मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

दिवाळी मिलन

 💥दिवाळी मिलन

(Just for Fun)




लोकनेते श्री.आ.बा. राजकारणे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी यावर्षी दिवाळी निमित्त एकत्र भेटण्याचं ठरवलं.दहावीनंतर प्रथमच ते एकमेकांना भेटणार होते.मात्र कामानिमित्त सर्वजण वेगवेगळ्या शहरात कार्यरत असल्याने,हे शक्य झालं नव्हतं.त्यामुळे,हे दिवाळी मिलन कुठे करायचं, याबद्दल त्यांची चर्चा सुरू झाली...


 'दिवाळी मिलनाला सर्वांनी बारामतीला यावं.मी सर्व मित्रांना माझ्या तर्फे घड्याळ भेट देईन.वरद काकांच्या गोल्डन ओक बंगल्यावर पार्टी करुया,जाम मजा येईल.' घड्याळाच्या कंपनीत काम करणारा सुजित आग्रहाने बोलला. याला मात्र हायकोर्टात वकिली करणाऱ्या,वीरेंद्रने स्पष्ट शब्दात नकार दिला.'सर्व मित्र नागपूरला आल्यास, मी सर्वांना पाठवडी रस्सा व सावजी चिकन खाऊ घालतो, मस्त माहोल करुया..काय बोलता मित्रांनो..',वीरेंद्र आवेशात बोलला.

 पेशाने चित्रकार असलेल्या विराजला व स्वतःचा फोटो स्टुडिओ असलेल्या उद्भवला यातलं काहीच रुचलं नाही...

'ते काही नाही..दहावीत असताना,तुम्ही आम्हाला गंडवून,फक्त भोलानाथला घेऊन  कशी मामलेदार मिसळ खाल्ली होती,हे आम्हाला चांगलं आठवतं..नव्हे हे लक्षात आहे'.उद्भव तावातावाने बोलला...

'ते काही नाही, यावेळी दिवाळी मिलन मुंबईला होणार म्हणजे होणार..कुणाचा बाप हे रोखू शकत नाही ' विराज बेभान होऊन बोलत होता..

बायोडिझेल कंपनीचा मालक असणारा बिपिन, पक्का खवय्या असल्याने व मुंबईचा वडापाव पुन्हा चाखायला मिळणार म्हणून लगेच तयार झाला.'अरे हो..हो,दिवाळी मिलन मुंबईलाच करुया..अजून तुझी अरेरावी करण्याची बालपणीची सवय गेली नाही वाटतं ' असे म्हणत, बिपिनने वीराजला डीवचलं.मग काय, वीरेंद्रही यासाठी तयार झाला.. सुजितला वाटलं, वरद काकांच्या नकळत,जीवाची मुंबई करून घेऊया.. म्हणून तोही राजी झाला.


 भोलानाथला वाटलं,की हजार रुपयाचं तिकीट काढून नागपूरला जाण्यापेक्षा, स्वतःच्या ऑटोने ठाण्याहून मुंबईला जाणं कधीही बरं.. त्यानेही संमती दर्शविली. अशाप्रकारे लोकनेते श्री.आ.बा. राजकारणे विद्यालयात शिकणाऱ्या या वर्ग मित्रांनी चर्चेअंती शिवाजी पार्कवर जमण्याचं निश्चित केलं.. ठरल्याप्रमाणे सर्व एकत्र आले. वीरेंद्रने सुतळी बॉम्बचा डबा सोबत आणला. बिपिन नागपूरच्या इतवारी मार्केट मधून इको फ्रेंडली फटाके घेऊन आला.सुजितने बारामतीहून फुलझडीचे पाकिट व रॉकेट आणले. विराज त्याच्या आवडीचा लक्ष्मी बॉम्ब घेऊन आला. तिकडे उद्भवने मिरची फटाके आणले. भोलानाथने चकरीचं पाकीट आणलं.फटाके फोडण्याची सुरुवात बिपीनने केली.बिपिनच्या इको फ्रेंडली फटाक्याने कुणालाही मजा आली नाही.मग सुजितने त्याचं रॉकेट बाहेर काढलं..'अरे,त्याची दिशा मंत्रालयाकडे कशाला करतोस?मंत्रालयाला आग लागली तर..?' असे म्हणत वीरेंद्रने रॉकेटची दिशा बदलली.'आता बघ, मी कसा सुतळी बॉम्ब फोडतो..व कसा उद्भवला घाबरवतो..' वीरेंद्र हातवारे करून बोलत होता..

.. ईकडे उद्भव  कॅमेऱ्याने दिवाळीचे क्षण टिपण्यात गर्क झाला होता..अचानक विरेंद्रने सुतळी बॉम्ब फोडला..त्याच्या आवाजाने उद्भवच्या छातीत धडकी भरली..' उद्भव,भिऊ नकोस,मी तुझ्या पाठीशी आहे..सुतळी बॉम्बपेक्षा भारी, लक्ष्मी बॉम्ब, माझ्याजवळ आहे.यांनी जास्तच त्रास दिला तर,आपण आबासाहेबांना सांगू.' विराजने उद्भवचे सांत्वन केले.एवढ्यात भोलानाथने चक्री पेटवली..ती विराज व उद्भवच्या पायाजवळ फिरू लागली..दोघांनी घाबरून एकमेकांना मिठी मारली..सुजित, वीरेंद्र,भोलानाथ व बिपिन,दोघांकडे पाहून हसू लागले..इकडे,विराज व उद्भव रागारागाने घरी निघून गेले...


'अरेच्चा..आपण दिवाळी फराळ केलाच नाही..उद्भव व विराज तर निघून गेले.दिवाळी मिलन करायला गेलो व दिवाळी विलाप करण्याची वेळ आली,असे वाटते'...बिपिन मधला वैदर्भीय माणूस जागा झाला.तेवढ्यात शिवाजी पार्कवर दोन मुलं फिरताना दिसली.वीरेंद्रने त्यांना त्यांची नावे विचारली.'माझे नाव विक्रमादित्य व हा समित.',असे विक्रमादित्य बारक्या आवाजात बोलला.'मग तुम्ही इथे एकटे का फिरत आहात?तुमचे पालक कुठे आहेत? मी माझ्या ऑटोने तुम्हाला घरी सोडून देवू का?' भोलानाथ  नेहमीप्रमाणे  मदतीच्या भावनेने बोलत होता..'काका आम्ही आमच्या बाबांसोबत इथे आलो होतो,आम्ही त्यांना शोधतोय,पण ते काही दिवस नाही.'.

..सुजितने पुणेरीबाणा दाखवत आपुलकीने चौकशी केली.' तुमच्या वडिलांचे नाव काय?'... मितभाषी असणारा समित मात्र लगेच उत्तरला,' उद्भव आकरे यांचा हा,विक्रमादित्य मुलगा आहे व विराज आकरे माझे वडील आहेत.'.

'अरे तुम्ही दोघं आमच्या मित्रांची मुलं आहात तर..इकडे या बाळांनो..,हा दिवाळी फराळ घ्या.. मी तुम्हाला घरी सोडून देतो..उद्भव व विराज जरा नाराज होवून घरी गेले.. तुम्ही त्यांची समजूत घालाल का?' भोलानाथ काकुळतीने बोलत होता..'हो काका,तुम्ही काही चिंता करू नका..तुमची मैत्री कायम राहावी,असेच आम्हाला वाटते.. तुमचा मेसेज एकदम परफेक्ट घरी पोचवतो..' रव्याच्या लाडवांवर ताव मारत,विक्रमादित्य बोलत होता.


'..बसा आता, ऑटोत..' भोलानाथ गिअर टाकत बोलला..' हॅप्पी दिवाळी,काका! '..हात उंचावून बाय बाय करत दोन्ही मुलं आनंदाने घरी निघुन गेली..बिपिन व वीरेंद्र,कौतुकाने बराच वेळ रस्त्याकडे पाहत राहिले..



✍️श्री.चंद्रभान अरुण शोभणे


Dt.21/10/2025

सोमवार, १३ ऑक्टोबर, २०२५

प्रितम


 🍁प्रितम


..बऱ्याच दिवसानंतर,मला रवीचा फोन आला. गाव सोडून सात - आठ वर्षे झाले असतील.यादरम्यान रवीने फोन केल्याचे मला तरी आठवत नव्हते.कधी गावाला गेलो तर त्याची भेट व्हायची. गावाकडच्या मित्रांचं कसं चाललंय, याबाबत मी त्याच्याशी चौकशी करायचो.तोही त्याच्यापरीने सगळ्यांविषयी सांगायचा.आज मात्र त्याच्या आवाजावरून काहीतरी विपरीत घडल्याचं मला जाणवलं."अरे, आपला प्रीतम गेला.."असे म्हणत तो रडू लागला. मीही काहीक्षण नि:शब्द झालो. काय बोलावे,मला काही सुचत नव्हतं. माझेही डोळे पाणावले.काय व कसं घडलं,हे विचारण्याचं मी धाडस करू शकलो नाही.


...अचानक प्रितमचं देखणं रूप माझ्या नजरेपुढे उभं राहीलं.वयाच्या अवघ्या तिशीत तो या जगाचा निरोप घेईल,असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. एका दलित शिक्षक दांपत्याच्या पोटी जन्मलेला प्रितम, नावाप्रमाणेच दोस्ता-मित्रांत प्रेमाची पेरणी करणारा होता. आई-वडिलांच्या नोकरीच्या अडचणींमुळे, बालपणापासूनच त्याला आजोळी ठेवण्याचे त्याच्या पालकांनी ठरविले. सुरुवातीचे काही दिवस वगळता, तो जास्तीत जास्त वेळ आजी-आजोबांच्या मायेच्या सावलीत वाढला.रूढार्थाने त्याला आई-वडिलांचे प्रेम काही लाभले नाही. आजी-आजोबा सुद्धा शिक्षक, शिवाय ते वारकरी संप्रदायाला मानणारे.त्यामुळे प्रितमवर बुद्धांच्या विचारांपेक्षा,विठ्ठल भक्तीचा प्रभाव कायमच जास्त राहिला.भूगावातील जिल्हा परिषद शाळेत त्याचं प्राथमिक शिक्षण झालं.आजी- आजोबांच्या अतिशय लाडात वाढलेला प्रितम, तसा अभ्यासात हुशार.वर्गात प्रथम येणारा नसला,तरी थोड्या अभ्यासाने उत्तम मार्क्स घेणारा.


..मात्र यादरम्यान त्याच्यात काहीतरी विचित्र बदल घडू लागला.त्याच्या वर्गमित्रांना हा बदल जाणवू लागला. अलीकडे प्रितम, काहीसा मुलींप्रमाणे वागतो..बोलतो.. व चालतो..,असे सगळ्यांना वाटू लागले.कदाचित प्रितमला हे जाणवत नसावं.शिवाय आजी-आजोबा त्याच्यावरील  प्रेमापोटी त्याकडे दुर्लक्ष करू लागले. दिवसांमागून दिवस जात होते.प्रितम आता सातवीत गेला.मित्रांच्या गळ्यात कारण नसताना हात घालणं..त्यांच्या गालांना हाताने स्पर्श करणं.. केसावरून हात फिरवणं.. यांसारख्या गोष्टी तो करू लागला.त्याला याचं काहीच वावगं वाटत नव्हतं.मित्रही त्याची याबाबत टिंगल-टवाळी करू लागले.वर्गातील मुलीही त्याला हसायच्या.असं असलं तरी मुलींशी  प्रितम अदबीनं वागायचा.त्याच्या आवाजात वेगळंच आर्जव होतं.वर्गातील मुली त्याच्याशी बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या.जणू प्रितम आपल्यातलाच एक  आहे,असं त्यांना वाटायचं...दुसरीकडे मुलांना मात्र हा गडी आपल्यातला नाही, असं वाटायचं. आयुष्याच्या या वळणावर प्रितमचा, जगावेगळा संघर्ष सुरू होता.


..आता प्रितमने किशोर वयात प्रवेश केला.दहावीचं वर्ष होतं.प्रितमचं असणं.. म्हणजे फुल टाइमपास, असं समीकरण या काळात झालं होतं. तोही हे सगळं हसण्यावारी न्यायचा.एव्हाना त्याला त्याच्यातल्या वेगळेपणाची स्पष्ट जाणीव झाली होती.त्याचा त्याने खुलेपणाने स्वीकार केला होता.त्यामुळे एखाद्याने त्याची चेष्टा केली तर तो दुप्पट प्रतिसाद द्यायचा व समोरच्याला चार लोकांत खजील करायचा.याच टप्प्यावर माझी व प्रितमची ओळख झाली.सुरुवातीला मला त्याच्या वागण्या- बोलण्याबद्दल पुरेशी कल्पना नव्हती.  मात्र मित्रांनी, सर्वप्रकार सांगितल्यानंतर, त्याच्यातलं वेगळेपण मीही स्वीकारलं.अधेमधे तो भेटायचा.बऱ्याच गोष्टींवर आम्ही भरभरून बोलायचो.


..दरम्यान प्रितम दहावी उत्तीर्ण झाला.अकरावीला त्याने तालुक्याच्या गावी प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये प्रितम आहे म्हटल्यावर, धमाल होणारच.. तोही त्याच्या वागण्या- बोलण्यातून त्याचं वेगळेपण दाखविण्याची एकही संधी सोडायचा नाही. वर्गातील मित्र- मैत्रिणी जरी त्याची चेष्टा करीत असले, तरी तो सगळ्यांच्या गळ्यातील ताईत होता.प्रेमाच्या धाग्यात सर्व मित्रांना प्रितमने बांधले होते. एरवी मित्रांनाही त्याची सवय झाली होती.ग्रामीण भागात लहानाचं मोठं होताना,प्रितम आपलं भावविश्व घेऊन जगत होता.


... प्रितमला वाचनाचा प्रचंड वेड होतं.मराठी साहित्य त्याच्यासाठी जीव की प्राण.पुढे बीएला मराठी साहित्य हा विषय घेतल्याने,त्याच्या वाचनात वैविध्य आलं.वि.स.खांडेकर, व.पु.काळे,ना.सी. फडके,पु.ल.देशपांडे, केशवसुत इत्यादी. साहित्यिकांच्या साहित्याचा त्याने अभ्यास केला. त्यामुळे त्याच्या भाषेला वेगळीच धार आली.तो आता लिखाण करू लागला..,कविता लिहू लागला.., परिसंवाद- वादविवाद स्पर्धांमध्ये विद्यापीठस्तरावर भाग घेऊ लागला.., पारितोषिके मिळवू लागला.. त्याच्यातल्या तरल मनाला कवितेमुळे एक ऊब मिळाली. कोणत्याही विषयावर बोलण्या इतपत,त्याने वाणीवर हुकूमत मिळवली.


.. प्रितम मला पुन्हा भेटला.निमित्त होतं,नागपूरातील एका संस्थेने आयोजित केलेल्या काव्यलेखन स्पर्धेचं.. वीस- बावीस वर्षांची तरुण मुलं या स्पर्धेत सहभागी होती.त्यामुळे त्यांच्या कवितेत वैविध्य व प्रगल्भता जाणवत नव्हती. इथे मात्र प्रितमने, 'गणिका ' नावाची कविता सादर केली. एका वैश्येचं दुःख त्याने कवितेतून मांडलं. त्याच्या रसाळ व हळुवार वाणीतून ती कविता ऐकताना,सर्व श्रोत्यांचं मन गलबलून आलं.जणू प्रितमने या कवितेच्या माध्यमातून,स्वतःच जीवनच उलघडलं होतं.स्पर्धेचा निकाल जाहीर झाला व अर्थातच प्रितमला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.मला वाटलं,इथून पुढे प्रितम,एक प्रख्यात कवी होणार.मात्र नियतीला काही औरच मंजूर होतं..


.. बीएच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला, पेपर सोडवतांना, त्याच्याजवळ कागदाचा एक चिटोरा सापडला व याकारणाने पर्यवेक्षकांनी त्याला पेपर सोडवू दिला नाही.त्यामुळे तो, त्यावर्षी बीए पूर्ण करू शकला नाही. हळव्या प्रितमसाठी हा मोठा आघात होता.त्याने त्याक्षणी ठरवलं की,मी यापुढे शिक्षण घेणार नाही.घरी आल्यानंतर त्याने आजी-आजोबा व आई-वडिलांना याबाबत सांगितलं. "मी आता कीर्तनकार होणार.. व आळंदीला जाऊन कीर्तनाचं प्रशिक्षण घेणार" त्याच्या हट्टापोटी,अनिच्छेने का असेना,घरच्यांनी त्यासाठी होकार दिला.आळंदी येथे रीतसर कीर्तनाचं प्रशिक्षण प्रितमने पूर्ण केलं.अनेक अभंग त्याला तोंडपाठ होते. रामायण- महाभारतातील किस्से,तो त्याच्या रसाळ वाणीने रंगवून सांगायचा. मराठी भाषेवर त्याचं तसंही प्रभुत्व होतच.आता प्रीतम ह.भ.प.प्रितम महाराज म्हणून पंचक्रोशीत ओळखला जाऊ लागला.गावातील मंडळांमध्ये त्याची कीर्तनं होऊ लागली.नव्या पिढीतील असल्याने,प्रितमने त्याच्या कीर्तनात आधुनिक काळातील प्रश्नांची सांगड घातली. गमतीदार किस्स्यांच्या संगतीने तो समाज प्रबोधन करू लागला. त्याच्या कीर्तनाला गर्दी होऊ लागली. विदर्भातील अनेक जिल्ह्यातून लोकं त्याला कीर्तनासाठी बोलवू  लागले.हजारो गावांमध्ये त्याचं कीर्तन होऊ लागलं. गावातील मोठमोठाले आसामी व नेते त्याच्या पायांवर माथा टेकवू लागले. प्रितम आता खुश होता. जनमाणसाच्या गराड्यात वावरणं, त्याला तसंही आवडत होतं.त्याला आता अध्यात्माची ओढ लागली होती. अगदी मध्यप्रदेशातल्या मराठी भागामधूनही प्रीतमला बोलावणे येऊ लागले.त्याची लोकप्रियता आता महाराष्ट्राची सीमा ओलांडू लागली. आता पुन्हा मला वाटलं की,प्रितम महाराष्ट्र गाजवणार.. एक नामवंत कीर्तनकार होणार.. इथे पुन्हा नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.


...अचानक प्रितमची एका प्रसंगी इस्कॉनच्या कृष्णभक्ताशी भेट झाली व तो इस्कॉन संप्रदायाकडे आकर्षित झाला.स्वामी प्रभुपाद यांनी स्थापन केलेल्या इस्कॉन संप्रदायाची शिकवण त्याला आवडू लागली. कृष्णभक्तीची ओढ खुणावू लागली. कृष्ण सर्वव्यापी आहे.तो सर्व शक्तिमान आहे,ही त्याची पक्की समज झाली. तो इस्कॉन संप्रदायाशी जोडला गेला.कृष्णमंदिरात तो नित्यनेमाने जाऊ लागला.तो आता जेव्हा भेटायचा तेव्हा कृष्णाविषयी भरभरून बोलायचा.मी आता माझं उर्वरित आयुष्य कृष्णाच्या चरणी समर्पित करणार आहे,असं सांगायचा.मी त्याच्याशी याबाबत वाद घालायचो.तो माझं म्हणणं खोडायचा.तू स्वतः अनुभवल्याशिवाय या विषयावर बोलू नकोस,असं म्हणायचा. मित्रप्रेमापोटी मी विषय बदलायचो. यानंतर मात्र माझी व प्रितमची कधीच प्रत्यक्ष भेट झाली नाही.मित्रांना त्याच्याविषयी विचारायचो.ते त्यांना माहीत असलेलं सांगायचे. एक तिशीतला तरुण अचानक शिक्षण सोडतो काय.. आध्यात्मिक मार्ग निवडतो काय.. व पुढे कृष्णभक्ति कडे वळतो काय.. सगळंच कसं अकल्पनीय वाटायचं. प्रितम मात्र त्याच्या धुंदीत जगत होता.हा मार्ग त्याने स्वतः निवडला होता.एरवी त्याच्या वेगळेपणामुळे, त्याच्याकडे यापेक्षा सुरक्षित व सन्मान देणारा मार्गही त्याच्या दृष्टीने नसावा.म्हणूनच त्याने हा मार्ग निवडला असावा,अशी मी माझी समजूत करून घेतली.


..आज जेव्हा रवीचा फोन आला व प्रितम या जगात नाही,असं समजल्यावर प्रितमचा संपूर्ण जीवन प्रवास डोळ्यांसमोर  नकळत तरळून गेला.गावाकडे चौकशी केली तेव्हा कळलं.. प्रितमच्या पायाला गँगरीन झालं होतं.त्याने त्याकडे बरेच दिवस दुर्लक्ष केलं.दुर्लक्ष का केलं?हे अजूनही माझ्यासाठी अनुत्तरीत कोडं आहे.पुढे इन्फेक्शन वाढलं.त्याला बॉडी शॉक येऊन,त्याचा मृत्यू झाला.प्रितमच्या वादळी आयुष्याचा असा अनपेक्षित शेवट होईल,असं वाटलं नव्हतं. अजूनही प्रितम 'गणिका ' या त्याच्या कवितेतून.. त्याच्या मधाळ कीर्तनातून..त्याच्या हसण्यातून.. वागण्यातून.. बोलण्यातून.. त्याच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला खुणावत असतो.. सुखावत असतो.. हे मात्र नक्की...!



✍️श्री.चंद्रभान अरुण शोभणे


Dt.12/10/2025

रविवार, १० ऑगस्ट, २०२५

शंभरची नोट

 


🍁शंभरची नोट💵


15 ऑगस्ट म्हणजेच,स्वातंत्र्य दिनाचा उत्साह शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये ओसंडून वाहत होता.आदल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेचा गणवेश स्वच्छ धुऊन व इस्त्री करून घेतला. कित्येकांनी तर खिशाला लावायला व हातात पकडायला नजीकच्या दुकानातून तिरंगा खरेदी केला.काहींनी भाषणाची, समूहगीताची, तर काहींनी प्रभातफेरीत म्हणावयाची घोषवाक्ये,अगदी तोंडपाठ करून घेतली.शाळेच्या प्रांगणात पताका लावण्याची मुलांची लगबग बघण्यासारखी होती.शिक्षकही उत्साहाने एक-एक काम उरकत होते. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील, झेंडावंदन आटोपल्यावर,प्रभातफेरी गांधी चौकापर्यंत जाणार होती.गांधी चौकात गावातील सर्व खाजगी व जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी एकत्र यायचे.तेथील झेंडावंदन झाल्यानंतर,गावातील बाजार चौकात स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा पार पडायचा. एकंदरीत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गावात चैतन्यमय वातावरण असायचे.

  आज 15 ऑगस्ट रोजी,ग्रामपंचायत व शाळेतील झेंडावंदनाचा कार्यक्रम, ठरल्याप्रमाणे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. बँड पथकाच्या साथीने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बच्चे कंपनी, रांगेने व शिस्तबद्धरित्या प्रभात फेरीत सहभागी झाली होती.स्वच्छ व नीटनेटका गणवेश,हातात कागदी तिरंगा झेंडा,चेहऱ्यावर आनंद व घोषवाक्य म्हणत, विद्यार्थी गावातील मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करीत होते. रस्त्याच्या कडेला उभे असलेले गावातील नागरिक व पालक मोठ्या कौतुकाने विद्यार्थ्यांकडे बघत होते.त्यामुळे बँड पथकातील विद्यार्थ्यांना आणखीनच हुरूप चढत होता. बँड पथकाच्या पुढे इयत्ता चौथीचा आयुष मोठ्या दिमाखात,कापडी तिरंगा झेंडा मिरवत चालत होता. छातीजवळ झेंड्याचा दांडा धरून,आयुषची पाऊले बँडच्या तालावर एका लयीत पडत होती. एखाद्या सैन्याच्या आवेशात त्याची आगेकूच सुरू होती. त्याच्या नेतृत्वात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची प्रभातफेरी गांधी चौकाकडे निघाली होती.

   इयत्ता दुसरीच्या स्मितचे मात्र राहून- राहून,आयुषच्या  हातातील तिरंगी झेंड्याकडे लक्ष जात होते.वयाने लहान असल्याने त्याला आयुषप्रमाणे, प्रभातफेरीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नव्हती. स्मितचे बालमन मात्र हे मानायला मुळीच तयार नव्हते.कधी  तिरंगी झेंडा हाती पकडतो,असे स्मितला झाले होते. मजल-दरमजल करत,चिमुकली पाऊले गांधी चौकात पोहोचली. शाळेच्या शिक्षकांनी  मुलांना रांगेत उभे राहण्याच्या सूचना दिल्या.गावातील खाजगी शाळांची मुलं अजूनही गांधी चौकात गोळा व्हायची होती. नेहमीप्रमाणे जिल्हा परिषद शाळांची मुलेच सर्वात आधी गांधी चौकात पोहोचली होती. लहानग्या विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने संपूर्ण चौक गजबजून गेला होता.

  एवढ्यात स्मितचे खाली जमिनीवर पडलेल्या कागदी चिटोऱ्याकडे लक्ष गेले.तो जवळ जाऊन बघतो तर काय,त्याला ती एक नोट असल्याचे समजले. ओझरत्या नजरेने ती नोट त्याने न्याहाळली. त्यावरील अंक त्याने लगेच ओळखले. "अरे!ही तर शंभरची नोट आहे." क्षणभर स्मितला वाटलं की, ही शंभरची नोट आपल्या खिशात ठेवावी व ही नोट सापडल्याचे कुणालाही सांगू नये.दुसऱ्या दिवशी हे पैसे खाऊसाठी खर्च करावे.मस्त मजा करावी...मात्र दुसऱ्याच क्षणी,असे न करता, स्मितने शंभर रुपयाची नोट मला दिली."सर,ही घ्या,शंभर रुपयाची नोट.. मला चौकात सापडली." स्मितचं हे वागणं बघुन मला त्याचं प्रचंड कौतुक वाटलं.दुसरीत शिकणाऱ्या स्मित सारख्या मुलासाठी शंभर रुपयाची नोट म्हणजे फार मोठी रक्कम..या बालवयात बरीच मुलं पैसे सापडले की कुणाला सहसा सांगत नाहीत.. खाऊसाठी खर्च करतात.मात्र स्मितने लहान वयात दाखविलेली  प्रामाणिकता,अभिमानास्पद वाटली. मी स्मितला जवळ बोलावलं व त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली."स्मित,तुझा प्रामाणिकपणा पाहून मला तुझा फार अभिमान वाटतो.तुला काय हवं ते सांग?"मी  म्हणालो. "सर,मला आयुषप्रमाणे, तिरंगा झेंडा माझ्या हातात घ्यायचा आहे.बाकी मला काही नको."स्मित सहज बोलून गेला."अरे बस,एवढेच." मी स्मितला म्हणालो.मी लगेच आयुषला बोलावलं व  तिरंगा झेंडा स्मितच्या हाती द्यायला सांगितलं. स्मितने हातात तिरंगा झेंडा पकडताच सर्व मुलं त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागली.स्मितच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसत होती.नावाप्रमाणे स्मितच्या चेहऱ्यावर गोड स्मितहास्य उमटलं.त्याचा चेहरा आनंदाने उजळून निघाला.आपल्या प्रिय देशाचा राष्ट्रध्वज,हा बालवीर अभिमानाने मिरवू लागला...


..त्या शंभरच्या नोटेपेक्षा आयुष्यभर साथ देणारं प्रामाणिकपणाचं.. इमानदारीचं.. लाख मोलाचं ऐश्वर्य त्या दिवशी स्मितने कमावलं,हे नक्की..


✍️श्री.चंद्रभान अरुणजी शोभणे

(शिक्षण विस्तार अधिकारी,

पंचायत समिती,हिंगणा)


Dt.10/08/2025

सोमवार, ३१ मार्च, २०२५

गनिमीकावा

 

      गनिमीकावा




संकटे बहु येतील,

हरणे तुला ठाव नाही..

कोंडीत सापडाया,

गड्या तू कुणाचा साव नाही..!!

    भेटतील सरडे, 

    पदोपदी तुला रे..

    कुंपणापलिकडे,

    त्यांची धाव नाही..!!

पाठीत खंजीर खुपसाया,

टपलेत वैरी..

झेलू न शकशील तू,

असा घाव नाही..!!

      तू चाल तुझ्या ऐटीत,

      गाऊनिया गीत..

      तुला जिंकणारा,

      अद्याप डाव नाही..!!

रविवार, ३० मार्च, २०२५

सुखाची तोरणे


 🍁सुखाची तोरणे



स्वप्नांची व्हावी पूर्ती,

भरो सुखाची रांजणे..

नववर्षी यावे आकाशी,

सृजनाचे ते चांदणे..!!


अंधार मनीचा दूर व्हावा,

यावे माणुसकीने वागणे..

सौख्य नांदो मनोमनी

हेच आहे मागणे..!!

 

पेरले जरी कुणी,

वाटेवरती दाभणे..

जोडावी सदोदित माणसे,

व्हावी ही सुखाची साधने..!!

 

अपूर्ण हे पूर्ण व्हावे,

कुणा न पडो थांबणे..

गाठूनीया खिंडीत यावे,

असत्याला डांबणे..!!


 रंगात रंग मिसळून जावा,

उजळावी सर्वांची जीवने..

आनंदाची गुढी उंचावूनी,

दारी डोलावी सुखाची तोरणे..!!



मंगळवार, ३० जुलै, २०२४

नागपूर मेट्रो..निबंध स्पर्धा





नागपूर सारख्या शहराला मेट्रो सेवेची गरज काय?पासून सुरू झालेली चर्चा..2012 साली नागपूर शहराला मेट्रो रेल्वेची गरज आहे...इथे येऊन थांबली...2014 मध्ये,केंद्र शासनाने नागपूर मेट्रोला तात्विक मंजुरी दिली... मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 ऑगस्ट 2014 ला नागपूर मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी केली... व खऱ्या अर्थाने मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामाची सुरुवात 31 मे 2015 ला झाली...पुढे देशातील सर्वात वेगाने उभारला जाणारा मेट्रो प्रकल्प म्हणून नागपूर मेट्रोची नोंद झाली...30 सप्टेंबर 2017 ला नागपूर मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली.. ८ मार्च 2019 ला नागपूर मेट्रो नागपूरकरांच्या सेवेत दाखल झाली...व नागपूर मेट्रो भारतातील 13 वी कार्यरत असणारी मेट्रो सेवा बनली... एवढचं नाही तर आज नागपूर मेट्रो एकूण ऊर्जेपैकी 60% सौरऊर्जा वापरून भारतातील सर्वात हरीत रेल्वे म्हणून नावाजली गेलेली आहे... नागपूर मेट्रोचा हा सर्व प्रवास स्वप्नवत असा आहे. 

  मेट्रोचा हा प्रवास आठवण्याचे कारण म्हणजे,ज्यावेळी छत्रपती चौकातला जुना उड्डाणपूल मेट्रो प्रकल्पासाठी पाडला जाणार होता,त्यावेळी नागपूर मेट्रोद्वारे उड्डाणपुलाची आठवण म्हणून व मेट्रो प्रकल्पाला शुभेच्छा देण्यासाठी भल्या मोठ्या बॅनरवर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती.त्यावेळेस शुभेच्छा संदेश लिहिताना स्वप्नवत वाटणारी मेट्रो,एवढ्या लवकर प्रत्यक्षात उतरेल असं कधी वाटलं नव्हतं. मात्र नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर असो,मेट्रोस्टेशनची निर्मिती करताना विचारात घेतलेली स्थानिक संस्कृती व युनिक अशा थीमचा केलेला वापर असो,सतत नाविन्याचा ध्यास धरून, मेट्रोने नागपूर शहराला चार चाँद लावले आहेत,असं म्हणणं वावगं ठरणार नाही.नागपूर शहरातील उष्ण हवामानाचा विचार करता,नागपूर मेट्रो नागपूरकरांच्या आयुष्यात थंडगार वाऱ्याची झुळूक घेऊन आली आहे.मिहान,हिंगणा एमआयडीसी, पारडी,गांधीबाग,सीताबर्डी इत्यादी अत्यंत गर्दीच्या ठिकाणांना सुलभरीत्या जोडण्याचे शिवधनुष्य महामेट्रोने लीलया पेललं आहे. येत्या काळात मेट्रो रिच दोन टप्पा पूर्ण झाल्यास नागपूर सभोवतालचा जवळपास 20-25 किलोमीटर पर्यंतचा भाग मेट्रोशी जोडला जाणार आहे.अशाप्रकारे येणाऱ्या काळात नागपूर शहराच्या विकासाच्या प्रवासात,नागपूर मेट्रो मैलाचा दगड ठरल्यापासून राहणार नाही.

   'नागपूर' हे भारत देशाच्या हृदय स्थानी वसलेलं शहर आहे.त्यामुळे नागपूर शहराला विकासाच्या अमाप संधी आहेत.अतिशय वेगाने विकसित होणाऱ्या शहरांच्या यादीत नागपूर अग्रस्थानी आहे .लॉजिस्टिक हब, टायगर कॅपिटल ऑफ इंडिया,ऑरेंज सिटी.. यांसारख्या अनेक बिरुदांनी यापूर्वी नागपूरला अलंकृत केलेलं आहे.या सर्व कारणांनी नागपूरच्या लोकसंख्येचा वाढता वेग लक्षात घेता,नागपूर शहराला मेट्रोसिटी बनविण्यात मेट्रो नक्कीच हातभार लावत आहे. जसजशी शहराची लोकसंख्या वाढत जाईल, तसतशी वाहने प्रचंड संख्येने रस्त्यांवर उतरतील आणि यामुळे वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण वाढीस लागेल.याला रोखायचं असेल तर जास्तीत जास्त लोकांनी मेट्रोचा वापर करायला हवा,याचा आदर्श नागपूरकरांनी,1 जानेवारी 2023 ला,एकाच दिवशी तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त संख्येने मेट्रोने प्रवास करून घालून दिला.

  नागपूर मेट्रोने व्यक्तिशः मला प्रवासाचा नित्य,निखळ आनंद दिला आहे.एक नोकरदार म्हणून मला नियमितपणे लोकमान्य नगर ते कस्तुरचंद पार्क यादरम्यान प्रवास करावा लागतो. शिवाय बऱ्याचदा गांधीबाग,पारडी, मिहान,एम्स,खापरी येथे वेगवेगळ्या कारणांसाठी मेट्रोने प्रवास करण्याचे प्रसंग येतात. मात्र मेट्रो असल्याने प्रवासाचा शीण जाणवत नाही.मेट्रो स्टेशनवर मिळणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा, कर्मचाऱ्यांची वागणूक व सुरक्षित प्रवासाची हमी या सर्व गोष्टी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत.मेट्रोने केलेला प्रवास म्हणजे आपण पर्यावरण संवर्धनास हातभार लावत आहोत, याचंही मला मानसिक समाधान देऊन जातो. मेट्रोने गरीब-श्रीमंत,विविध जाती-धर्माची लोकं,एकत्रित प्रवास करतात व यामुळे सामाजिक ऐक्याला सुद्धा बळकटी मिळते. अतिशय माफक दरात मिळणारा आनंददायी प्रवास कधी संपूच नये,असं मला नेहमी वाटतं.दररोजचे प्रवास करणारे सहप्रवासी,कधी सुखदुःखाचे साथीदार बनलेत,हे माझं मलाच कळलं नाही. मेट्रोने प्रवास करून केलेल्या आर्थिक बचतीची, कुटुंबाच्या सुखात गुंतवणूक करून, मी मेट्रो प्रवासाचा आनंद द्विगुणीत केला आहे. 

  बोलण्यासाठी मेट्रो विषयी तक्रार करावी, असे काहीच नाही.कारण अलीकडे तर व्हाट्सॲपवर तिकीट काढण्याची सेवा सुध्दा मेट्रोने उपलब्ध करून दिलेली आहे. प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा कशी देता येईल, असाच प्रयत्न कायम मेट्रोने केलेला आहे.शेवटी एवढंच सांगावसं वाटतं की, मेट्रोचा दुसरा टप्पा लवकरात लवकर पूर्ण व्हावा,जेणेकरून नागपूर शहराचा मोठा भाग मेट्रोसेवेच्या कक्षेत येईल.शिवाय रिंग रेल्वेद्वारे नागपूरचा उर्वरीत भाग,कसा जोडला जाईल,यादृष्टीने मेट्रो प्रशासनाने प्रयत्न करावे.

    मेट्रोचा नियमित प्रवासी म्हणून मेट्रोने प्रवासाचा आंतरराष्ट्रीय दर्जा भविष्यातही असाच कायम ठेवावा,ही मेट्रो प्रशासनाला नम्र विनंती व महामेट्रोला पुढील वाटचालीस मनःस्वी शुभेच्छा.

    

रविवार, १६ जून, २०२४

'बाप'माणूस


 एक हात जन्मापासून कायम तुमच्या पाठीशी असतो..तुम्ही रडता-पडता,तेव्हा कदाचित तो तुमच्याजवळ नसतो.. पण जेव्हा जेव्हा तुम्ही अडता- नडता,तेव्हा मात्र त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो.. अंगाई गीते तो तुमच्यासाठी गात नाही.. पण तुमचे सर्व लाड पुरवल्याशिवाय मात्र तो राहत नाही.. सबंध आयुष्य खर्ची घालतो कुटुंबासाठी.. नसतोच त्याच्याकडे वेळ  स्वतःसाठी... व्यक्त होतांना तो कदाचित कमी पडतो.. जीवनाच्या संघर्षात मात्र पुरेपूर लढतो.. ज्यांच्या फक्त असल्याने घराला घरपण येतं .. ज्याचं वागणंही तुम्हाला शहाणपण देतं.. ज्याला वाटतं,तुम्ही त्याच्यापेक्षाही मोठं व्हावं,असं वाटणारी जगातली एकमेव व्यक्ती,तो असतो..

जीवनात हार मानायची नाही,हे तो कायम मनी ठसतो..रुसतो, भांडतो बऱ्याचदा... न पटताही मांडतो म्हणणे अनेकदा.. तरी तुमच्यासाठी बऱ्याचदा माघार घेतो...न मागताही आधार देतो.. डोळ्यांत स्वप्न ठेवून तो जगत असतो.. शाश्वती नसतांनाही आपलं सर्वस्व उधळून देणारा केवळ तोच असतो..  चार व्यावहारिक गोष्टी,काळानुरूप शिकतो.. तुम्हाला खाजगी स्पेस देणारा कुटुंबात तोच पहिला असतो.. तटस्थ व स्थितप्रज्ञ राहून आपल्या अंगावर उचलून धरतो घर सबंध आयुष्यभर...सुखाचे चार दिवस यावे,मिळावी विश्रांती क्षणभर..हा असा बापमाणूस प्रत्येकात दडला आहे..ज्याच्यावाचून कुटुंबाचा गाडा अडला आहे..

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३

दिवाळी गावाकडची

 🎇दिवाळी गावाकडची



दिवाळी सणाची चाहूल लागताच,गावात घरोघरी साफसफाई व सारवणाची लगबग सुरू होते.घरातील स्त्रिया या दिवसांत जणू 'स्वच्छता अभियान' नेटाने राबवितांना दिसतात.पुरुषमंडळी आपापल्या परीने यात हातभार लावत असतात.पूर्वी चुन्याने घराच्या भिंती सारवल्या जायच्या.त्यानंतर डीसटेंपर व हल्ली पेंटचा सुद्धा यासाठी वापर होतांना दिसतो.एकंदरीत, गाव दिवाळीत स्वच्छ, लखलखीत व नवंकोरं झालेलं असतं.


गावाकडची दिवाळी ही खऱ्या अर्थाने असते कष्टकऱ्यांची.. शेतकऱ्यांची.यात शहरी बडेजाव व दिखाऊपणा नसतो.तर तो असतो, निसर्गाच्या संपन्नतेचा सोहळा. रूढअर्थाने  दिवाळी पाच दिवसांची असली, तरी अलीकडच्या काळात, लक्ष्मीपूजन, गायगोंदण व भाऊबीज, हे तीन दिवस नागपूर जिल्ह्यात विशेषत्वाने साजरे केले जातात.


 हिवाळ्यातली थंडी या दिवसांत स्थिरावलेली असते.ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने बच्चे कंपनीच्या आनंदाला उधाण आलेलं असतं. बाहेरगावी शहरांमध्ये नोकरीनिमित्त कामाला असणारे चाकरमानी, गावाकडची वाट धरतात. विदर्भात प्रामुख्याने कपाशीचे पीक असल्याने शेतातल्या पांढऱ्या सोन्याकडे बघून शेतकरी समाधानी आणि तृप्त झालेला असतो. इकडे शेतात कापूस वेचणीचा हंगाम असल्याने दिवाळीपूर्वी शेतमजुरांच्या हातात अल्पसा का असेना पैसा खुळखुळत असतो. वर्षभर कफल्लक आयुष्य जगणाऱ्या कष्टकऱ्यांच्या घरी हा दिवाळी सण संपन्नतेची स्वर्णीम लकेर घेऊन येत असतो. 


घरापुढच्या ऐसपैस अंगणात, सडा-सारवण करून सकाळी रांगोळी घातली जाते.वर्षभर एकाच रंगाची रांगोळी घालणाऱ्या स्त्रिया, दिवाळीच्या दिवसांत मात्र आवर्जून रांगोळीत विविध रंग भरतांना दिसतात. सायंकाळी तर अंगणात रांगोळी घालण्याची जणू स्पर्धाच लागलेली दिसते.कुणाची रांगोळी मोठी,कुणाची रांगोळी अधिक सुंदर,याची चर्चा गावातील तमाम स्त्रिवर्गात असते.


बहुतेक घरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, सर्वार्थाने दिवाळी सण साजरा केला जातो.गावात या दिवसाला "मोठी दिवाळी"असंही म्हटलं जातं.घरात असलेल्या पैशा-अडक्याची व दाग -दागिन्यांची पूजा निष्ठेने व श्रद्धेने केली जाते.लहान थोर नवीन कपडे घालून मिरवतात.घरात गोडधोड केलं जातं.यात प्रामुख्याने, कोहळ्याचे बोंडं,अनारसे,रव्याचे वा बुंदीचे लाडू, शंकरपाळे इत्यादींचा समावेश होतो. शिवाय चकल्या,शेव,चिवडा व तत्सम फराळी पदार्थांची रेलचेलही असते. जिभेचे सर्व लाड या दिवसांत पुरविले जाते. दारात व अंगणात दिव्यांची आरास मांडली जाते. संपूर्ण गाव दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघते. आकाशातले तारेच जणू अंगणी विराजमान झाल्यासारखे भासतात.गावाकडच्या या दिव्यांच्या प्रकाशाची सर, शहरातल्या झगमगाटाला नाही,हे मात्र खरं.लहान मुलं,टिकल्या,रीळ, फुलझड्या तर मोठी मंडळी,लक्ष्मीबॉम्ब, सुतळीबॉम्ब,झाड,चकरी इत्यादी च्या साह्याने फटाके फोडून दिवाळीचा आनंद साजरा करतात. 


गायगोंदणाच्या दिवशी शेतकरी वर्ग घरातील दुभत्या जनावरांना गेरूने रंगवितात.पूजा करून त्यांची वाजत-गाजत  मिरवणूक काढली जाते. भाऊबीज हा दिवस,बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला दिवस.या दिवसाला गावात विशेष महत्त्व असते.लग्न झालेल्या गावातील मुली,माहेरच्या ओढीने सहकुटुंब गावात येतात.एकमेकांची ख्यालीखुशाली विचारली जाते. सुखदुःखाची देवाणघेवाण होते.बहीण भावाला ओवाळते.घरी लहान मुलांचा जणू कल्लाच असतो.आनंदाला उधाण आलेलं असतं.अनेक गावात मंडई उत्सव आयोजित केला जातो. करमणुकीचे कार्यक्रम, नात्यागोत्यातल्या, जुन्या जाणत्या मंडळींची भेट, घरोघरी पाहुणचार..असा भरगच्च आनंदोत्सव घेवून दिवाळी गावात येते."दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा"ही म्हण सार्थ करत,गावाकडची दिवाळी सर्व गावकऱ्यांच्या मनात आनंदाची पेरणी करून जाते,यात तिळमात्र शंका नाही.


     


Dt.10/11/2023

रविवार, १० सप्टेंबर, २०२३

घर

 🏠घर




उन्हाळ्याचे दिवस होते.मे महिन्यातली दुपारची वेळ होती. मी माझ्या घराच्या मागच्या दारात उभा होतो.माझी नजर घराजवळील रिकाम्या प्लॉटकडे गेली. तिथे काही माणसं हाती टेप, दोरी व चूना,घेऊन मार्किंग करताना दिसली.ती माणसं प्लॉटची मोजणी करत होती. तेवढ्यात एक बिल्डर कारमधून खाली उतरला.त्याने प्लॉटवर नजर फिरवली.माणसांशी थोडेफार बोलून तो त्याच्या कारमधून निघून गेला.त्यानंतर ती माणसं सुद्धा  त्यांचं काम आटोपून निघून गेली. 


यादरम्यान दुपार टळून गेली होती. सायंकाळी पाच-सहाच्या सुमारास मोजणी झालेल्या प्लॉट पुढील रिकाम्या जागेत, एका घराच्या भिंतीच्या शेजारी, बांबू, तट्ट्या व लाकडी बल्ल्या, घेऊन एक टेम्पो आला. थोड्याच वेळात तिथे एक बिऱ्हाड आलं. नवरा बायको व मुलगी असलेलं छोटसं कुटुंब. आल्या- आल्या, कुटुंबातल्या पुरुषाने, त्या रिकाम्या जागेवर खड्डे खोदायला सुरुवात केली. बांबू, बल्ल्या व तट्ट्यांच्या मदतीने, त्याने तासाभरात तिथे एक झोपडी तयार केली. तिकडे त्याच्या बायकोने, दिडेक वर्षाच्या मुलीला, आडोशाला निजवून, आपल्या गाठोड्यातून रात्रीच्या जेवणासाठी,आवश्यक जिन्नस बाहेर काढले.दगडांची चूल मांडली.काड्या गोळा केल्या.चुलीवर पातेले ठेवून ती पोटाची आग शमविण्याच्या कामाला लागली. काम करता-करता अंधार दाटून आला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसभर रखरखतं ऊन होतं.मात्र रात्री काहीसा थंड वारा वाहू लागला.


बिल्डरने आधीच भिंतीला इलेक्ट्रिक मीटर व पाण्यासाठी बोरवेलच्या मशीनचे कनेक्शन लावलेले होते.त्यामुळे झोपडीत लाईटची व्यवस्था झालेली होती. दिवसभराच्या प्रवासाने व कष्टाने तिनही जीव, निवांतपणे झोपडीत झोपी गेले. मी कुतूहलाने त्यांच्या हालचाली टिपत होतो.दुसऱ्या दिवशी त्यांनी काही तट्ट्या व कापडाच्या मदतीने आंघोळीसाठी एक आडोसा तयार केला.त्यांची झोपडी भरवस्तीत असल्याने व आजूबाजूला पक्की घरे असल्याने,त्या तरुण जोडप्याला लहानशा लेकरासोबत साप-विंचवाची पर्वा न करता, टीनाच्या छताखाली,भर उन्हाळ्यात राहावं लागणार होतं. त्यांच्यासाठी कदाचित ते नवीन नसावं.म्हणून ते तिघेही सहजपणे वावरत होते. मला मात्र राहून राहून त्यांचं अप्रूप वाटायचं.


दुसऱ्या दिवशी,सकाळी दहाच्या सुमारास एक कार झोपडीजवळ आली.गाडीतून बिल्डर, "राम.. ए राम.. " अशी हाक मारु लागला. झोपडीतल्या पुरुषाचे नाव राम आहे,हे माझ्या लगेच लक्षात आलं. राम बाहेर आला.बिल्डरने त्याला कामाविषयी काही सांगितलं.त्याने मानेनेच होकार दिला. बिल्डर निघून गेला. मोजणी झालेल्या प्लॉटवर जेसीबीने खड्डे करायला सुरुवात झाली. आता मजुरांची गजबज वाढू लागली. राम त्यांच्यासोबत काम करू लागला. 



त्याच्या बायकोने दिवसागणिक झोपडी नीटनेटकी केली.ती तिच्या मुलीला दिवसभर सांभाळायची. गरज पडल्यास, रामला मदत करायची. अशाप्रकारे त्यांचा उघड्यावरचा संसार सुरू झाला. हाहा म्हणता उन्हाळा पार पडला. इमारतीचे फाउंडेशन, पहिला स्लॅब, दुसरा स्लॅब पूर्ण झाला.चार मजली इमारत होणार असल्याने ही इमारत पूर्ण होण्यास अवकाश होता.

आता पावसाळा सुरु झाला. पाऊस धो-धो कोसळत होता. झोपडी शेजारी पाणी साचू लागलं. रिकाम्या प्लॉटवर गवत वाढू लागलं.रात्री बेडकांचा आवाज ऐकू येऊ लागला. अशा परिस्थितीत ते तीन जीव,साप -विंचवाची पर्वा न करता, खरबडीत जमिनीवर झोपून रात्र काढू लागले. काही दिवसांनी रामने एक लहानसा कुलर खरेदी केला. एक लोखंडी पलंग आणला. पावसाळ्यानंतर हिवाळा सुरू झाला.कडाक्याची थंडी पडू लागली.झोपडीमध्ये टिनाच्या छिद्रातून, तट्ट्यांमधून,बोचरे वारे आत येऊ लागले.अशाही परिस्थितीत, दिवसभर अंग- मेहनतीचे काम करून,चटणी -भाकर खाऊन, त्यांनी रात्रीच्या थंडीचा सामना केला. एव्हाना इमारतीचे चार स्लॅबच काम पूर्ण झाले.भिंती उभ्या झाल्या. राम सकाळी नऊ वाजतापासून इमारतीच्या भिंतीवर पाणी मारणे, बिल्डरने सांगितलेली, छोटी-मोठी कामे करणे इत्यादी कामे करायचा.


जणू ही इमारत नाही तर त्याचं स्वतःचं घर आहे, याप्रमाणे तो आपुलकीने काम करायचा.अधेमधे तो एकटक इमारतीकडे पाहत बसायचा. आता हिवाळा संपायला आला. इमारतीचे काम जवळपास पूर्ण होत आलं.इलेक्ट्रिक फिटिंग, प्लंबिंग, खिडक्या, दारं बसवून  झाली. गावाकडे काही काम असल्याने त्याने बायकोला व मुलीला गावी पाठवलं.आता तो इकडे एकटाच राहू लागला.त्याला एकटेपणा जाणवू लागला.


 बिल्डरने आता त्याला इमारतीच्या पार्किंगच्या जागेत राहायला सांगितलं.सबंध वर्षभर सांभाळलेल्या झोपडीवजा घराला मोडताना त्याला काहीच वाटलं नाही.अगदी सहजपणे इमारतीच्या पार्किंगच्या जागेत आडोसा तयार करून तो राहू लागला. हळूहळू इमारतीच्या पेंटिंगचं काम पूर्ण होत आलं.बिल्डर दररोज कामाची पाहणी करायला यायचा. रामही त्याच्यासोबत इमारतीला न्याहाळायचा.तो स्वतः मालक असल्याप्रमाणे इमारतीच्या बांधकामासंदर्भात बारीकसारीक बाबींकडे लक्ष द्यायचा. कालांतराने इमारतीचे काम पूर्ण झाले. त्यातले,आठही फ्लॅट विकले गेले. प्रत्येक फ्लॅटमध्ये एक-एक कुटुंब राहायला आलं. 

आता पार्किंग एरियात, चारचाकी, दुचाकी गाड्या उभ्या राहू लागल्या.पार्किंगची जागा अपुरी पडू लागली.आज पुन्हा एकदा बिल्डर आला.तो रामला म्हणाला," राम,लक्ष्मीनगरमे अपना नया काम शुरू हो रहा है. वहाके प्लॉट के पास, कल अपनी झोपडी बना लेना."




.. रात्रीच्या अंधारात लायटिंगने न्हाऊन निघालेल्या नव्याकोऱ्या इमारतीकडे डोळे भरून पाहत," हा! ठीक है." असं म्हणत, राम त्या रात्री इमारतीच्या पार्किंगच्या जागेत, नवीन झोपडी उभारण्याचा,विचार करता-करता, कधी झोपी गेला,त्याचं त्यालाच कळलं नाही.


      

शनिवार, १४ जानेवारी, २०२३

बादल व सुरज

 

Courtesy-Unsplash~Auron Burden

मी बँकेत कामानिमित्त गेलो असता, मला सतरा-अठरा वर्षाचा एक मुलगा भेटला .तो माझ्याजवळ आला व  मला म्हणाला, "सर, ओळखलंत का ?"मी त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं व आठवू लागलो..काही क्षणातच मला त्याची ओळख पटली आणि आठवलं.'अरे,हा तर बादल आहे.'मी त्याला म्हटलं,"काय बादल ,इकडे कसा काय?  तो म्हणाला,"सर,माझं बँकेत थोडं काम आहे, म्हणून मी इकडे आलेलो आहे.""बरं -बरं "म्हणत मी त्याच्याशी संवाद साधला." तू आता काय करतोस? ..शिक्षण कोणत्या वर्गापर्यंत घेतलंस ???इत्यादी.. बाबत मी त्याची चौकशी केली.त्यावर बादल म्हणाला," सर दहावीत माझे दोन विषय राहिले, त्यामुळे मी पुढचं शिक्षण सोडून दिलं व आता एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहे.यावर मी म्हटलं," काय बादल,बाकी सगळं ठीक आहे ना?  बादलने स्मित हास्य करत,कामाबाबत समाधानी असल्याचं सांगितलं. त्यानंतर बादल व मी, दोघेही आपापलं बँकेतलं काम आटोपून निघून गेलो. 


घरी आल्यानंतर मात्र माझ्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं व मला आठवला, सहाव्या वर्गात शिकणारा बादल... त्यावर्षी प्रथमच माझ्याकडे बादलचा वर्ग शिकविण्यासाठी आलेला होता.. त्याच्या वर्गात एकूण आठ मुले होती व त्या आठ मुलांपैकी एक.. बादल होता...याच वर्गातला बादलचा जोडीदार असणारा दुसरा मुलगा म्हणजे.. सुरज..जोडीदार अशा अर्थाने की, दोघांचीही अभ्यासाची पातळी सारखीच.. अगदी बाराखडीही वाचता न येण्याइतपत.. सहावीतले विद्यार्थी म्हटल्यावर त्यांना साधी बाराखडी वाचता येत नाही.. ते बघून माझ्या मनात विचार आला की, ही मुलं पुढे, व्यावहारिक जगात कशी काय टिकाव धरतील?ती स्वतःच्या पायावर उभी होतील की नाही?त्याचं भवितव्य कसं असेल?...काळाच्या पोटात काय दडलंय,याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. साधी मराठी बाराखडी वाचता येत  नसूनही, बादल व सुरज शाळेत कधीही नियमित यायचे नाहीत.. त्यामागे त्यांची कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमी  कारणीभूत होती.  तशी दोघांची परिस्थिती हलाखीची असल्याने बादल व सूरज दोघेही, छोट्या-मोठ्या शेतीच्या कामाला जात असत..

 नावाप्रमाणेच बादल हा वर्णाने काळासावळा  तर सुरज निमगोरा होता. त्यांच्याकडे बघून मला नेहमी वाटायचं की त्यांच्या रंगांनी दोघांच्याही नावाला सार्थ केलेलं आहे.. बऱ्याचदा असाही योगायोग असायचा की,जेव्हा दिवसा ढगाळ वातावरण असायचं(ज्याला आमच्या नागपुरी भाषेत"बादल" म्हणतात) नेमकं, त्याच दिवशी बादल शाळेत यायचा. याउलट ज्या दिवशी स्वच्छ प्रकाश(ऊन) असायचं,त्या दिवशी सुरज शाळेत हजर असायचा तर बादल शाळेला दांडी मारायचा. ..मी नेहमी या विषयावर त्यांची गंमत करायचो..  एकंदरीत दोघेही अभ्यासात अगदी प्राथमिक स्तरावर होते आणि एवढं असूनही दोघे शाळेत नेहमी गैरहजर असायचे.

ज्या दिवशी दोघेही किंवा दोघांपैकी एक जरी शाळेत उपस्थित असला, की मी त्यांना बाराखडी शिकवायचो,त्यांच्याशी गप्पा करायचो. हळूहळू बादल व सुरज या दोघांना कुठेतरी वाटायला लागलं की, वाचता-लिहिता येणं, फार गरजेचं आहे. त्यामुळे बादल व सूरज शाळेत आल्यानंतर बाराखडी गिरवू लागले. पुढे टप्प्याटप्प्याने त्यांना "आ"ची मात्रा.".इ"ची मात्रा.. असं करत-करत, पुढचं वाचन मी त्यांना शिकूवू लागलो. कदाचित याआधी त्यांना एवढं आपुलकीने जवळ घेऊन कोणी बाराखडी शिकवली नसेल किंवा त्यांनी स्वतः त्याकडे फारसं  लक्ष दिलं नसेल. सहावीत आल्यानंतर मात्र त्यांनी बाराखडी व वाचन शिकण्याचा थोडाफार प्रयत्न सुरू केला. सहावी व सातवी या दोन वर्षांमध्ये बादल व सूरज दोघेही कामापुरते काअसेना,वाचन करू लागले. सातवीनंतर जेव्हा दोघांची जिल्हा परिषदेच्या शाळेतून पुढे, खाजगी शाळेमध्ये आठव्या वर्गात जाण्याची वेळ आली, तेव्हा मी बादल व सुरज दोघांना जवळ बोलावून विचारले," आता तुम्हा दोघांना लिहित- वाचता येते ना,तर मग तुम्ही कोणत्या वर्गापर्यंत शिकणार? यावर बादल म्हणाला," बघू सर.." मी म्हटलं," बादल, बघू नाही... तर तुला कोणत्याही परिस्थितीत बारावीपर्यंत शिकायचं आहे आणि असं तू मला आज प्रॉमिस करायचं आहे." त्या बालवयात कदाचित त्याच्या बुद्धीला  माझं म्हणणं पटल असेल.. म्हणून बादलने सातवीनंतर पुढे बारावीपर्यंत शिकण्याचं मला प्रॉमिस केलं..पुढे बादल व सुरजने आठवीसाठी एका खाजगी शाळेत प्रवेश घेतला.

मध्यंतरी बादलशी संपर्क झाला नाही.. मग अचानक इयत्ता आठवीत असताना.. शाळेतून घरी येतांना मला, बादल दिसला.. मी त्याला आवर्जून हाक मारली. बादलला विचारलं," काय बादल, काय म्हणते नवी शाळा?.. अभ्यास करतो की नाही? यावर बादलचं उत्तर विचार करायला भाग पडणारं होतं. तो म्हणाला ,"सर, त्या शाळेत मला कुणीच विचारत नाही. शिक्षकही मला जवळ बोलवत नाहीत. तुम्ही  मला जवळ बोलवून एक- एक गोष्ट शिकवायचे, तिथे कोणी माझी साधी दखलही घेत नाही." बादलचे हे उत्तर ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला... वाटलं की,जर या मुलांना थोडं आपुलकीनं वागवलं, तर कदाचित ही मुलं फार नाही.. परंतु स्वतःच्या पायावर उभी  होण्याइतपत शिक्षण.. नक्कीच घेवू शकतील.. त्यानंतर मी बादलला समजावलं," अरे बादल, त्या शाळेत जास्त मुलं असल्यामुळे कदाचित तिथले शिक्षक तुझ्याकडे वैयक्तिक लक्ष देत नसतील." त्यावर बादलने नेहमीप्रमाणे स्मितहास्य केलं व  घराच्या दिशेने निघून गेला. 

 त्यानंतर बऱ्याच दिवसांनी बादलशी बँकेत झालेली ही माझी भेट..  सुरज बद्दल चौकशी केली असता तो नववी नंतर पुढे शिकला नाही,असं बादलने मला सांगितलं. बादल आजच्या स्पर्धेच्या व व्यवहारी जगात छोटं-मोठं का असेना काम करून स्वतःचं आयुष्य इमाने-इतबारे जगतो आहे ..फार उच्च शिक्षण जरी त्याने घेतलं नसलं तरी तो स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा आहे...तशाही त्याच्या स्वतःच्या आयुष्याकडून फार अपेक्षा नव्हत्याच... कदाचित त्यामागे त्याची आर्थिक-सामाजिक परिस्थिती असेल किंवा त्याला कुणी तसं,स्वप्न बघायला शिकवलं नसेल..काही का असेना.. परंतु बादल प्रामाणिकपणे काम करून, समाजामध्ये चांगला नागरिक म्हणून जगतो आहे,याचं मला समाधान वाटलं.  


मागे वळून बघितल्यावर वाटतं की, असे कित्येक बादल व सूरज आपल्या समाजात आहेत की ज्यांचे मूलभूत शिक्षण,अनेक कारणांनी होत नाही... याचा अर्थ त्यांची शिकायची इच्छा नसते किंवा ते जीवनात काहीच करू शकत नाहीत असे नाही... आपण थोडंजरी त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघितलं तर ही मुलं समाजासाठी त्यांच्या परीने योगदान देऊ शकतील... एकंदरीत शिक्षक व समाजाचा एक संवेदनशील घटक म्हणून अशा बादल आणि सूरज,यांना  प्रोत्साहित करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे,असं मला वाटतं.. 

रविवार, २५ डिसेंबर, २०२२

नवरंग



Courtesy:Unsplash.. Mohammed Shamma

दरवर्षी येणाऱ्या नववर्षाकडे बघून मनात विचारांची भाऊगर्दी होते...मागे वळून बघताना आठवतात ..गेल्या वर्षी केलेले नानाविध संकल्प.. मात्र काळाच्या ओघात ते धुसर होत जातात ..व पुन्हा कधी नवीन संकल्प करण्याची वेळ येते..ते आपलं आपल्यालाच कळत नाही..जुन्या व नव्या संकल्पादरम्यान होतात..आपल्या हातून कळत-नकळत असंख्य चुका..

 यश-अपयश ..उत्साह- निराशा ..विश्वास-विश्वासघात..प्रेम- द्वेष ..आपले-परके..डाव-प्रतिडाव..अशा दोन ध्रुवांदरम्यान डोलत असतो..आपण.. दोलकासारखे.. सबंध वर्षभर.. कधी या तीरावर तर कधी त्या ..

परंतु एकंदरीत गोळाबेरीज केली असता, यापेक्षा आणखी चांगलं जगता आलं असतं..अशी हुरहुर मनात दाटून येते..हे मात्र नक्की ..


प्रत्येक वर्ष आपल्याला अनुभवाची नवी शिदोरी देऊन जातं..परंतु आपली भुक कायमच वाढत असल्याने.. तृप्तीची ढेकर आपण देऊ शकत नाही. ..


कुणी किती पैसा कमावला यापेक्षा त्याने किती माणसं कमावली, हे महत्वाचे नाही काय ?माणसे मोठ्या हुद्द्यावर गेली की त्यांची जमिनीशी नाळ तुटताना दिसते.. कधीही न संपणाऱ्या शर्यतीत ते धावत असतात अधाशासारखे.. ऊर फाटेस्तोवर.. क्षणाचीही उसंत घेण्याची त्यांना गरज वाटत नाही ..दुसरीकडे उघड्या आकाशाखाली बिनधास्तपणे जगणारी माणसं बघितली की वाटतं ..या दोघांपैकी कोण जास्त सुखी? 

या दोन टोकांच्या आयुष्यांव्यतिरिक्त ,जीवन जगण्याचा मध्यम मार्ग शोधणारीही काही मंडळी असतात.. चौकटीत इमानेइतबारे आयुष्य जगताना, समाजासाठी चार-दोन गोष्टी करता आल्या तर त्यांची त्याला ना नसते ..

रंगीबेरंगी या दुनियेत अशी अनेक रंगी आयुष्य जगणारी माणसं असणारच ..त्यात आपल्याला कसे आयुष्य जगायला आवडेल हा ज्याचा - त्याचा प्रश्न आहे..

 परंतु येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा व सुखाचा जावो,यापेक्षा जीवनाचा वेगळा अर्थ तो काय? म्हणून वाटतं,येणारे नववर्ष प्रत्येकासाठी,असावे सृजनाचे..नावीन्याचे.. आंतरिक समाधानाचे ....!!

Best of glocal marathi

दिवाळी मिलन

 💥दिवाळी मिलन (Just for Fun) लोकनेते श्री.आ.बा. राजकारणे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी यावर्षी दिवाळी निमित्त एकत्र भेटण्याचं ठरवलं.दह...