मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

Cycology




 'सायकल ' शब्द उच्चारताच ,नकळत आपण भूतकाळात जातो.आठवतात आपल्याला,सायकलच्या सीटमागे असणारी सिनेमांची नावं..तिचा तो साजशृंगार..व सायकल मालकाची ती ऐट... ..सारंच कसं आता घडल्यासारखं...गावाकडच्या जुन्या बनावटीच्या जेन्ट्स व लेडीज सायकलला आम्ही 'बाजीराव -मस्तानी'म्हणायचो,हेही आठवतं..व आठवतात, 'सायकल चालवणे'शिकतांना घडलेले अपघात...अपघातही एक नाही तर अनेक...त्यांच्या तऱ्हाही निराळ्या...शिवाय आई-वडिलांच्या हातचा खाल्लेला मार वेगळाच...असे प्रसंग तुम्हा-आम्हा,सर्वांच्या जीवनात कमी-अधिक प्रमाणात घडलेले आहेत, हे मात्र नक्की.सायकल शिकताना अपघात न घडलेला,स्वतःचे हात-पाय न मोडून घेणारा,नाहीच काही तर,सायकलवरनं पडून 'हातापायाला खरचटलं' असे न म्हणणारा,जगात शोधुनही सापडायचा नाही. मला वाटतं, आपण जर एवढ्यांदा सायकलवरनं पडलो तर,सामान्यजनांसाठीसायकलरूपी स्वस्त, पर्यावरणपूरक, प्रवासाचं साधन निर्माण करणारा अवलिया, 'मॅकमिलन' सायकल तयार करताना, कितीदा खाली पडला असणार??याची गणतीच नाही.


सायकलच्या इतिहासाचा धांडोळा घेतल्यास,आपल्याला समजतं,की,दोन चाकं मागे-पुढे जोडून सहज चालू शकतात,ही कल्पनाच मुळी किती अद्भुत व अचाट होती. त्यामुळे सायकलचा शोध हा विमानाच्या शोधापेक्षा कमी नाही,असे मला नेहमीच वाटत आले आहे. 



एवढं सगळं, सायकलपुराण सांगायचं कारण म्हणजे,कोरोना विषाणूच्या महामारीमुळे ,पुन्हा एकदा गरीब, बिचाऱ्या, सायकलकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.लॉकडाउन ते अनलॉक, या कालखंडात सायकलचा खप पाचपट वाढल्याचे,अनेक जाणकार व्यक्तींच्या तोंडून आम्ही आमच्या, कानांनी ऐकलं आहे.एक वेळ नव्या-कोर्‍या 'पल्सर' गाडीकडे कुणी ढुंकूनही बघणार नाही. मात्र ,एखादी 'रेसिंग  सायकल' रस्त्याने कुणी चालवताना दिसल्यास, सामान्यांच्या नजरा,त्या सायकलवर खिळल्याशिवाय राहत नाही.असा अनुभव अनेकांना आला असेल,यात मला तिळमात्र शंका नाही.         
फिटनेस मिळवण्याचं,स्वस्त व आरोग्यदायी,साधन म्हणून संपूर्ण जग आज सायकलकडे बघत आहे.युरोपीय देश,अमेरिका ,चीन यांनी केव्हाच सायकलला स्वीकारले आहे. आम्ही मात्र गरीब देश असूनही, बुलेटने 'धुरळा'उडवीत आहोत. काही दिवसांपूर्वी नागपूरच्या महापौरांनी नागपूरमध्ये 'डेडिकेटेड सायकल ट्रॅक' तयार करणार असल्याची व नागपूर शहराला 'सायकल कॅपिटल ऑफ इंडिया 'करण्याची घोषणा केली. पुढे या घोषणेचं काय होईल, ते काळच सांगेल.तूर्तास कुणाला येवो न येवो ,सायकलला मात्र "अच्छे दिन"आले आहेत,हे नक्की.


सहज वाटलं, आपणनही या 'सायकल अभियानात'आपला खारीचा वाटा उचलावा,  म्हणून आम्ही,मित्रांनी सायकलने एक लांब रपेट मारण्याचे ठरविले.मग काय,आदल्यादिवशी नियोजन केले व दुसऱ्या दिवशी सकाळी मोहगाव( झिल्पी) डॅमकडे जाण्याचे ठरले. दुसऱ्या दिवशी सकाळी जवळपास साडेसहा वाजता सगळ्यांनी आपापल्या सायकली काढल्या व घरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहगाव (झिल्पी )येथे जाण्यासाठी बायपास रोडवर  भेटलो.

एका टपरीवर नागपूरच्या प्रसिध्द 'तर्री पोह्याचा'आस्वाद घेतला व त्यानंतर कडक,वाफाळलेला चहा घेऊन मोहगावच्या रस्त्याने मार्गस्थ झालो.                                                                     


हिंगणा-मोहगाव रस्त्याच्या दुतर्फा, बागायती शेती,संत्र्यांच्या बागा व अनेक फार्म हाऊसेस असल्याने,तसेच रस्ता नव्याने तयार झालेला असल्याने ,सायकलिंग करण्यात वेगळीच मौज वाटत होती. मधे थांबत, बसत, गप्पागोष्टी करत, आम्ही पुढे जात होतो.कारण आमची ना कुणाशी स्पर्धा होती,ना आम्ही 'व्यावसायिक सायकलपटू' होतो.आम्ही होतो,हौशी सायकलपटू.सायकलीही बहुतेकांकडे साध्याच होत्या.पण उत्साह मात्र 'खास' होता.                               

लोकं पन्नास -शंभर किलोमीटर सायकलिंग करतात,आपण नाही तेवढे,पण दहा किलोमीटर तर जाऊच शकतो,असा विश्वास सर्वांच्या ठायी होता.पंधरा वर्षे या एकाच रस्त्याने नोकरीनिमित्त अपडाऊन केले असल्याने, रस्ता तसा नेहमीचा 'परिचित' होता. परंतु,सायकलने या रस्त्याने होणारा आमचा हा   'पहिलाच' प्रवास असल्याने,रस्ता जणू नव्याने आपली ओळख करून देत  असल्याची अनुभूती आम्हा सर्वांना येत होती.


   




 

 मजल- दरमजल करत मोहगावला पोहचलो.गाव ओलांडल्यावर आम्हाला, झिल्पी डॅम व मोहगावच्या दरम्यान ,तेथील स्थानिक युवकाने "आसरा"नावाचं एक नवंकोरं फॅमिली रेस्टॉरंट सुरु केलेलं दिसलं.सकाळची वेळ असल्याने ते बंद होतं, मात्र त्या रेस्टॉरंटचा थाट काही औरच होता.हिरवाईने नटलेल्या टेकडीच्या पायथ्याशी, अतिशय सुसज्ज, नीटनेटके व देखणे असे हे रेस्टॉरंट, पर्यटकांना नक्कीच खुणावत असणार,याची मनोमन खात्री पटली. शिवाय, इथे अस्सल गावरान जेवण व नाश्ता मिळतो,असे विचारपूस केल्यावर कळले.पुढे कधीतरी येथील जेवणाचा आस्वाद घेऊ,असे मनाशी ठरवून आम्ही झिल्पी डॅमच्या वाटेने जाऊ लागलो.                           


 दरम्यान, रस्त्याच्या कडेला विदर्भातील पाहिले 'डेट्स फार्म'अर्थात 'खजुराची शेती'दिसली.ही शेती 'थंगावेलू'आडनाव असणाऱ्या 'साऊथ इंडियन'माणसाची होती,हे कळल्यावर त्याचे विशेष कौतुक वाटले.कारण, आम्ही 'मराठी माणसं' गावची वेस ओलांडताना हजारदा विचार करतो. इथे मात्र,एक दक्षिणेतला माणूस नागपूर सारख्या शहरात,त्यातल्या त्यात एका खेड्यात येऊन,विदर्भात किंबहुना महाराष्ट्रात खजुराच्या शेतीचा पहिला प्रयोग काय करतो,तसेच 'ऍग्रो टुरिझम'सारख्या संकल्पना,शेतकरी आत्महत्या होणाऱ्या विदर्भात यशस्वीपणे राबवतो, हे सगळंच अचंबित करणारं आहे.             

 पुढे,काहीसा चढाई असलेला मार्ग मागे सारून आम्ही आमच्या "डेस्टिनेशन"ला पोहोचलो. नेहमीप्रमाणे इथेही फोटोग्राफी करण्यास आम्ही अजिबात कसूर केली नाही.                                       

डॅमच्या बाजूने, "मैत्रबन"या वृद्धांच्या निवासी ग्रामकडे जाणाऱ्या रस्त्याने आम्ही डॅमचं बॅकवॉटर बघत पुढे जात होतो.या परिसरात आम्हाला नागपूरच्या मोठया राजकीय पुढाऱ्यांचे फार्म हाऊस असल्याचे कळले.तसेच या परिसरात लवकरच सिद्धिविनायक मंदिराचं निर्माण कार्य सुरू होणार असल्याचे समजले. इथे आम्ही मंदिराच्या कारागिरांशी संवाद साधला.

       



आता आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.रस्त्याला उतार असल्याने हा प्रवास जलदगतीने होत होता.प्रवासाचा काहीसा क्षीण जाणवत होता,पण उत्साह अजूनही कायम होता.पुढच्या टूरचे नियोजन करीत,कधी आम्ही हिंगणा बायपासजवळ पोहोचलो, आमचे आम्हालाच कळले नाही.परत इथे,गरमागरम समोस्यावर आम्ही ताव मारला, चहा घेऊन,सर्वांनी आपापल्या घरची वाट धरली.

     


 या प्रवासात,'आनंद' हा पैशाने विकत घेता येत नाही,हे प्रकर्षाने जाणवलं.जीवनातल्या साध्या, सोप्या वाटणाऱ्या गोष्टींत लाखमोलाचा आनंद व आभाळभर सुख दडलेलं असतं,आपण मात्र ते घेण्यात कमी पडतो, हेही अनुभवलं. मोठमोठ्या कार ड्राईव्ह करून, जे थ्रील तुम्हा-आम्हाला येणार नाही,ते थ्रील सायकलिंग तुम्हाला देते,असे म्हणणे अतिशयोक्ती नाही,याची प्रचिती स्वतः अनुभवल्यावरच आली.म्हणून,कोरोना महामारीच्या निमित्ताने,पुन्हा एकदा जीवनाकडे डोळसपणे पाहूया व जीवनाच्या छोट्या छोट्या क्षणांना भरभरून जगुया,धन्यवाद.
To watch our more cycle stories,do visit,my youtube channel,Glocal Marathi,at link below



१३ टिप्पण्या:

  1. खूप सूंदर... खरच तुमचे लेख वाचून खूप छान अनुभूति मिळते. Keep it up👍

    उत्तर द्याहटवा
  2. तुमच्या शाब्दिक वर्णनाने आमच्या नेत्राची सायलिंग झाली. खूप सुंदर प्रवासवर्णन..👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. Nice enjoyment of real life with CYCLING.
    After reading feels like i also visited the place.

    उत्तर द्याहटवा
  4. मित्रा ,तू लिहिलेला सायकल महिमा वाचून कधी एकदा नवीन सायकल घेतो, असे झाले आणि खरंच ती प्रदूषणमुक्त सायकल सैर पुन्हा पुन्हा करावी असे मनापासून वाटते आहे. तुझ्या लेखणीला सामान्य माणसाच्या मनाची कोवळी व तितकीच आपलेपणाची धार आहे. नेहमी असेच छान लिहत राहा आणि मनसोक्त व्यक्त होत राहा. All the best and keep it up.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुझ्यासारख्या संवेदनशील, अनुभवसंपन्न,हरहुन्नरी व रसिक व्यक्तिमत्त्वाची मिळालेली दाद,माझ्यासाठी "खास" आहे.मी नक्कीच माझ्यातर्फे उत्तमोत्तम लिहिण्याचा प्रयत्न करेन.

      हटवा

Best of glocal marathi

गनिमीकावा

        गनिमीकावा संकटे बहु येतील, हरणे तुला ठाव नाही.. कोंडीत सापडाया, गड्या तू कुणाचा साव नाही..!!     भेटतील सरडे,      पदोपदी तुला रे.. ...