![]() |
Courtesy:Unsplash-Aman Shrivastava |
2020 या सालात ,आम्ही ,1985 मधे जन्मलेले ,वयाची 35 वर्षे पूर्ण करणार आहोत.भारतीयांचं सरासरी आयुर्मान जवळपास 70 वर्षांचं आहे.त्याअनुषंगाने आम्ही आमचं अर्ध आयुष्य आजपर्यंत जगलेलो आहोत.कधीकाळी हाफपॅन्ट मधे फिरणारे, स्वतःच्या मुलासाठी हाफपॅन्ट खरेदी करणारे कधी झालो,हे आमचं आम्हालाच कळलं नाही.मागे वळून पाहिल्यास वाटतं, compromises अर्थात तडजोडी करणाऱ्या पिढ्यांचे कदाचित आम्ही शेवटचे शिलेदार.
![]() |
Courtesy:Unsplash-Annie Spratt |
एवढेच नाही तर, पाटी घेऊन शाळेत जाणारे,कापडी थैल्याला दप्तर म्हणून मिरवणारे, ठिगळं असलेली पॅन्ट घालणारे,शत प्रतिशत मराठी शाळेत शिकणारे,शाईचा पेन वापरणारे,गावात,शेतात बिनधास्त हिंडणारे,अभ्यासाचं अजिबात टेन्शन न घेणारे,पाच,दहा,वीस, पंचवीस,पन्नास ,पैशांत गोळ्या- बिस्किटं विकत घेवून खाणारे,बोरकूट चाखणारे,आठवडी बाजारातील 'शेव -चिवडा'जिलेबी''भजी'यांसारखे पदार्थ बिनधास्त खाणारे,कटिंग करायला गेल्यावर हमखास केसांना मशीन मारणारे,कंचे, बिल्ला,टांगा, लगोरी सारखे अस्सल गावठी खेळ खेळणारे,भर उन्हात डांबरी रस्त्यावर विना चपलेने फिरणारे,जुनी पुस्तके अर्ध्या किमतीत विकणारे व घेणारे,वर्षातून फक्त दोनदा म्हणजे 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला इस्त्री केलेला शाळेचा गणवेश घालणारे.
![]() |
Courtesy:Unsplash-Church of the kind |
....बऱ्याच गोष्टींचे शेवटचे वारसदार.एकेकाळी पत्रांतून भावनांना मोकळी वाट करून देणारे,आज whatsapp,facebook सारख्या social media वर व्यक्त होत आहोत. landline number ते smart phone या प्रवासाचे आम्ही साक्षीदार आहोत.
![]() |
Courtesy:Unsplash-Robert Collins |
स्वतः बालवाडीत शिकलेले, आज आपल्या मुलांना KG1,KG2 मधे शिकवित आहोत.DD मेट्रो बघण्यासाठी उंच अँटेना करून प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे आम्ही आज सोफ्यावर बसून रिमोट हाती घेऊन HD Channel त्याच तन्मयतेने बघत आहोत.एका कॉम्प्युटर सामोर दहा-दहा जण बसून कॉम्प्युटर शिकणारे आम्ही,सहज लॅपटॉप हाताळत आहोत."आयला सचिन"ते" धोनीने धो डाला"म्हणत दाद देणारे,"मिथुनदा ते सुशांतसिंग राजपूत" पर्यंत सिनेमाचा मनमुराद आनंद घेणारे,सार्वजनिक गणेशोत्सवात टीव्हीवर सिनेमा बघण्यासाठी रात्र-रात्र जागणारे,लाईट गेल्यास दिवा किंवा मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास करणारे,गावातील नदी- नाल्यांवर,विहिरींवर,मनसोक्त पोहणारे,गर्लफ्रेंड पेक्षा जिवलग मित्रांना भाव देणारे ,पाच-दहा रुपयांचं ग्रीटिंग कार्ड देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे,आज व्हाट्सएपवर स्टेटस ठेवून शुभेच्छा देत आहोत.शाळेत रक्षाबंधनाच्या दिवशी नाईलाजाने राखी बांधून घेणारे,लग्नात पंगतीत जेवणारे व वाढणारे,पाच-दहा रुपयांची क्रिकेट match लावणारे,Slambook प्रमाणे नात्यांनाही जीवापाड जपणारे आम्हीच.
![]() |
Courtesy:Unsplash-Matheus Ferrero |
काळ हा बदलत असतो.आम्हीच तेवढे ग्रेट बाकी वाईट असे नाही.प्रत्येकाला आपली batch,जगात भारी असं वाटतं असतं. त्याचं कारण म्हणजे त्यांनी सोबत घालवलेले असंख्य असे आनंदाचे क्षण. त्या क्षणांचे साक्षीदार तेवढे ,ते स्वतः असतात.स्वतः भोगलेल्या सुख दुःखाचा मोह प्रत्येकाला असतोच. याच मोहापोटी वाटतं, आम्ही 1985 वाले जुन्या व नव्या पिढीला जोडणारा दुवा आहोत.1985 च्या मागे-पुढे जन्मलेले सुध्दा याविषयी स्वतःला relate करू शकतील, कारण,व्यापक अर्थाने त्यांचं भावविश्वही आमच्याशी साधर्म्य राखणारं आहेच.
![]() |
Courtesy:Unsplash-Chang Duong |
बदल स्वीकारत,भल्या-बुऱ्या वेळेचा,प्रसंगांचा,अनुभवांचा सामना करत आम्ही आमची पस्तिशी ओलांडली.. काही कमावलं.. काही गमावलं.. चुकाही भरपूर केल्या..पडत-झडत पुढे जात राहिलो..मोठ्यांचा आदर,लहानग्यांवर प्रेम करत,सर्वांना सोबत घेत,"सबका साथ सबका विकास"हे ब्रीद घेऊन आयुष्य जगत(मोदींच्याही आधी)वाटचाल करत राहिलो..
![]() |
Courtesy:Unsplash-Javier Allegue Barros |
आज येथपर्यंत येऊन पोहोचलो.. पुढे अर्धा खडतर असा प्रवास बाकी आहे..आतापर्यंतच्या प्रवासात तारुण्य भरभरून जगलो,उपभोगलं..पुढील प्रवास वार्धक्याकडे नेणारा आहे..मित्रांची साथ अजूनही अतूट आहे व कायम रहावी...आम्हा 1985 वाल्यांची सत्तरी तेवढ्याच जल्लोषात व सर्वांच्या साथीने साजरी व्हावी,या सदिच्छेसह..घेतलेला हा मागोवा...बाकी काळाच्या पडद्यामागे काय दडलंय,हे येणारा काळच सांगेल!!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा