🏠घर
उन्हाळ्याचे दिवस होते.मे महिन्यातली दुपारची वेळ होती. मी माझ्या घराच्या मागच्या दारात उभा होतो.माझी नजर घराजवळील रिकाम्या प्लॉटकडे गेली. तिथे काही माणसं हाती टेप, दोरी व चूना,घेऊन मार्किंग करताना दिसली.ती माणसं प्लॉटची मोजणी करत होती. तेवढ्यात एक बिल्डर कारमधून खाली उतरला.त्याने प्लॉटवर नजर फिरवली.माणसांशी थोडेफार बोलून तो त्याच्या कारमधून निघून गेला.त्यानंतर ती माणसं सुद्धा त्यांचं काम आटोपून निघून गेली.
यादरम्यान दुपार टळून गेली होती. सायंकाळी पाच-सहाच्या सुमारास मोजणी झालेल्या प्लॉट पुढील रिकाम्या जागेत, एका घराच्या भिंतीच्या शेजारी, बांबू, तट्ट्या व लाकडी बल्ल्या, घेऊन एक टेम्पो आला. थोड्याच वेळात तिथे एक बिऱ्हाड आलं. नवरा बायको व मुलगी असलेलं छोटसं कुटुंब. आल्या- आल्या, कुटुंबातल्या पुरुषाने, त्या रिकाम्या जागेवर खड्डे खोदायला सुरुवात केली. बांबू, बल्ल्या व तट्ट्यांच्या मदतीने, त्याने तासाभरात तिथे एक झोपडी तयार केली. तिकडे त्याच्या बायकोने, दिडेक वर्षाच्या मुलीला, आडोशाला निजवून, आपल्या गाठोड्यातून रात्रीच्या जेवणासाठी,आवश्यक जिन्नस बाहेर काढले.दगडांची चूल मांडली.काड्या गोळा केल्या.चुलीवर पातेले ठेवून ती पोटाची आग शमविण्याच्या कामाला लागली. काम करता-करता अंधार दाटून आला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसभर रखरखतं ऊन होतं.मात्र रात्री काहीसा थंड वारा वाहू लागला.
बिल्डरने आधीच भिंतीला इलेक्ट्रिक मीटर व पाण्यासाठी बोरवेलच्या मशीनचे कनेक्शन लावलेले होते.त्यामुळे झोपडीत लाईटची व्यवस्था झालेली होती. दिवसभराच्या प्रवासाने व कष्टाने तिनही जीव, निवांतपणे झोपडीत झोपी गेले. मी कुतूहलाने त्यांच्या हालचाली टिपत होतो.दुसऱ्या दिवशी त्यांनी काही तट्ट्या व कापडाच्या मदतीने आंघोळीसाठी एक आडोसा तयार केला.त्यांची झोपडी भरवस्तीत असल्याने व आजूबाजूला पक्की घरे असल्याने,त्या तरुण जोडप्याला लहानशा लेकरासोबत साप-विंचवाची पर्वा न करता, टीनाच्या छताखाली,भर उन्हाळ्यात राहावं लागणार होतं. त्यांच्यासाठी कदाचित ते नवीन नसावं.म्हणून ते तिघेही सहजपणे वावरत होते. मला मात्र राहून राहून त्यांचं अप्रूप वाटायचं.
दुसऱ्या दिवशी,सकाळी दहाच्या सुमारास एक कार झोपडीजवळ आली.गाडीतून बिल्डर, "राम.. ए राम.. " अशी हाक मारु लागला. झोपडीतल्या पुरुषाचे नाव राम आहे,हे माझ्या लगेच लक्षात आलं. राम बाहेर आला.बिल्डरने त्याला कामाविषयी काही सांगितलं.त्याने मानेनेच होकार दिला. बिल्डर निघून गेला. मोजणी झालेल्या प्लॉटवर जेसीबीने खड्डे करायला सुरुवात झाली. आता मजुरांची गजबज वाढू लागली. राम त्यांच्यासोबत काम करू लागला.
त्याच्या बायकोने दिवसागणिक झोपडी नीटनेटकी केली.ती तिच्या मुलीला दिवसभर सांभाळायची. गरज पडल्यास, रामला मदत करायची. अशाप्रकारे त्यांचा उघड्यावरचा संसार सुरू झाला. हाहा म्हणता उन्हाळा पार पडला. इमारतीचे फाउंडेशन, पहिला स्लॅब, दुसरा स्लॅब पूर्ण झाला.चार मजली इमारत होणार असल्याने ही इमारत पूर्ण होण्यास अवकाश होता.
आता पावसाळा सुरु झाला. पाऊस धो-धो कोसळत होता. झोपडी शेजारी पाणी साचू लागलं. रिकाम्या प्लॉटवर गवत वाढू लागलं.रात्री बेडकांचा आवाज ऐकू येऊ लागला. अशा परिस्थितीत ते तीन जीव,साप -विंचवाची पर्वा न करता, खरबडीत जमिनीवर झोपून रात्र काढू लागले. काही दिवसांनी रामने एक लहानसा कुलर खरेदी केला. एक लोखंडी पलंग आणला. पावसाळ्यानंतर हिवाळा सुरू झाला.कडाक्याची थंडी पडू लागली.झोपडीमध्ये टिनाच्या छिद्रातून, तट्ट्यांमधून,बोचरे वारे आत येऊ लागले.अशाही परिस्थितीत, दिवसभर अंग- मेहनतीचे काम करून,चटणी -भाकर खाऊन, त्यांनी रात्रीच्या थंडीचा सामना केला. एव्हाना इमारतीचे चार स्लॅबच काम पूर्ण झाले.भिंती उभ्या झाल्या. राम सकाळी नऊ वाजतापासून इमारतीच्या भिंतीवर पाणी मारणे, बिल्डरने सांगितलेली, छोटी-मोठी कामे करणे इत्यादी कामे करायचा.
जणू ही इमारत नाही तर त्याचं स्वतःचं घर आहे, याप्रमाणे तो आपुलकीने काम करायचा.अधेमधे तो एकटक इमारतीकडे पाहत बसायचा. आता हिवाळा संपायला आला. इमारतीचे काम जवळपास पूर्ण होत आलं.इलेक्ट्रिक फिटिंग, प्लंबिंग, खिडक्या, दारं बसवून झाली. गावाकडे काही काम असल्याने त्याने बायकोला व मुलीला गावी पाठवलं.आता तो इकडे एकटाच राहू लागला.त्याला एकटेपणा जाणवू लागला.
बिल्डरने आता त्याला इमारतीच्या पार्किंगच्या जागेत राहायला सांगितलं.सबंध वर्षभर सांभाळलेल्या झोपडीवजा घराला मोडताना त्याला काहीच वाटलं नाही.अगदी सहजपणे इमारतीच्या पार्किंगच्या जागेत आडोसा तयार करून तो राहू लागला. हळूहळू इमारतीच्या पेंटिंगचं काम पूर्ण होत आलं.बिल्डर दररोज कामाची पाहणी करायला यायचा. रामही त्याच्यासोबत इमारतीला न्याहाळायचा.तो स्वतः मालक असल्याप्रमाणे इमारतीच्या बांधकामासंदर्भात बारीकसारीक बाबींकडे लक्ष द्यायचा. कालांतराने इमारतीचे काम पूर्ण झाले. त्यातले,आठही फ्लॅट विकले गेले. प्रत्येक फ्लॅटमध्ये एक-एक कुटुंब राहायला आलं.
आता पार्किंग एरियात, चारचाकी, दुचाकी गाड्या उभ्या राहू लागल्या.पार्किंगची जागा अपुरी पडू लागली.आज पुन्हा एकदा बिल्डर आला.तो रामला म्हणाला," राम,लक्ष्मीनगरमे अपना नया काम शुरू हो रहा है. वहाके प्लॉट के पास, कल अपनी झोपडी बना लेना."
.. रात्रीच्या अंधारात लायटिंगने न्हाऊन निघालेल्या नव्याकोऱ्या इमारतीकडे डोळे भरून पाहत," हा! ठीक है." असं म्हणत, राम त्या रात्री इमारतीच्या पार्किंगच्या जागेत, नवीन झोपडी उभारण्याचा,विचार करता-करता, कधी झोपी गेला,त्याचं त्यालाच कळलं नाही.