रविवार, ४ एप्रिल, २०२१

Positive

Courtesy:Unsplash-Miguel Bruna

 होस्टेलच्या रुमचं दार उघडून विरेंद्र म्हणजेच आमचा 'वीरू' आत आला.वीरूच्या चेहऱ्यावर नेहमीचं तेज दिसत नव्हतं.तो अतिशय खिन्न व उदास वाटत होता. त्याला अशा अवस्थेत बहुदा होस्टेलच्या एकाही मुलानं आजवर बघितलं नव्हतं.म्हणून आम्हा सर्वांना त्याचं प्रचंड आश्चर्य व कुतूहल वाटत होतं.वीरू आल्या- आल्या आपल्या बेडवर लोटला व अंगावर चादर पांघरूण झोपी गेला. झोपतो कशाचा..झोपेचं सोंगच करत होता. असं असलं तरी त्यानं काही केल्या पांघरूण डोक्यावरून काढलं नाही व रुममधल्या कुणाशीही चकार शब्द तो बोलला नाही.

    वीरूबद्दल सांगायचं झाल्यास,वीरू हा विशीतला देखणा,हँडसम, चार्मिंग..वगैरे वगैरे.. मुलगा.नागपूर जिल्ह्यातील नरखेड या गावचा.बारावीची परीक्षा विज्ञान शाखेतून पास झालेला.अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धिमत्तेचा धनी.घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याला बारावी नंतर शिक्षण बंद करून मोलमजुरीची कामे करावी लागली.यात त्याचा संबंध मजूर व कष्टकरी वर्गाशी आला.व त्यांच्यासोबत काम करता-करता,जीवनाकडे डोळसपणे बघण्याची  दृष्टी त्याला प्राप्त झाली. कष्टकऱ्यांच्या जगण्याची धडपड पाहून त्याला शिक्षणाचं महत्त्व जाणवलं व तब्बल वर्षभर कष्टाची,अंगमेहनतीची कामे केल्यानंतर, स्थानिक आमदाराच्या शिफारशींच्या आधारे,स्पेशल केसद्वारे तो उशिराच शासकीय हॉस्टेल मध्ये दाखल झाला.

     


बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असूनही त्याने एलएलबीला प्रवेश घेतला.कमी वयात जास्त कटू अनुभव घेणारा, वीरू मूलतः चंचल, अस्थिर स्वभावाचा होता. तरी,प्रसंगी अतिशय प्रगल्भ वाटायचा..कधीही परिस्थितीशी हार न मानणारा..होस्टेलच्या लहान मोठ्यांशी नेहमी खोड्या..चेंगळ.. मस्ती करणारा वीरू,आज मात्र पार हादरून गेल्यासारखा भासत होता.अचानक त्यानं सर्वांशी बोलणं सोडून दिलं.हल्ली तो दिवसभर रूममधून गायब असायचा.कॉलेजची लेक्चर्स तो बंक करू लागला.एकटाच विनाकारण रस्त्याने फिरत बसायचा.जणू तो आम्हा सर्वांना किंबहुना अवतीभवतीच्या जगाला टाळत होता.त्याच्यातला तो आधीचा आत्मविश्वास.. कुछ भी कर जाने की जिद..डोळ्यातली ती चमक कुठेतरी हरवली होती.आता त्याचं जेवणही कमी होऊ लागलं होतं.त्याच्या वागण्या, बोलण्यात,दिसण्यात व असण्यात झालेला आमूलाग्र बदल सर्वांना बोचत होता.त्याला चिडवणारी सिनियर मुलं व त्याच्याशी मस्ती करणारी ज्युनियर मुलं वीरूच्या अशा वागण्याने पार कोड्यात पडली होती.हसावं की रडावं,अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती.                                                      वीरूचा जिवलग मित्र सुमित, यामुळे अधिकच बेचैन झाला.वीरू व सुमित म्हणजे लंगोटी यार.. दो जिस्म एक जान ..म्हणून वीरूच्या या अवस्थेचे कारण केवळ सुमितच जाणून घेऊ शकेल,यात कुणालाच तिळमात्र शंका नव्हती .

रूममध्ये एकांतात सुमितने वीरुला विचारलं,

"यार वीरू, काय झालं?सांगशील की नाही ?"

"कसं सांगू ?काय सांगू?काहीच सुचत नाही."  वीरू बोलला."अरे सांग एकदाचं, डोक्यावरचं ओझं हलकं कर.मैं हूं ना!टेक ईट ईझी!सुमितने त्याला धीर दिला.वीरूही हे ओझं दोन दिवसांपासून वाहत होता. त्यालाही आपलं मन मोकळं करायचं होतं.सुमितच्या बोलण्याने 

त्याला हिम्मत आली.व तो सांगू लागला," सुमित तुला आठवतं, मी गेल्या आठवड्यात ब्लड डोनेशन करायला एका ब्लड बँकेत गेलो होतो."

सुमित -"हो आठवतय ना.त्याचं काय ?"

वीरू-"अरे मला वाटलं, माझं रक्त 

कुणा गरजू व्यक्तीच्या कामी येईल,म्हणून मी ब्लड डोनेट केलं.व रूमवर आलो.थोडी विश्रांती घेतली व आपल्या कामाला लागलो."

सुमित-" त्यात काय एवढं उदास होण्यासारखं. तू तर एक उत्तम काम केलं आहेस.

वीरू-"तुला माहिती आहे का? आपण जेव्हा ब्लड डोनेट करतो तेव्हा आपल्या रक्ताची संपूर्ण चाचणी केली जाते.व त्यानंतरच ते लाभार्थी रुग्णाला दिलं जातं."

सुमित-"हो,मग त्यात काय एव्हढं."

वीरू-"त्यातच तर खरी गोम आहे.त्या ब्लड बँकेतून मला परवा फोन आला.व त्यांनी मला तुमचं रक्त एचआयव्ही इंफेक्टेड असल्याचं सांगितलं व  तुम्ही एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे तुमचं रक्त ब्लड डोनेशनसाठी रिजेक्ट करण्यात आल्याचही सांगितलं.आता मात्र सुमितही पार हादरून गेला. त्याला काय बोलावं हेच सुचेना. काही वेळ दोघेही नि:शब्द होते.मग स्वतःला सावरून सुमित बोलला, "यार वीरू,तु कसा काय एचआयव्ही पॉझिटिव्ह असू शकतो ?कारण एच आय व्ही एड्स, दूषित रक्त, असुरक्षित यौनसंबंध यांसारख्या कारणाने होतो.तुझ्या बाबतीत मात्र यापैकी काही घडलं असेल असं मला वाटत नाही".

Courtesy:Unsplash-Sergey Mikheev

वीरू मात्र रडक्या आवाजात सुमितला सांगू लागला."सुमित,मलाही असच वाटत होतं.

मग मी खूप विचार केला. माझ्या जीवनातले अनेक बरेवाईट प्रसंग आठवू लागलो.विचार करता-करता एका प्रसंगाजवळ येऊन थांबलो.

सुमित-"कोणता प्रसंग वीरू?,तु कधी सांगितलं नाहीस."

वीरू-" हो यार, राहूनच गेलं सांगायचं.बरं,आता सांगतो.तुला ठाऊक आहे,मी बारावीनंतर वर्षभर मोलमजुरीची कामं केली, मिळेल ते काम केलं.मजुरांसोबत काम करताना माझं भावविश्व पार बदलून गेलं होतं. तिथे मला पक्या भेटला. तो तिशीतला तरी असेल. त्याला बाई-बाटलीचा भारी नाद होता.मेहनत करून कमावलेली कमाई तो या दोन गोष्टींवर उधळायचा. एक दिवस पक्या मला म्हणाला,

"काय वीरू चालतो का GJमध्ये.मला काही कळेना.हे GJम्हणजे काय?त्यावर पक्या म्हणाला,वीरू नागपूरला चल, तुला दाखवतो गंगा - जमुना.तूझी भेट घडवून देतो एखाद्या बाईशी.नाहीतर असाच राहशील बिनकामाचा!!"

तेव्हा उत्सुकतेपोटी मी गेलो त्याच्यासोबत,

एका रविवारी त्या वैश्या वस्तीत.

मला त्याने एका अंधाऱ्या खोलीत ढकलून दिलं व  काम झाल्यावर दोनशे रुपये देण्याचंही सांगितलं.भांबावलेल्या अवस्थेत मी पंधरा-वीस मिनिटात तेथून बाहेर पडलो.व पक्याची वाट न बघता सरळ आपलं गाव गाठलं.हीच काय ती चूक, माझ्या हातून झाली असावी,असं मला राहून-राहून वाटतं.

सुमित वीरूचं बोलणं, निर्विकार चेहऱ्याने ऐकत होता. आता त्यालाही वीरू एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं पटलं होतं.वीरुचं दुःख दूर करण्याच्या प्रयत्नात,सुमितही अंत:र्बाह्य दुखावला गेला.त्याच्या मित्रावर ओढवलेलं, हे अरिष्ट कसं दूर होईल, याचाच तो आता विचार करू लागला.                                          दोन दिवसानंतर....

वीरू त्याच्या नेहमीच्या हसर्‍या चेहर्‍याने सुमितच्या रूमवर आला.त्याच्या चेहर्‍यावरील आनंद गगनात मावत नव्हता. सुमितला आश्चर्य वाटलं,काल-परवापर्यंत दुःखाच्या महासागरात बुडालेला वीरू, आज इतका आनंदी कसा?परंतु काही का असेना,याचं त्यालाही बरं वाटलं.

सुमित-"वीरू,आज तू एकदम खुश दिसतोय, झालं तरी काय?"

वीरू-"यार सुमित,आत्ताच मला त्या ब्लड बँकेतून फोन आला.त्यांच्याशी बोलून मी धावत-पळत तुझ्याकडे आलो बघ."

सुमित-"अरे,असं काय बोलणं झालं तुझं फोनवर?"

वीरू-"त्या ब्लड बँकेत म्हणे ..भलताच घोळ झाला.त्याचं झालं असं, माझी ब्लड रिपोर्ट व दुसऱ्या एचआयव्ही पॉझिटिव्ह पेशंटची ब्लड रिपोर्ट एकाखाली एक असल्यामुळे,

तिथल्या कंप्यूटर ऑपरेटरने त्या पॉझिटिव पेशंटची रिपोर्ट,माझी रिपोर्ट समजून मला कॉल केला. मग नंतर त्यांनी त्याचा जेव्हा follow up घेतला तेव्हा त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी लगेच मला कॉल करून माझी माफी मागितली. मी मात्र त्यांना चांगलच खडसावलं.पण शेवटी,'अंत भला तो सब भला' म्हणून विषय सोडून दिला.गेल्या दोन दिवसापासून माझ्या जीवाची जी घालमेल होती ती संपली एकदाची..आज मला जणू पुनर्जन्म मिळाला असं वाटतंय.आज मी एचआयव्ही पॉझिटिव्ह जरी ठरलो नसलो,तरी विचारांनी मात्र पॉझिटिव्ह झालो हे नक्की!!"असं म्हणून वीरूने आनंदाच्या भरात सुमितला मिठी मारली. 

1 टिप्पणी:

Best of glocal marathi

गनिमीकावा

        गनिमीकावा संकटे बहु येतील, हरणे तुला ठाव नाही.. कोंडीत सापडाया, गड्या तू कुणाचा साव नाही..!!     भेटतील सरडे,      पदोपदी तुला रे.. ...