सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०

राम

Courtesy:Unsplash
    "राम जन्माला गं सखे,राम जन्मला"ते"राम नाम सत्य है"पर्यंतचा आपला जीवनप्रवास राम नामाच्या साक्षीने होत असतो .एवढेच नाही तर अभिवादन करतांना "रामराम",भीतीने घाबरल्यास "राम-राम-राम-राम",आश्चर्य वाटल्यास"हायराम"यांसारख्या असंख्य भावना आपण राम नामाने अगदी,कळत नकळत व्यक्त करीत असतो.                                     
Courtesy:Unsplash-Olivier Guillard

ग्रामीण भाग असो की शहरी,"राम,श्रीराम, तुकाराम, राजाराम, सखाराम...ई."नावांनी राम आपल्याला पदोपदी भेटत असतो."आयाराम-गयाराम"सारख्या प्रवृत्तीनाही राम नाम लावण्यास आपण कसूर केली नाही,हेही विशेष.सांगायचे तात्पर्य,राम नामाने आपले संपूर्ण भावविश्व व्यापलेले दिसते.                                             
Courtesy:Unsplash-Frank Holleman

हा राम,"राजा की देव","आर्य की अनार्य","भारतीय की विदेशी"असल्या वादात न पडता,सामान्य माणूस त्याला "शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांत,मोलमजुरी करणाऱ्या कष्टकऱ्यांत,दीन-दुबळ्यांत"शोधतो.हा असतो महात्मा गांधींचा राम, जो त्यांनी समाजातल्या शेवटच्या व्यक्तीत पाहिला व रामराज्याचे स्वप्न आजन्म उरी बाळगले तसेच शेवटचा श्वासही "हे राम!!"म्हणत सोडला.           
Courtesy:Unsplash-Aman Upadhyay

सामान्यांनी नेहमीच रामाला आदर्श व मूल्यांचे मूर्तीमंत प्रतीक म्हणून जोपासले आहे.राम म्हणजे,शबरीची उष्टी बोरे खाणारा,पक्षी,वानर,यांच्यात आत्मविश्वास जागवून त्यांच्या साथीने जगज्जेत्या रावणाशी लढणारा नायक,एक आदर्श राजा,पती,भाऊ,मुलगा.. ई.रुपात रामाची प्रतिमा प्रस्थापित झालेली आहे.ही आदर्श व मूल्ये आपण आचरणात आणण्यात कमी पडलो,हे मात्र नक्की.                               
Courtesy:Unsplash-Nandhu Kumar

आज कधी नव्हे एवढा राम नामाचा गजर होत असतांना..सर्व जाती,धर्म,पंथांना स्वीकारणारा "राम"जर आपण स्वीकारला नाही तर येणाऱ्या काळात मात्र आपल्या जगण्यात "राम"राहणार नाही,हेही तितकेच खरे!!! 


गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

1985

Courtesy:Unsplash-Aman Shrivastava

 2020 या सालात ,आम्ही ,1985 मधे जन्मलेले ,वयाची 35 वर्षे पूर्ण करणार आहोत.भारतीयांचं सरासरी आयुर्मान जवळपास 70 वर्षांचं आहे.त्याअनुषंगाने आम्ही आमचं अर्ध आयुष्य आजपर्यंत जगलेलो आहोत.कधीकाळी हाफपॅन्ट मधे फिरणारे, स्वतःच्या मुलासाठी हाफपॅन्ट खरेदी करणारे कधी झालो,हे आमचं आम्हालाच कळलं नाही.मागे वळून पाहिल्यास वाटतं, compromises अर्थात तडजोडी करणाऱ्या पिढ्यांचे कदाचित आम्ही शेवटचे शिलेदार.
Courtesy:Unsplash-Annie Spratt

एवढेच नाही तर, पाटी घेऊन शाळेत जाणारे,कापडी थैल्याला दप्तर म्हणून मिरवणारे, ठिगळं असलेली पॅन्ट घालणारे,शत प्रतिशत मराठी शाळेत शिकणारे,शाईचा पेन वापरणारे,गावात,शेतात बिनधास्त हिंडणारे,अभ्यासाचं अजिबात टेन्शन न घेणारे,पाच,दहा,वीस, पंचवीस,पन्नास ,पैशांत गोळ्या- बिस्किटं विकत घेवून खाणारे,बोरकूट चाखणारे,आठवडी बाजारातील 'शेव -चिवडा'जिलेबी''भजी'यांसारखे पदार्थ बिनधास्त खाणारे,कटिंग करायला गेल्यावर हमखास केसांना मशीन मारणारे,कंचे, बिल्ला,टांगा, लगोरी सारखे अस्सल गावठी खेळ खेळणारे,भर उन्हात डांबरी रस्त्यावर विना चपलेने फिरणारे,जुनी पुस्तके अर्ध्या किमतीत विकणारे व घेणारे,वर्षातून फक्त दोनदा म्हणजे 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला इस्त्री केलेला शाळेचा गणवेश घालणारे.   
Courtesy:Unsplash-Church of the kind

....बऱ्याच गोष्टींचे शेवटचे वारसदार.एकेकाळी पत्रांतून भावनांना मोकळी वाट करून देणारे,आज whatsapp,facebook सारख्या social media वर व्यक्त होत आहोत. landline number ते smart phone या प्रवासाचे आम्ही साक्षीदार आहोत.                         
Courtesy:Unsplash-Robert Collins

स्वतः बालवाडीत शिकलेले, आज आपल्या मुलांना KG1,KG2 मधे शिकवित आहोत.DD मेट्रो बघण्यासाठी उंच अँटेना करून प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे आम्ही आज सोफ्यावर बसून रिमोट हाती घेऊन HD Channel त्याच तन्मयतेने बघत आहोत.एका कॉम्प्युटर सामोर दहा-दहा जण बसून कॉम्प्युटर  शिकणारे आम्ही,सहज लॅपटॉप हाताळत आहोत."आयला सचिन"ते" धोनीने धो डाला"म्हणत दाद देणारे,"मिथुनदा ते सुशांतसिंग राजपूत" पर्यंत सिनेमाचा मनमुराद आनंद घेणारे,सार्वजनिक गणेशोत्सवात टीव्हीवर सिनेमा बघण्यासाठी रात्र-रात्र जागणारे,लाईट गेल्यास दिवा किंवा मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास करणारे,गावातील नदी- नाल्यांवर,विहिरींवर,मनसोक्त पोहणारे,गर्लफ्रेंड पेक्षा जिवलग मित्रांना भाव देणारे ,पाच-दहा रुपयांचं ग्रीटिंग कार्ड देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे,आज व्हाट्सएपवर स्टेटस ठेवून शुभेच्छा देत आहोत.शाळेत रक्षाबंधनाच्या दिवशी नाईलाजाने राखी बांधून घेणारे,लग्नात पंगतीत जेवणारे व वाढणारे,पाच-दहा रुपयांची क्रिकेट match लावणारे,Slambook प्रमाणे नात्यांनाही जीवापाड जपणारे आम्हीच.                                   
Courtesy:Unsplash-Matheus Ferrero

काळ हा बदलत असतो.आम्हीच तेवढे ग्रेट बाकी वाईट असे नाही.प्रत्येकाला आपली batch,जगात भारी असं वाटतं असतं. त्याचं कारण म्हणजे त्यांनी सोबत घालवलेले असंख्य असे आनंदाचे क्षण. त्या क्षणांचे साक्षीदार तेवढे ,ते स्वतः असतात.स्वतः भोगलेल्या सुख दुःखाचा मोह प्रत्येकाला असतोच. याच मोहापोटी वाटतं,  आम्ही 1985 वाले जुन्या व नव्या पिढीला जोडणारा दुवा आहोत.1985 च्या मागे-पुढे जन्मलेले सुध्दा याविषयी स्वतःला relate करू शकतील, कारण,व्यापक अर्थाने त्यांचं भावविश्वही आमच्याशी साधर्म्य राखणारं आहेच.                           
Courtesy:Unsplash-Chang Duong

बदल स्वीकारत,भल्या-बुऱ्या वेळेचा,प्रसंगांचा,अनुभवांचा सामना करत आम्ही आमची पस्तिशी ओलांडली.. काही कमावलं.. काही गमावलं.. चुकाही भरपूर केल्या..पडत-झडत पुढे जात राहिलो..मोठ्यांचा आदर,लहानग्यांवर प्रेम करत,सर्वांना सोबत घेत,"सबका साथ सबका विकास"हे ब्रीद घेऊन आयुष्य जगत(मोदींच्याही आधी)वाटचाल करत राहिलो..                             
Courtesy:Unsplash-Javier Allegue Barros

आज येथपर्यंत येऊन पोहोचलो.. पुढे अर्धा खडतर असा प्रवास बाकी आहे..आतापर्यंतच्या प्रवासात तारुण्य भरभरून जगलो,उपभोगलं..पुढील प्रवास वार्धक्याकडे नेणारा आहे..मित्रांची साथ अजूनही अतूट आहे व कायम रहावी...आम्हा 1985 वाल्यांची सत्तरी तेवढ्याच जल्लोषात व सर्वांच्या साथीने साजरी व्हावी,या सदिच्छेसह..घेतलेला हा मागोवा...बाकी काळाच्या पडद्यामागे काय दडलंय,हे येणारा काळच सांगेल!!!!

बुधवार, ९ सप्टेंबर, २०२०

कुटुंब

  

Courtesy:Unsplash-Joshua Hoehne

...त्या 
नसतात नुसत्याच चार भिंती, 
दगड, माती किंवा सिमेंट, विटांनी जोडलेल्या....कुडाच्या,मातीच्या व अगदीच सिमेंटच्या असल्या..तरी.... त्यांना भक्कमपणे जोडून ठेवतो....ओलावा मायेचा....रुसवे-फुगवे चालायचेच..दंगा-मस्तीही चालायचीच..हीच तर असते खूण जिवंतपणाची....नाहीतरी..मोठमोठाल्या हवेल्यात भुतं राहतात,हे ऐकतच आपलं बालपण गेलंय..।।                                 
Courtesy:Unsplash-Dimitri Houtteman

इथे असतात, आई वडिलांनी आणलेल्या खाऊसाठी भांडणारे....शाळेच्या ट्रीपला गेल्यास आवर्जुन एकमेकांसाठी काही ना काही आणणारे....मित्र नसतात ते मुळी एकमेकांचे....पण सतत साऱ्यांच्या मनी असतो एकच ध्यास....कुटुंबाच्या प्रगतीचा.. म्हणूनच कदाचित हे बंध मैत्रिपलीकडचे असतात...।।
     
Courtesy:Unsplash-Liv Bruce

 इथे झटत असतो प्रत्येकजण,रक्ताचं पाणी करून..भविष्यातल माळरानं फुलवण्यासाठी..म्हणूनच तर अभिमानानं मिरवतो एकमेकांची जुनी पुस्तकं.. कापडं त्यांच्या ठिगळा सहित..शेवटी कापडाप्रमाणे नाती थोडीच असतात दिवसागणिक जुनी होणारी।।                     
Courtesy:Unsplash-Jude Beck

बाहेरच्यांनी साधं..काही बोलल्यास तिळपापड होतो..तेच मात्र घरच्यांनी बदडल्यास..चिडतो..रागावतो..व बरंच काही करतो..शेवटी विसरूनही जातो..खुन्नस मात्र बाहेरच्यांचीच..कारण त्याच चार भिंती देतात शाश्वती सुखाच्या चार घासांची..म्हणतात ना "कुणी जा म्हणणार नाही ,तेच तर असतं आपलं खरं घर"।।                                             
Courtesy:Unsplash-Jude Beck

हे रेशमी बंध ,हा सच्चेपणा.. उरलाय कुठे..दिखाऊपणा, नाटकीपणाचा बीभत्स मुखवटा घेऊन वावरताहेत सगळे..चार भिंती तेव्हाही होत्या..आज रूढार्थाने अधिक भक्कम झाल्यात..मातीचा..भाकरीचा..जुन्या-फाटक्या पुस्तकांचा..कपड्यांचा..अस्सल गंध मात्र हरवलाय.. झालीय जणू निर्वात पोकळी..रुक्ष, निर्जीव..नात्यांची.. कुटुंबांची...                                                  ............ (कुटुंब)

प्रेम

(Courtesy:Unsplash-Mayur Gala) 

 प्रेम"या दोन अक्षरी शब्दात अद्भूत,अनुपम व निरागस सौंदर्य   दडलेलं आहे.मात्र ते दिसण्याचं नसून असण्याचं असतं, हे कळायला बऱ्याच जणांना उभी हयात कमी पडते,हेही तितकेच खरे!!!

   
(Courtesy:Unsplash-Annie Spratt )
तारुण्यसुलभ वयात जडतं ते गुलाबी,मखमली प्रेम. काही कळण्यासमजण्या पलीकडच्या या वयात असते,एकमेकांविषयी हुरहूर.. ओढ..आकर्षण.कुणाचं असतं अव्यक्त, अबोल,लपूनछपून..तर कुणाचं बोलकं, बिनधास्त,खुलेआम.."डंके की चोट पर"..म्हणतात ना,"प्रेम हे प्रेम असतं, तुमचं नी आमचं सेम असतं",अगदी असंच असतं हे गुलाबी प्रेम.याला प्रेम म्हणावं का??यावर दुमत नक्कीच असू शकेल. पण हे प्रेम न करणारा व सबंध आयुष्य, या प्रेमाचा हळुवारपणा हृदयात न जपणारा जगात शोधूनही सापडायचा नाही!!
     
(Courtesy:Unsplash-Aziz Acharki)

पंचविशी नंतर खऱ्या अर्थाने सुरू होतो ,डोळस..प्रगल्भ.."जिंदगीभर का साथ"..अशा प्रेमाचा शोध.शोधच तो!!कारण कुणी शोधतो प्रेयसीच्या रुपात,कुणी मैत्रिणीच्या..नाहीच काही झाले तर जोडीदाराच्या रुपात....झाले एकदाचे...मग काय, आनंदी आनंद!!असं नसतं.इथे सुरू होते देवाणघेवाण भावनांची,विचारांची,गुण-दोषांची..  ही असते, अकल्पित,अविश्वसनीय अशी घुसळण..या सर्व अग्निदिव्यातून अलगतपणे, तावून- सुलाखून,तळपत निघतं.. ते खरं प्रेम.. बऱ्याचदा दिखाऊ,वरकरणी, मुखवटा असलेलं,"सो कॉल्ड".. प्रेम,इथेच जळून जातं.. व संपूर्ण आयुष्य बेचिराख होऊन जातं. पण, जर समर्पणाची जोड मिळाली,तर याच प्रेमाला दिव्यत्वाची झळाळी प्राप्त झाल्या वाचून राहत नाही.एकमेकांविषयी आदर,आपुलकी, जिव्हाळा,या जगात अगदी फुकट मिळणाऱ्या गोष्टी, सहजीवनाला गर्भश्रीमंती मिळवून देऊ शकतात. कारण,दगडाचा देव जर प्रेमाचा भुकेला असतो तर हाडामासाच्या माणसाने कुणाचे घोडे मारलेत!!
                                               
(Courtesy:Unsplash-Everton Vila)

आयुष्यभर माणूस सैरभैर पळत  असतो.जबाबदाऱ्या,महत्वाकांक्षा, भौतिक सुख..यांचा ताळमेळ साधता -साधता त्याची पुरती दमछाक होते.बरेच जण ते साध्य करतातही.पण हे सर्व मिळवल्यावरही ते समाधानी असतात का??नक्कीच नाही.कारण त्यांना खऱ्या प्रेमाचा शोध लागलेला नसतो.व हा लागतो,तेव्हा आयुष्याची ती सोनेरी वर्षे काळाच्या पडद्याआड लुप्त झालेली असतात.मागे वळून पाहतांना,पश्चयाताप करण्यावाचून काही उरत नाही!!
   
(Courtesy:Unsplash-Harli Marten)

            प्रेमाला काळ, वेळ, वय,कशाचंही बंधन नसतं. प्रेम हे शाश्वत,निरामय,सुखदायी असतं. हे अस्सल,पवित्र,निरागस प्रेम ज्याला मिळतं,तोच खऱ्या अर्थाने सुखी,समाधानी!असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही!!

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

हत्तीडोह

 


मित्रांनो,ग्लोकल मराठी या

ब्लॉगवर

मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो.

आज मी आपल्याला

नागपूर जिल्ह्यातील

अतिशय दुर्लक्षित परंतु तितक्याच नयनरम्य अशा पर्यटन स्थळाची ओळख करून देणार आहे.


'आम्ही पर्यटन प्रेमी' हा आमचा

पर्यटन प्रेमी ग्रुप नवनवीन पर्यटन स्थळांचा नेहमीच शोध घेत असतो.

सहज चर्चा करत असतांना आम्हाला 'हत्तीडोह' या स्थळाविषयी माहिती मिळाली. मग काय,ठरले आमचे.हत्तीडोह या ठिकाणी जाण्याचे.आमचे मित्र लंकेश भगत यांनी त्याचे नियोजन केले.


नागपूर जिल्ह्यातील हिंगणा या तालुक्याच्या ठिकाणापासून जवळपास बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या

आगरगाव( तांडा )या गावाजवळ हत्तीडोह हे स्थळ आहे.साधारण दीडेक किलोमीटर अंतर आगरगाव ते हत्तीडोह या दरम्यान आहे.


परंतु हे ठिकाण

जंगलात

असल्यामुळे तिथे

जाण्याचा योग्य व विश्वासार्ह मार्ग माहीत नसल्यामुळे,आम्ही आगरगाव येथील आमच्या स्थानिक युवक मित्राची मदत घेण्याचे ठरवले.


त्याला आमचा गाईड बनवून त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हत्तीडोहाकडे  जाण्यास वाटचाल सुरू केली.

आगरगाव गावापासून गवत- काट्यातून पायवाटेने जाताना,

एक वेगळाच उत्साह आम्हाच्या अंगी संचारला होता.


गवतातून 
वाट काढत, छोटे- छोटे ओहोळ ,पाण्याचे झरे ओलांडत, अवतीभोवती असलेला हिरवागार निसर्ग न्याहाळत ,आम्ही डोंगरदऱ्यातून वाटचाल करत होतो.

पायात शूज किंवा चप्पल

काहीही नव्हते.

कारण रस्ता काहीसा चिखलाचा

व दलदलीचा असल्यामुळे आम्ही अनवाणी पायाने

छोट्या-छोट्या पायवाटा तुडवत हत्ती डोहाकडे वाटचाल करु लागलो.


वाटेने जाताना रस्त्यात आम्हाला एक छोटासा धबधबा लागला .धबधब्याची उंची फारशी नव्हती.मात्र,

काल परवा येऊन गेलेल्या पावसामुळे त्या धबधब्यावरून पडणारं निखळ,शुद्ध पाणी दुधाच्या कारंज्याप्रमाणे भासत होतं.

तिथे आंघोळ करण्याचा आमचा बेत होता परंतु आमच्या स्थानिक युवक मित्राने पुढे यापेक्षा सुंदर असा धबधबा असल्याचे सांगितल्यामुळे आम्ही तिथे न थांबता पुढची वाटचाल सुरू केली.पुन्हा एकदा गप्पागोष्टी करत,

चेष्टा मस्करी करत ,एकमेकांवर कोट्या करत, त्याचसोबत निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आम्ही पुढे जात राहिलो.


जवळपास अर्ध्या तासाची

पायपीट केल्यानंतर ,

एका उंच अशा ठिकाणी आम्ही पोहोचलो.


तिथून खाली बघितल्यावर आम्हाला छोटेसे

नदीचे पात्र दिसले.


त्या पात्रामधून पाणी खळखळत वाहत होतं.आम्ही सर्वांनी

ते दृश्य डोळ्यात साठवून घेतले.

निसर्गरुपी चित्रकाराने रेखाटलेले ते सुंदर चित्र बघून आम्ही थक्क झालो. उंच टेकडावरून आम्ही खाली उतरलो.

वाहणाऱ्या पाण्याच्या

समांतर अशा पायवाटेने आम्ही काही अंतर चालत राहिलो आणि काही अंतर चालल्यानंतर आम्ही हत्तीडोह या आमच्या इच्छित स्थळी पोहोचलो. 


 नावाप्रमाणेच
हत्तीच्या आकाराचा तो डोह होता.म्हणूनच गावकऱ्यांनी ते नाव दिले असावे,याची आम्हाला प्रचीती आली.                             


 त्या डोहात दोन ते तीन माणसं खोल पाणी असल्याचे स्थानिक युवक मित्राने सांगितलं. अवतीभवती असणारा मनमोहक निसर्ग, सोबतच त्या डोहात पडणारं पांढरंशुभ्र धबधब्याचं पाणी आमचं मन मोहून घेत होतं. आम्ही सर्व पर्यटक मित्रांनी

स्वतःचे फोटो काढून तिथे

आमची हौस भागवून घेतली.


त्यानंतर

हत्तीडोहाचे विलोभनीय रूप डोळ्यांत साठवून घेतलं.

ते दृश्य पाहून आम्हाला धन्य झाल्यासारखं वाटलं. त्यानंतर आमच्या स्थानिक युवक मित्राने ,आम्हाला, तेथून जवळपास शंभर मीटर अंतरावर असलेल्या धबधब्याकडे नेले.आधी बघितलेल्या धबधब्यापेक्षा

अधिक सुंदर ,

मनमोहक असा धबधबा पाहून ,आम्हा  सर्व, घामाने ओले झालेल्या मित्रांना, धबधबा आंघोळीसाठी खुणावू लागला.


आम्ही

ताबडतोब

आमच्या अंतर्वस्त्रासह त्या धबधब्याखाली गेलो. धबधब्याखाली स्वतःला ओलंचिंब करून घेतलं.मनसोक्त भिजल्यानंतर व त्याचा मनमुराद

आनंद घेतल्यानंतर, धबधब्याच्या वर असणार्‍या ,छोट्याशा स्विमिंगपूलरुपी छोट्या डोहामध्ये आंघोळीचा पुन्हा एकदा मनसोक्त आनंद घेतला.


खूप मज्जा केली.यानंतर आपले वस्त्र  परिधान करून, मजल-दरमजल करत,पुन्हा एकदा रान -वाटा तुडवत व  आजूबाजूला असणाऱ्या  हिरवाईचा आनंद घेत आम्ही आगरगावला पोहोचलो.

तिथे आमच्या स्थानिक मित्राच्या घरी चहापाणी घेतल्यानंतर,आम्ही आमच्या बाईकने आमच्या गावाकडे  रवाना झालो.


गेल्या पंधरा वर्षात नियमित या मार्गाने जाऊन सुद्धा,एवढे सुंदर असं स्थळ आजपर्यंत आपण का बघितलं नाही? याची खंत आम्हा सर्वांना राहून-राहून वाटायला लागली. पण यापुढे दर पावसाळ्यात एकदा तरी हत्तीडोहाला नक्कीच भेट देऊ असा आम्ही प्रण केला.


धबधबा बघण्यासाठी आठशे ते हजार किलोमीटर अंतरावर, पुणे- मुंबई- महाबळेश्वर येथे
जाण्यापेक्षा आपल्या गावाजवळ असलेल्या हत्तीडोह सारख्या निसर्ग स्थळांचा शोध घेतल्यास ,स्थानिक आदिवासी युवक व ग्रामस्थांना उपजीविकेचे साधन मिळेल,शिवाय विदर्भातील दुर्लक्षित पण तितकेच सुंदर,देखणे,नयनरम्य ठिकाणं जगाच्या- पर्यटनाच्या नकाशावर येतील,यात तिळमात्र शंका नाही.


आमच्या आनंदयात्रेची काही    क्षणचित्रे..


Best of glocal marathi

गनिमीकावा

        गनिमीकावा संकटे बहु येतील, हरणे तुला ठाव नाही.. कोंडीत सापडाया, गड्या तू कुणाचा साव नाही..!!     भेटतील सरडे,      पदोपदी तुला रे.. ...