सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

हत्तीडोह

 


मित्रांनो,ग्लोकल मराठी या

ब्लॉगवर

मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो.

आज मी आपल्याला

नागपूर जिल्ह्यातील

अतिशय दुर्लक्षित परंतु तितक्याच नयनरम्य अशा पर्यटन स्थळाची ओळख करून देणार आहे.


'आम्ही पर्यटन प्रेमी' हा आमचा

पर्यटन प्रेमी ग्रुप नवनवीन पर्यटन स्थळांचा नेहमीच शोध घेत असतो.

सहज चर्चा करत असतांना आम्हाला 'हत्तीडोह' या स्थळाविषयी माहिती मिळाली. मग काय,ठरले आमचे.हत्तीडोह या ठिकाणी जाण्याचे.आमचे मित्र लंकेश भगत यांनी त्याचे नियोजन केले.


नागपूर जिल्ह्यातील हिंगणा या तालुक्याच्या ठिकाणापासून जवळपास बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या

आगरगाव( तांडा )या गावाजवळ हत्तीडोह हे स्थळ आहे.साधारण दीडेक किलोमीटर अंतर आगरगाव ते हत्तीडोह या दरम्यान आहे.


परंतु हे ठिकाण

जंगलात

असल्यामुळे तिथे

जाण्याचा योग्य व विश्वासार्ह मार्ग माहीत नसल्यामुळे,आम्ही आगरगाव येथील आमच्या स्थानिक युवक मित्राची मदत घेण्याचे ठरवले.


त्याला आमचा गाईड बनवून त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हत्तीडोहाकडे  जाण्यास वाटचाल सुरू केली.

आगरगाव गावापासून गवत- काट्यातून पायवाटेने जाताना,

एक वेगळाच उत्साह आम्हाच्या अंगी संचारला होता.


गवतातून 
वाट काढत, छोटे- छोटे ओहोळ ,पाण्याचे झरे ओलांडत, अवतीभोवती असलेला हिरवागार निसर्ग न्याहाळत ,आम्ही डोंगरदऱ्यातून वाटचाल करत होतो.

पायात शूज किंवा चप्पल

काहीही नव्हते.

कारण रस्ता काहीसा चिखलाचा

व दलदलीचा असल्यामुळे आम्ही अनवाणी पायाने

छोट्या-छोट्या पायवाटा तुडवत हत्ती डोहाकडे वाटचाल करु लागलो.


वाटेने जाताना रस्त्यात आम्हाला एक छोटासा धबधबा लागला .धबधब्याची उंची फारशी नव्हती.मात्र,

काल परवा येऊन गेलेल्या पावसामुळे त्या धबधब्यावरून पडणारं निखळ,शुद्ध पाणी दुधाच्या कारंज्याप्रमाणे भासत होतं.

तिथे आंघोळ करण्याचा आमचा बेत होता परंतु आमच्या स्थानिक युवक मित्राने पुढे यापेक्षा सुंदर असा धबधबा असल्याचे सांगितल्यामुळे आम्ही तिथे न थांबता पुढची वाटचाल सुरू केली.पुन्हा एकदा गप्पागोष्टी करत,

चेष्टा मस्करी करत ,एकमेकांवर कोट्या करत, त्याचसोबत निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आम्ही पुढे जात राहिलो.


जवळपास अर्ध्या तासाची

पायपीट केल्यानंतर ,

एका उंच अशा ठिकाणी आम्ही पोहोचलो.


तिथून खाली बघितल्यावर आम्हाला छोटेसे

नदीचे पात्र दिसले.


त्या पात्रामधून पाणी खळखळत वाहत होतं.आम्ही सर्वांनी

ते दृश्य डोळ्यात साठवून घेतले.

निसर्गरुपी चित्रकाराने रेखाटलेले ते सुंदर चित्र बघून आम्ही थक्क झालो. उंच टेकडावरून आम्ही खाली उतरलो.

वाहणाऱ्या पाण्याच्या

समांतर अशा पायवाटेने आम्ही काही अंतर चालत राहिलो आणि काही अंतर चालल्यानंतर आम्ही हत्तीडोह या आमच्या इच्छित स्थळी पोहोचलो. 


 नावाप्रमाणेच
हत्तीच्या आकाराचा तो डोह होता.म्हणूनच गावकऱ्यांनी ते नाव दिले असावे,याची आम्हाला प्रचीती आली.                             


 त्या डोहात दोन ते तीन माणसं खोल पाणी असल्याचे स्थानिक युवक मित्राने सांगितलं. अवतीभवती असणारा मनमोहक निसर्ग, सोबतच त्या डोहात पडणारं पांढरंशुभ्र धबधब्याचं पाणी आमचं मन मोहून घेत होतं. आम्ही सर्व पर्यटक मित्रांनी

स्वतःचे फोटो काढून तिथे

आमची हौस भागवून घेतली.


त्यानंतर

हत्तीडोहाचे विलोभनीय रूप डोळ्यांत साठवून घेतलं.

ते दृश्य पाहून आम्हाला धन्य झाल्यासारखं वाटलं. त्यानंतर आमच्या स्थानिक युवक मित्राने ,आम्हाला, तेथून जवळपास शंभर मीटर अंतरावर असलेल्या धबधब्याकडे नेले.आधी बघितलेल्या धबधब्यापेक्षा

अधिक सुंदर ,

मनमोहक असा धबधबा पाहून ,आम्हा  सर्व, घामाने ओले झालेल्या मित्रांना, धबधबा आंघोळीसाठी खुणावू लागला.


आम्ही

ताबडतोब

आमच्या अंतर्वस्त्रासह त्या धबधब्याखाली गेलो. धबधब्याखाली स्वतःला ओलंचिंब करून घेतलं.मनसोक्त भिजल्यानंतर व त्याचा मनमुराद

आनंद घेतल्यानंतर, धबधब्याच्या वर असणार्‍या ,छोट्याशा स्विमिंगपूलरुपी छोट्या डोहामध्ये आंघोळीचा पुन्हा एकदा मनसोक्त आनंद घेतला.


खूप मज्जा केली.यानंतर आपले वस्त्र  परिधान करून, मजल-दरमजल करत,पुन्हा एकदा रान -वाटा तुडवत व  आजूबाजूला असणाऱ्या  हिरवाईचा आनंद घेत आम्ही आगरगावला पोहोचलो.

तिथे आमच्या स्थानिक मित्राच्या घरी चहापाणी घेतल्यानंतर,आम्ही आमच्या बाईकने आमच्या गावाकडे  रवाना झालो.


गेल्या पंधरा वर्षात नियमित या मार्गाने जाऊन सुद्धा,एवढे सुंदर असं स्थळ आजपर्यंत आपण का बघितलं नाही? याची खंत आम्हा सर्वांना राहून-राहून वाटायला लागली. पण यापुढे दर पावसाळ्यात एकदा तरी हत्तीडोहाला नक्कीच भेट देऊ असा आम्ही प्रण केला.


धबधबा बघण्यासाठी आठशे ते हजार किलोमीटर अंतरावर, पुणे- मुंबई- महाबळेश्वर येथे
जाण्यापेक्षा आपल्या गावाजवळ असलेल्या हत्तीडोह सारख्या निसर्ग स्थळांचा शोध घेतल्यास ,स्थानिक आदिवासी युवक व ग्रामस्थांना उपजीविकेचे साधन मिळेल,शिवाय विदर्भातील दुर्लक्षित पण तितकेच सुंदर,देखणे,नयनरम्य ठिकाणं जगाच्या- पर्यटनाच्या नकाशावर येतील,यात तिळमात्र शंका नाही.


आमच्या आनंदयात्रेची काही    क्षणचित्रे..


२६ टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
    1. खूप सूंदर वर्णन.. अगदी डोळ्यासमोर निसर्गाचे सूंदर चित्र उभे राहिले. असेच आम्हाला नव नवीन पर्यटन स्थळांचा प्रवास तुमच्या सूंदर शब्दांकनातुन घडवत राहा. खूप शुभेच्छा

      हटवा
  2. अतिशय सुंदर प्रवासवर्णन. हत्तीडोह म्हणजे निसर्गाची विलक्षण आणि अद्भुत कलाकृती.

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय सुंदर असं शब्दांकन
    अप्रतिम प्रवासवर्णन
    शोभने सर तुमच्या सहवासात राहिल्याचा मला खरचं अभिमान वाटतो

    उत्तर द्याहटवा
  4. ग्लोकल मराठी ब्लॉग ची सुंदर अशी सुरुवात या लेखना द्वारे वाटत आहे। पुढे अशेच सुंदर लेख येतील हो आशा।

    उत्तर द्याहटवा
  5. माझ्या हिंगण्यातसुद्धा 'ब्रेअर ग्रिल्स' सारखे निसर्गप्रेमी, धाडसी आणि सौंदर्य शोधक आहेत आणि तेही शिक्षक याचा सार्थ भिमान वाटतो .
    फोटोग्राफी आणि अचूक शब्दबद्ध केलेले वर्णन कोणालाही प्रस्तुत स्थळी आकर्षित केल्याशिवाय राहणार नाही
    👌👌👌👍👍
    आपल्या नाविन्यपूर्ण ब्लॉग ला हार्दिक शुभेच्छा 💐🌹💐🌹💐🌹💐🌹

    उत्तर द्याहटवा
  6. जिवंत शब्दांकन, त्यामुळे जणूकाही मी सुद्धा तुम्हा सर्वांसोबत हत्तीडोह या निसर्गरम्य स्थळी होतो असंच जाणवलं. तुमची ही डिस्कवरी आवडली बरं का!👌👌

    उत्तर द्याहटवा
  7. कोणत्याही गोष्टीकरिता कंटाळा करणारा चंदू..तू नवीन ब्लॉग बनविला.आणि अपरिचित नैसर्गिक सौदर्याने ओतप्रत भरलेल्या स्थळाचे ओघवत्या शैलीत केलेले लेखन प्रेरणादायी वाटले.मनावरील साचलेली मानसिकरूपी धूळ स्वच्छ करून असाच लिहीत रहा. आम्ही वाचक म्हणून आस्वाद घेत राहू.

    उत्तर द्याहटवा
  8. कोणत्याही गोष्टीकरिता कंटाळा करणारा चंदू..तू नवीन ब्लॉग बनविला.आणि अपरिचित नैसर्गिक सौदर्याने ओतप्रत भरलेल्या स्थळाचे ओघवत्या शैलीत केलेले लेखन प्रेरणादायी वाटले.मनावरील साचलेली मानसिकरूपी धूळ स्वच्छ करून असाच लिहीत रहा. आम्ही वाचक म्हणून आस्वाद घेत राहू.

    उत्तर द्याहटवा
  9. व्वा मस्त निसर्गप्रेमी ने लावलेला शोध .व लेखन खूपच जोरदार आहे. सलाम तुम्हा सर्वांना

    उत्तर द्याहटवा
  10. जोरदार लेखन आणि लावलेला शोध . चित्रफिती एकदम झक्कास. सलाम तुम्हा सर्वांना.

    उत्तर द्याहटवा
  11. सर वाचतांना एवढा आंनद झाला तर जेव्हा हत्ती-हौद प्रत्यक्ष पहायला जाऊ तर काय आंनद येईल हे विचारात आणुनच मन प्रफुल्लित होत आहे

    उत्तर द्याहटवा

Best of glocal marathi

गनिमीकावा

        गनिमीकावा संकटे बहु येतील, हरणे तुला ठाव नाही.. कोंडीत सापडाया, गड्या तू कुणाचा साव नाही..!!     भेटतील सरडे,      पदोपदी तुला रे.. ...