मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०

आम्ही नागपूरकर-भाग 1(नागपुरी बोली)



Courtesy:Unsplash-Harish Fulpadia

मित्रांनो,खरं तर आजवर नागपूरकरांची वैशिष्ट्ये नागपूरकरांनी कमी व नागपूर बाहेरच्या लेखकांनीच जास्त सांगितलेली आपल्याला दिसतात. त्यामुळे "अस्सल नागपूरकर" कसा असतो? याचे त्यांनी केलेले वर्णन अगदी वरवरचे व ऐकीव माहितीवरून केल्याचे आपणांस दिसते. मुंबईकर,पुणेकर, सातारकर... इत्यादी.बद्दल मी बोलणार नाही,मात्र या सर्वांबद्दल आदर बाळगून,"आम्ही नागपूरकर"काय चीज आहोत?हे गुणदोषांसह सांगण्याचा हा अल्पसा प्रयत्न..

                           


 सर्वप्रथम,नागपूरकरांची जडणघडण जाणून घ्यायची असेल तर आपल्याला नागपूरचे भौगोलिक स्थान जाणून घ्यावे लागेल.नागपूर जिल्ह्याची उत्तरेकडील सीमा मध्यप्रदेशला लागून असल्याने व एकेकाळी नागपूर ही "सीपी अँड बेरार"प्रांताची राजधानी असल्याने तिथे पूर्वापार हिंदी भाषिक लोक कामा-धंद्यानिमित्त येत आलेले आहेत. त्यामुळे नागपूरवर हिंदीचा प्रभाव ओघाने आलाच व ते नैसर्गिकही आहे.कारण नदीच्या वाहत्या प्रवाहाप्रमाणे भाषा सुद्धा प्रवाही असते. प्रवाह थांबला तर त्याचे डबके होते,म्हणून नागपूरमध्ये मराठी व हिंदीचा अद्भुत संगम होवून हा प्रवाह अखंड वाहत आलेला आहे. ज्याप्रमाणे इंग्रजीने जगातल्या सर्व भाषा स्वतःमध्ये सामावून घेतल्या, त्याप्रमाणे आम्ही नागपूरकरांनी मराठी सोबत हिंदीला आपलेसे केले.मग आमच्या भाषेवर एखादा पुणेकर म्हणतो,"काय राव,तुमची भाषा,अगदी भेसळ आहे. ना धड हिंदी ना धड मराठी.मग अशा पुणेकराला, भूगोल नव्याने शिकण्याची नितांत गरज आहे,असं मला वाटतं.कारण, उदाहरण द्यायचं झाल्यास, पुण्याला एकही हिंदी भाषिक प्रदेशाची सीमा खेटून नसल्याने व चहूबाजूंनी मराठीभाषी जिल्ह्यांच्या सीमा असल्याने त्यांनी मराठीचे शुद्ध रूप जपले तर त्यात काय एवढं नवल??त्यापेक्षा आम्ही नागपूरकरांनी हिंदीला,आपलंसं करून, आमची स्वतःची "नागपुरी बोली"जन्माला घातली,याची साधी दखल कुणी आजतागायत घेतली नाही.शिवाय हिंदी आत्मसात करून केंद्रीय सेवांत,स्वतःचा ठसा उमटविला व महाराष्ट्राचा मान वाढविला, याचेही कुणी कौतुक करत नाही.

                                       

Courtesy:Unsplash-Mayank Mishra

  ते सोडा.. सोलापुरात बोलली जाणारी कानडीचा प्रभाव असलेली मराठी,खान्देशातली अहिराणी,खानदेशी मराठी,कोकणातली कोकणी,मालवणी मराठी,मराठवाड्यातली मराठी...यादी बरीच मोठी होईल,या मराठीला बोल लावलेलं फारसं ऐकण्यात येत नाही.मात्र नागपुरी मराठीची नेहमीच चेष्टा केली जाते.या सर्व शुद्ध मराठी आहेत काय?नक्कीच नाही. कारण प्रत्येक बोलीला अंगभूत सौंदर्य असतं व तिने ते आत्मसन्मानाने मिरवायला हवं,आम्ही ते मिरवतो, कोण काय म्हणेल याची आम्ही फिकीर करत नाही.म्हणून आम्ही नागपूरकर जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तर, आपल्या खास नागपुरी मित्रांसोबत,"का बे, काहून बे,कायले बे..." बोलणारच.ही आहे अस्सल नागपूरकराची ओळख. अगदी पुणे,मुंबई, पॅरिस,लंडन,न्यूयॉर्क..कुठेही असू द्या,असं बोलण्याने आमची "wavelength"लगेच जुळते. नाही तर, " कशाला?काय रे ?.. "हे आमच्यासाठी अगदी मिळमिळीत,फिक्क्या वरणासारखं....असं नव्हे की आम्हाला "काय रे?कसा आहेस ?कशाला रे?.. असे बोलता येत नाही,परंतु त्यामुळे आमच्या बोलण्यातून सहजता,उत्स्फूर्तता पार निघून जाते.


आता फळांचंच बघा, द्राक्षांना अस्सल नागपूरकर कधीच द्राक्षं म्हणणार नाही...बरोबर ओळखलंत,तो "अंगुर" म्हणेल.आता काही म्हणतील हा तर हिंदी शब्द आहे.अगदी बरोबर. पण आम्ही नागपूरकरांनी त्याला एवढं आपलंसं केलं आहे की कुणाचाही तो हिंदी शब्द आहे,यावर विश्वास बसत नाही.द्राक्षं म्हणणारा नागपुरात तुम्हाला दिवा घेऊन शोधलं तरी सापडायचा नाही.द्राक्षाप्रमाणे सफरचंदाचेही तसेच.नागपुरात त्याला कुणीही सफरचंद म्हणत नाही,इथे हिंदीतला "सेब",..अपभ्रंश होवून मराठीत "सेप" बनतो.'सेफ'नाही बरं का.अशी अनेक उदाहरणे देता येतील.पालेभाज्यांना आमच्या नागपुरात उर्वरीत महाराष्ट्रापेक्षा स्वतंत्र ओळख आहे.तुमची स्त्रीलिंगी कोथिंबीर आमच्या इथे पुल्लिंगी "सांभार"बनून ऐटीत मिरवते.उच्च विद्याविभूषित सुद्धा सर्रास सांभार म्हणतो व त्यात त्याला अजिबात संकोच वाटत नाही.बटाटे हे "आलू"व टमाटे "टमाटर"या हिंदी नावांनी ओळखले जातात.शिवाय जुने-जाणते "भेदरं"या नावाने टमाट्यांना संबोधतात.माकडासारख्या प्राण्याला आम्ही नागपूरकरांनी हिंदीतील "बंदर" व नागपुरी मराठीत "वांनेर"हे नवीन नाव दिलंआहे.बकरी हा हिंदी शब्द "शेळी"ला पर्यायी शब्द म्हणून आमच्या कित्येक पिढ्यांनी स्वीकारला आहे.नागपुरात बऱ्याचदा चहाचा "चाय" व सरबतचे "शरबत"झालेलं तुम्हाला दिसेल. औषधांच्या दुकानाच्या बोर्डावर "औषधी" कमी व "दवाई"हे जास्त लिहिलेलं आढळेल.इतकेच नाही तर"पटता है तो टेक नही तो रामटेक"अशा म्हणीही आमच्या नागपुरात प्रचलित आहेत.असे अनेक दाखले देता येतील.त्यावर तुम्ही म्हणाल ही मराठी मिश्रित हिंदी आहे का हिंदी मिश्रित मराठी? असे वाटणे साहजिक आहे,परंतु याच रुपात आमच्या इथे मराठी गेल्या कित्येक शतकांपासून नांदत आली आहे.

 

Courtesy:Unsplash-Sidharth Singh

नागपुरात वऱ्हाडी बोली, झाडी बोली या दोन्ही बोली एकाचवेळी अगदी लाडीगोडीने राहत आलेल्या आहेत.अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमेकडील भागावर वऱ्हाडी बोलीचा जास्त प्रभाव आहे.यात नरखेड,काटोल,कळमेश्वर व काही प्रमाणात सावनेर तालुक्याचा भाग येतो.तर भंडारा,चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेजवळच्या तालुक्यांवर झाडी बोलीचा प्रभाव आढळतो.यात कुही,मौदा,भिवापूर व उमरेड या तालुक्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. कामठी, पारशिवनी,रामटेक या तालुक्यांवर हिंदी भाषेचा प्रभाव जाणवतो.हिंगणा तालुक्याची बोली प्रामुख्याने वऱ्हाडी व काही अंशी झाडी बोलीचा प्रभाव असलेली भासते.नागपूर शहराचं म्हणाल तर इथे हिंदी,वऱ्हाडी,झाडी,व इतर बोलींचा मिलाफ झाल्याचे आपणास दिसते.काही भाषा तज्ज्ञ विदर्भाला मराठी भाषेची जननी संबोधतात.मराठीतील सर्वात प्राचीन काव्यग्रंथ "विवेकसिंधु" मुकुंदराज या श्रेष्ठ कवीने नागपूर जिल्ह्यातील "आंभोरा"येथे, वैनगंगा नदीच्या किनारी लिहिल्याच्या नोंदी आहेत.शिवाय मुकुंदराज यांचे जन्मस्थळ आमच्या विदर्भात भंडारा जिल्ह्यातील पवनी ही ऐतिहासिक नगरी असल्याचे दाखले प्राचीन  ग्रंथात मिळतात.म्हणून आमच्या मराठीवरील प्रेमावर कुणी शंका घेतलेलं आम्हाला अजिबात खपत नाही.

   


एवढा सगळा खटाटोप करण्याचं कारण म्हणजे,जागतिकीकरणाच्या लाटेत नागपूरकर तरुण,देशाच्या नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात कामधंद्यांतनिमित्त पोचलेला आहे.तिथे वास्तव्य करीत असतांना,नागपूरकरांना,त्यांच्या भाषेविषयी मस्करीचा सामना करावा लावतो. "आपला तो बाळू,दुसऱ्याचं ते कारटं"या न्यायाने नागपुरी मराठीची अवहेलना काही संकुचित विचारसरणी असणाऱ्यांकडून नेहमी केली जाते.अशा अल्पज्ञानी लोकांची तोंडं कायमची बंद करण्यासाठी व त्यांच्या बुद्धीचा आवाका अधिक व्यापक करण्यासाठी हा लेख.आवडल्यास आपल्या नागपूरकर मित्रांना नक्की शेयर करा.

To watch more interesting stories do visit ,my youtube channel"Glocal Marathi".

१७ टिप्पण्या:

  1. खूप सूंदर.. जबरदस्त विषयाची निवड. खूप मस्त आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. बढिया अन खरंखुरं लिहलं , चंदू भौ तुनं..👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. कोणी काय बी मनो, मले माया भाषेचा गर्व हाये. खूप मस्त आन खरं लिवल गा तून, मले तं खूपच मजा आली बा वाचण्यात. असंच मस्त लिवत जा. लय बरं वाटते,असं काही वाचून.

    उत्तर द्याहटवा
  4. एकदम खरं बोल्ले गुरुजी तुम्ही, प्रत्येकाला स्वतःच्या बोलीभाषेचा अभिमान असलाच पाहिजे,इतर भाषेप्रमाणे आपल्या वर्हाडी व झाडी भाषेला सुद्धा विशिष्ट दर्जा मिळाला पाहिजे

    उत्तर द्याहटवा
  5. खरंतर प्रत्येक प्रादेशिक आणि देशी (लोकल) भाषेचा आपापला शब्द साठा असतोच आणि तो त्या त्या ठिकाणी अगदीच कॉमन असतो , अशातच आपल्या नागपुरी भाषेचा लहेजाच वेगळा.. भैताड सारख्या cute शब्दाची मजा काही औरच. खूप छान लिहिलंस मित्रा. विषयाची निवड उत्तम. Great, keep it up.

    उत्तर द्याहटवा
  6. सुंदर निरीक्षण..जबरदस्त लेख..👌👌
    मायबोलीचे कवतिक लै बेस वाटलं भौ..

    उत्तर द्याहटवा
  7. Atishay sundar Aaplya bhashecha Aaplyala garva asnech pureshe nahi tar tya bhashecha garv asnyache karanahi aaplyala mahiti asne garjeche aahe. Aani ya lekhachya madhyamatun tumhi te sidhha kele aahe

    उत्तर द्याहटवा
  8. मस्त ना बावा ... नागपुरी मराठी बद्दलचे खुप सुंदर आणि वास्तविक विश्लेशण...

    उत्तर द्याहटवा

Best of glocal marathi

गनिमीकावा

        गनिमीकावा संकटे बहु येतील, हरणे तुला ठाव नाही.. कोंडीत सापडाया, गड्या तू कुणाचा साव नाही..!!     भेटतील सरडे,      पदोपदी तुला रे.. ...