![]() |
Courtesy:Pixabay |
सकाळचे साडेसात वाजले असतील,विशालला आज जरा उशीराच जाग आली."आई,ये आई!असं म्हणून त्याने कमलाबाईला आवाज दिला.प्रतिसाद न मिळाल्यामुळे घरातल्या दोन्ही खोलीत त्याने तिला शोधले. शेजारीपाजारी सगळीकडे शोधाशोध केली. तरीही तिचा पत्ता लागला नाही. गावातल्या नातेवाईकांकडे जाऊन त्याने विचारणा केली. शिवाय ओळखीतल्या कास्तकारांकडेही तो जाऊन आला. त्यांनीही कमलाबाई आल्याचं सांगितलं नाही. आता मात्र विशाल पार गोंधळून गेला. 'कमलाबाई घर सोडून गेली.'ही बातमी हळूहळू वणव्यासारखी सबंध गावात पसरली.
जो-तो आपापल्या परीने निष्कर्ष काढू लागला. कुणी म्हणे,'ती टेन्शनमुळे घर सोडून निघून गेली असेल'.तर कुणी म्हणे,'चकव्याने तिला नेलं असेल'. काही बहाद्दर तर,'तिला कोणी चेटूक केलं असेल',असेही बरळू लागले.या-ना त्याप्रकारे कमलाबाईच्या नसण्याविषयी चर्चांना उधाण आलं होतं. विशालला मात्र काय करावं, काय नाही,असं झालं होतं.
तसाही तो फार शिकला नव्हता व त्याचाही काही प्रमाणात का असेना,या सार्या अंधश्रद्धांवर विश्वास होताच. म्हणून त्याच्या मनाची फार घालमेल होत होती.वडिलांच्या निधनानंतर व दोन्ही बहिनींच्या लग्नानंतर, तो व कमलाबाई हेच एकमेकांच्या सुखदुःखाचे साथीदार होतेे.मोहल्ल्यातल्या एकानेही या मायलेकांना एकमेकांशी भांडताना किंवा वाद घालतांना कधीही बघितलं नव्हतं. कमलाबाई शेतीच्या कामाला जायची तर विशाल घरच्या जुन्या टाटा सुमो, या सवारी गाडीने छोट्या-मोठ्या ट्रीप न्यायचा. कमलाबाईच्या कष्टीकपणामुळे पैशाची तशी फारशी चणचण त्यांना नसायची. एकंदरीत अगदीच सुखी नाही तरी, समाधानकारक असं,आयुष्य कमलाबाई जगत होती.
...कमलाबाईच्या घरामागे पडीक जमीन होती व तिथनं, एक पायवाट 'सनराइज' नावाच्या कंपनीच्या लेआउटकडे गेली होती. हिवाळ्याची चाहूल लागली असल्याने सगळीकडे हिरवळ होती. शेतात कामाला जाणाऱ्या महिलांनी या हिरवळीतून पायवाट तयार केली होती. कमलाबाई सुद्धा या पायवाटेने बऱ्याचदा मजुरीला जायची. काही वर्षांपूर्वी सनराइज् कंपनीच्या लेआउटच्या जागी एकनाथरावांची शेती होती.कमलाबाईंनी शेतमजूर म्हणून अनेकवेळा या शेतात काम केलं होतं. शेतात मोठी विहीर असल्याने, बारमाही पिकं घेतली जायची.हल्ली लेआऊट बनल्यामुळे, तिकडं कुणी फारसं भटकत नसे.
.... कालच्या रात्री विशाल व कमलाबाईंनी सोबत जेवण केलं.जेवताना गप्पाही केल्या.'उद्या प्रभाकररावांच्या शेतात लवकर कामाला जायचं आहे',असं म्हणून कमलाबाई लवकर झोपायला गेली.तिकडे विशालही जेवणानंतर फेरफटका मारून आला व लगेच झोपी गेला.झोपताना उद्याच्या दिवशी नशिबात काय वाढून ठेवलं आहे, याची कदाचित दोघांनाही कल्पना नव्हती.
...मध्यरात्री दोनच्या सुमारास, अचानक कमलाबाईला जाग आली.सगळीकडे निरव शांतता पसरलेली होती.कमलाबाईने जणू भारावलेल्या अवस्थेत घराचं दार उघडलं. पायात चप्पल घातली. मागे वळून विशालकडे बघितलंही नाही.घरामागच्या पायवाटेला तुडवीत, साप, विंचू,व काट्यांची पर्वा न करता, ती पुढे-पुढे जात होती.तिची दिशा स्पष्ट होती.वाटेत आडवे-उभे रस्ते असणारी सपाट जागा लागली.तिला ती जागा परिचयाची वाटली.कुणीतरी आपल्याला बोलवत आहे,या ओढीने ती पुढे अंधारात जणू गायब झाली...
.... आता मात्र सकाळचे नऊ वाजले होते. काही केल्या कमलाबाईचा पत्ता लागत नव्हता. गावातले तरुणही या शोधमोहिमेत सामील झाले. चारही दिशा, लहान-थोर धुंडाळू लागले. बाहेरगावच्या नातलगांना फोन करून,विचारून झालं.आजूबाजूच्या गावखेड्यातुनही मागोवा घेण्यात आला.आता मात्र कमलाबाईंच्या घरून जाण्यावर नाही,तर कमलाबाईच्या जिवंत असण्या व नसण्यावर चर्चा होऊ लागली.अवघ्या बावीस-तेवीस वर्षाच्या विशालपुढे,'आईविना पुढचं आयुष्य कसं जगावं'? हा प्रश्न राहून-राहून उभा ठाकू लागला.या घटनेमुळे एरवी शांत असणारं गाव, अचानक खडबडून जागं झालं होतं.
..
..अकरा वाजले, रमेश नावाचा गावातला तरुण मासेमारीसाठी गावच्या बंधाऱ्याच्या दिशेने जायला निघाला. कमलाबाईच्या घटनेबद्दल त्यांने ऐकलं होतं.वाटेत 'सनराइज् लेआउट' लागल्याने व तेथील विहिरीत भरपूर पाणी असल्याने त्याची,पोहायची इच्छा झाली. रमेश तसा पट्टीचा पोहणारा होता. लगेच त्याने पायातली चप्पल काढली व अंगातले कपडे काढले...बघतो तर काय? त्याला विहिरीच्या पायरीवर दोन चपला दिसल्या."अरे वा!पोहायला सोबती आहे वाटतं",असं मनातल्या मनात बोलून, तो आनंदला.विहिरीच्या थडीवर उभं राहून उडी मारणार..तोच त्याला विहिरीत बाईचं प्रेत तरंगताना दिसलं. प्रेत पाठमोरं असल्यानं,ते कुणाचं असावं,याचा त्याला अंदाज आला नाही.मात्र गावातल्या चर्चेवरून ते कमलाबाईचं प्रेतअसावं,असं त्याला वाटलं.
..... तो तडक गावात आला.लागलीच विशालच्या घरी गेला.गावातली माणसं तिथे होतीच. रमेशच्या सांगण्यावरून संपूर्ण गाव विहिरीच्या दिशेनं निघाला.हौशे-गौशे गोळा झाले. गावातल्या जुन्या- जाणत्या माणसांनी पोलिसांना कळवलं.पोलिसांची गाडी आली.प्रेत विहिरीतून बाहेर काढलं. पोस्टमार्टमला पाठवण्यात आलं. विशाल मात्र धाय मोकलून रडत होता. लगोलग नातेवाईकांना फोन गेले. संपूर्ण गावावर शोककळा पसरली. आता मात्र कमलाबाईच्या जिवंत नसण्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.
परत गावात चर्चांना उधाण आलं.. .."कमलाबाईला चकव्याने तर विहिरीत ढकललं नसेल.." "तिला भूतानं तर झपाटलं नसेल.".."तिने आत्महत्या तर केली नसेल"..असंख्य तर्क-वितर्कानंतरही, कमलाबाईंच्या मृत्यूचं गूढ आजतागायत कायम आहे...मात्र अजूनही..रात्री अपरात्री.. त्या विहिरीच्या दिशेनं जातांना,कित्येकांना कमलाबाई दिसल्याच्या अफवा वरचेवर गावात पसरत असतात..