक्तींना देऊ शकलो तर यापेक्षा उत्तम कार्य दुसरं असू शकत नाही.

To watch "Homya",do visit my youtube channel-Glocal Marathi,at link below


मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

Cycology




 'सायकल ' शब्द उच्चारताच ,नकळत आपण भूतकाळात जातो.आठवतात आपल्याला,सायकलच्या सीटमागे असणारी सिनेमांची नावं..तिचा तो साजशृंगार..व सायकल मालकाची ती ऐट... ..सारंच कसं आता घडल्यासारखं...गावाकडच्या जुन्या बनावटीच्या जेन्ट्स व लेडीज सायकलला आम्ही 'बाजीराव -मस्तानी'म्हणायचो,हेही आठवतं..व आठवतात, 'सायकल चालवणे'शिकतांना घडलेले अपघात...अपघातही एक नाही तर अनेक...त्यांच्या तऱ्हाही निराळ्या...शिवाय आई-वडिलांच्या हातचा खाल्लेला मार वेगळाच...असे प्रसंग तुम्हा-आम्हा,सर्वांच्या जीवनात कमी-अधिक प्रमाणात घडलेले आहेत, हे मात्र नक्की.सायकल शिकताना अपघात न घडलेला,स्वतःचे हात-पाय न मोडून घेणारा,नाहीच काही तर,सायकलवरनं पडून 'हातापायाला खरचटलं' असे न म्हणणारा,जगात शोधुनही सापडायचा नाही. मला वाटतं, आपण जर एवढ्यांदा सायकलवरनं पडलो तर,सामान्यजनांसाठीसायकलरूपी स्वस्त, पर्यावरणपूरक, प्रवासाचं साधन निर्माण करणारा अवलिया, 'मॅकमिलन' सायकल तयार करताना, कितीदा खाली पडला असणार??याची गणतीच नाही.


सायकलच्या इतिहासाचा धांडोळा घेतल्यास,आपल्याला समजतं,की,दोन चाकं मागे-पुढे जोडून सहज चालू शकतात,ही कल्पनाच मुळी किती अद्भुत व अचाट होती. त्यामुळे सायकलचा शोध हा विमानाच्या शोधापेक्षा कमी नाही,असे मला नेहमीच वाटत आले आहे. 



एवढं सगळं, सायकलपुराण सांगायचं कारण म्हणजे,कोरोना विषाणूच्या महामारीमुळे ,पुन्हा एकदा गरीब, बिचाऱ्या, सायकलकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.लॉकडाउन ते अनलॉक, या कालखंडात सायकलचा खप पाचपट वाढल्याचे,अनेक जाणकार व्यक्तींच्या तोंडून आम्ही आमच्या, कानांनी ऐकलं आहे.एक वेळ नव्या-कोर्‍या 'पल्सर' गाडीकडे कुणी ढुंकूनही बघणार नाही. मात्र ,एखादी 'रेसिंग  सायकल' रस्त्याने कुणी चालवताना दिसल्यास, सामान्यांच्या नजरा,त्या सायकलवर खिळल्याशिवाय राहत नाही.असा अनुभव अनेकांना आला असेल,यात मला तिळमात्र शंका नाही.         
फिटनेस मिळवण्याचं,स्वस्त व आरोग्यदायी,साधन म्हणून संपूर्ण जग आज सायकलकडे बघत आहे.युरोपीय देश,अमेरिका ,चीन यांनी केव्हाच सायकलला स्वीकारले आहे. आम्ही मात्र गरीब देश असूनही, बुलेटने 'धुरळा'उडवीत आहोत. काही दिवसांपूर्वी नागपूरच्या महापौरांनी नागपूरमध्ये 'डेडिकेटेड सायकल ट्रॅक' तयार करणार असल्याची व नागपूर शहराला 'सायकल कॅपिटल ऑफ इंडिया 'करण्याची घोषणा केली. पुढे या घोषणेचं काय होईल, ते काळच सांगेल.तूर्तास कुणाला येवो न येवो ,सायकलला मात्र "अच्छे दिन"आले आहेत,हे नक्की.


सहज वाटलं, आपणनही या 'सायकल अभियानात'आपला खारीचा वाटा उचलावा,  म्हणून आम्ही,मित्रांनी सायकलने एक लांब रपेट मारण्याचे ठरविले.मग काय,आदल्यादिवशी नियोजन केले व दुसऱ्या दिवशी सकाळी मोहगाव( झिल्पी) डॅमकडे जाण्याचे ठरले. दुसऱ्या दिवशी सकाळी जवळपास साडेसहा वाजता सगळ्यांनी आपापल्या सायकली काढल्या व घरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहगाव (झिल्पी )येथे जाण्यासाठी बायपास रोडवर  भेटलो.

एका टपरीवर नागपूरच्या प्रसिध्द 'तर्री पोह्याचा'आस्वाद घेतला व त्यानंतर कडक,वाफाळलेला चहा घेऊन मोहगावच्या रस्त्याने मार्गस्थ झालो.                                                                     


हिंगणा-मोहगाव रस्त्याच्या दुतर्फा, बागायती शेती,संत्र्यांच्या बागा व अनेक फार्म हाऊसेस असल्याने,तसेच रस्ता नव्याने तयार झालेला असल्याने ,सायकलिंग करण्यात वेगळीच मौज वाटत होती. मधे थांबत, बसत, गप्पागोष्टी करत, आम्ही पुढे जात होतो.कारण आमची ना कुणाशी स्पर्धा होती,ना आम्ही 'व्यावसायिक सायकलपटू' होतो.आम्ही होतो,हौशी सायकलपटू.सायकलीही बहुतेकांकडे साध्याच होत्या.पण उत्साह मात्र 'खास' होता.                               

लोकं पन्नास -शंभर किलोमीटर सायकलिंग करतात,आपण नाही तेवढे,पण दहा किलोमीटर तर जाऊच शकतो,असा विश्वास सर्वांच्या ठायी होता.पंधरा वर्षे या एकाच रस्त्याने नोकरीनिमित्त अपडाऊन केले असल्याने, रस्ता तसा नेहमीचा 'परिचित' होता. परंतु,सायकलने या रस्त्याने होणारा आमचा हा   'पहिलाच' प्रवास असल्याने,रस्ता जणू नव्याने आपली ओळख करून देत  असल्याची अनुभूती आम्हा सर्वांना येत होती.


   




 

 मजल- दरमजल करत मोहगावला पोहचलो.गाव ओलांडल्यावर आम्हाला, झिल्पी डॅम व मोहगावच्या दरम्यान ,तेथील स्थानिक युवकाने "आसरा"नावाचं एक नवंकोरं फॅमिली रेस्टॉरंट सुरु केलेलं दिसलं.सकाळची वेळ असल्याने ते बंद होतं, मात्र त्या रेस्टॉरंटचा थाट काही औरच होता.हिरवाईने नटलेल्या टेकडीच्या पायथ्याशी, अतिशय सुसज्ज, नीटनेटके व देखणे असे हे रेस्टॉरंट, पर्यटकांना नक्कीच खुणावत असणार,याची मनोमन खात्री पटली. शिवाय, इथे अस्सल गावरान जेवण व नाश्ता मिळतो,असे विचारपूस केल्यावर कळले.पुढे कधीतरी येथील जेवणाचा आस्वाद घेऊ,असे मनाशी ठरवून आम्ही झिल्पी डॅमच्या वाटेने जाऊ लागलो.                           


 दरम्यान, रस्त्याच्या कडेला विदर्भातील पाहिले 'डेट्स फार्म'अर्थात 'खजुराची शेती'दिसली.ही शेती 'थंगावेलू'आडनाव असणाऱ्या 'साऊथ इंडियन'माणसाची होती,हे कळल्यावर त्याचे विशेष कौतुक वाटले.कारण, आम्ही 'मराठी माणसं' गावची वेस ओलांडताना हजारदा विचार करतो. इथे मात्र,एक दक्षिणेतला माणूस नागपूर सारख्या शहरात,त्यातल्या त्यात एका खेड्यात येऊन,विदर्भात किंबहुना महाराष्ट्रात खजुराच्या शेतीचा पहिला प्रयोग काय करतो,तसेच 'ऍग्रो टुरिझम'सारख्या संकल्पना,शेतकरी आत्महत्या होणाऱ्या विदर्भात यशस्वीपणे राबवतो, हे सगळंच अचंबित करणारं आहे.             

 पुढे,काहीसा चढाई असलेला मार्ग मागे सारून आम्ही आमच्या "डेस्टिनेशन"ला पोहोचलो. नेहमीप्रमाणे इथेही फोटोग्राफी करण्यास आम्ही अजिबात कसूर केली नाही.                                       

डॅमच्या बाजूने, "मैत्रबन"या वृद्धांच्या निवासी ग्रामकडे जाणाऱ्या रस्त्याने आम्ही डॅमचं बॅकवॉटर बघत पुढे जात होतो.या परिसरात आम्हाला नागपूरच्या मोठया राजकीय पुढाऱ्यांचे फार्म हाऊस असल्याचे कळले.तसेच या परिसरात लवकरच सिद्धिविनायक मंदिराचं निर्माण कार्य सुरू होणार असल्याचे समजले. इथे आम्ही मंदिराच्या कारागिरांशी संवाद साधला.

       



आता आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.रस्त्याला उतार असल्याने हा प्रवास जलदगतीने होत होता.प्रवासाचा काहीसा क्षीण जाणवत होता,पण उत्साह अजूनही कायम होता.पुढच्या टूरचे नियोजन करीत,कधी आम्ही हिंगणा बायपासजवळ पोहोचलो, आमचे आम्हालाच कळले नाही.परत इथे,गरमागरम समोस्यावर आम्ही ताव मारला, चहा घेऊन,सर्वांनी आपापल्या घरची वाट धरली.

     


 या प्रवासात,'आनंद' हा पैशाने विकत घेता येत नाही,हे प्रकर्षाने जाणवलं.जीवनातल्या साध्या, सोप्या वाटणाऱ्या गोष्टींत लाखमोलाचा आनंद व आभाळभर सुख दडलेलं असतं,आपण मात्र ते घेण्यात कमी पडतो, हेही अनुभवलं. मोठमोठ्या कार ड्राईव्ह करून, जे थ्रील तुम्हा-आम्हाला येणार नाही,ते थ्रील सायकलिंग तुम्हाला देते,असे म्हणणे अतिशयोक्ती नाही,याची प्रचिती स्वतः अनुभवल्यावरच आली.म्हणून,कोरोना महामारीच्या निमित्ताने,पुन्हा एकदा जीवनाकडे डोळसपणे पाहूया व जीवनाच्या छोट्या छोट्या क्षणांना भरभरून जगुया,धन्यवाद.
To watch our more cycle stories,do visit,my youtube channel,Glocal Marathi,at link below



Best of glocal marathi

गनिमीकावा

        गनिमीकावा संकटे बहु येतील, हरणे तुला ठाव नाही.. कोंडीत सापडाया, गड्या तू कुणाचा साव नाही..!!     भेटतील सरडे,      पदोपदी तुला रे.. ...