सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

स्वदेस

 

Courtesy:Unsplash-Antoine-pluss-Msk

मित्रांनो,                   
एकेकाळी 'गाव'ही एक स्वतंत्र अशी व्यवस्था होती.ज्यात गावातील प्रत्येक घटक परस्परांवर अवलंबून असायचे.मात्र ब्रिटिशांचे दीर्घकाळ असलेले शासन व जागतिकीकरणाच्या रेट्याने ही व्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली. व गावातून माणसांचे लोंढेच्या लोंढे शहरांकडे रोजगारासाठी जाऊ लागले.यामुळे झालेले बरे-वाईट परिणाम, आज आपण अनुभवत आहोत.     
Courtesy:Unsplash-Sylvester- desouza

कामधंद्यानिमित्य,आपण आज, जगाच्या कोणत्याही भागात स्थायिक झालो असलो तरी,"गड्या,गाव आपुला बरा!"याची प्रचीती आल्यावाचून राहत नाही."आपली माती-आपली माणसं",नेहमी आपल्याला खुणावत असतात. असाच योग आम्हा मित्रांना आला.


आमचे ज्येष्ठ मित्र व मार्गदर्शक,यांचं गाव.. 'बिछवा'..,
या गावी जाण्याचा.नाव वाचून दचकून जाण्याचं कारण नाही.नाव 'बिछवा'असलं तरी, त्याचा साध्या सुईशीही संबंध नाही,  एवढं मात्र खरं!


नागपूर जिल्ह्यातील 
सावनेर तालुक्यात,खेकडानाला परिसरात, जंगलकपारीत वसलेलं हे टुमदार गाव.'खापा'गावानजीक असलेल्या 'बडेगाव'या गावापासून जेमतेम आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेलं.अगदी एम.पी.बॉर्डरच्या नजीक.

हिंगणा ते बिछवा'अंतर अंदाजे 75 किलोमीटर असल्याने, घरीच न्याहारी करून,आम्हा पाच मित्रांची टोळी,कारने सकाळी 9 वाजता, बिछव्याच्या वाटेने रवाना झाली.गाडीत जुन्या-नव्या गाण्यांचा,आस्वाद घेत, त्याचसोबत आमच्या ज्येष्ठ मित्राने 'स्टार मेकर'या ॲपवर स्वतः गायलेल्या सुमधुर गाण्यांच्या साथीने आमचा प्रवास सुरु झाला.                               

हिंगण्याहून 
वडधामना मार्गे,नागपूर -अमरावती हायवेवर,आम्ही अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात पोहचलोटोलनाका ओलांडल्यानंतर कळमेश्वर मार्गे 'मोहपा'शहराकडे जाणार्‍या रस्त्याने,रंगीबिरंगी फुलझाडांनी व विविध फळ झाडांनी नटलेल्या 'नर्सरींना'न्याहाळत व हिरवळीचा आनंद घेत,आम्ही मार्गक्रमण करीत होतो. काही मिनिटांनी आम्ही 'उबाळी'या गावी,

एका परिचिताच्या दुकानाजवळ थांबा घेतला. त्याने चहापाणी करून आमचे आदरातिथ्य केले. त्याच्याकडून आवश्यक साहित्य घेऊन व आमच्यासाठी काही संत्र्यांची व मोसंबीची रोपे नर्सरीतून आणून ठेवण्याचे त्याला सांगून,
आम्ही पुन्हा एकदा बिछव्याकडे वाटचाल करू लागलो.         

 
पुढे,'सावनेर','खापा'ही शहरे ओलांडत आम्ही 'बडेगाव'या गावी पोहोचलो. भूक लागली असल्याने कुठे नाश्त्याचे दुकान दिसते का? याचा शोध घेऊ लागलो. लागलीच एक नाश्त्याचं दुकान दिसलं.काय मिळतंय?म्हणून सहज विचारणा केली,तर तिथे गरमागरम समोसे आमच्या स्वागतासाठी हजर असल्याचे दिसले.आम्ही पाच पांडवांनी समोस्यांवर यथेच्छ ताव मारला.'बडेगाव' सारख्या दुरच्या गावी चाखलेल्या समोस्यांची चव काही औरच होती.ती कायम जिभेवर रेंगाळत राहणार, एवढे मात्र नक्की! नाष्ट्यानंतर,चहा प्यायचा असल्याने,त्या दुकानात विचारणा केली असता, समोस्यांचा खपच एवढा जास्त आहे की,त्याला चहा विकण्याची गरज वाटत नाही, असे दुकानदाराने सांगितले.मग त्यालाच चहाचे दुकान कुठे आहे?असे विचारले असता,दुकान बाजूलाच असल्याचे त्याने सांगितले. चहाच्या दुकानात चहाची ऑर्डर दिली.चहाच्या पहिल्याच घोटात तृप्त झाल्याचा आनंद मिळाला.नागपूर सारख्या शहरात अमृततुल्य चहाच्या नावाने सुरु झालेल्या बाजारूवृत्तीपेक्षा  बडेगावचा हा चहा कमी नाही असे राहून-राहून वाटले. बडेगावच्या अमृततुल्य चहाची किंमत केवळ पाच रुपये हाफ,अशी होती. 


                                 

 त्यानंतर पुढे,आम्ही बिछव्याच्या दिशेने रवाना झालो. मधे खेकडानाला परिसर असल्याने,तिकडे गाडी वळवली.रस्त्याने जाताना एमटीडीसी रिसॉर्ट,विविध ढाबे,हॉटेल्स, जणू आमच्या स्वागतासाठीच सज्ज असल्याचे जाणवले.डोंगर-दऱ्या,
आडवळणाच्या वाटा, पार करत आम्ही खेकडानाल्याजवळ पोहोचलो.खेकडानाल्याचे बॅकवॉटर आजूबाजूच्या गावांना पाणीदार करीत असल्याचे दिसून आले.

अतिशय नयनरम्य, वृक्षवेलींनी लगडलेला, हिरवाकंच, देखणा, असा हा परिसर.आम्हां हौशी फोटोग्राफरना फोटोसाठी आमंत्रित करू लागला. मग काय प्रत्येकजण एखाद्या फिल्मी नटाच्या भूमिकेत शिरला.       


मनसोक्त फोटोग्राफी केल्यानंतर 'बिछवा'या गावाकडे प्रवास सुरू झाला. अवघ्या काही मिनिटात आम्ही बिछव्याला पोहोचलो. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव, प्रत्येकाला त्याच्या गावाची, माणसांची,आठवण करून देत होतं.                         

 लगेच आम्ही 
गावाशेजारी असलेल्या आमच्या मित्राच्या शेतात गेलो. शेती कपाशीची होती.या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने व अवघ्या तीस वर्षानंतर पहिल्यांदा शेतीत पीक घेतल्याने,पऱ्हाटीची वाढ उत्तम झाली होती. पाचही जणांनी शिवाराला फेरी मारली.                                   

दरम्यान जुन्या-नव्या गाण्यांचा,आस्वाद घेणे सुरू होतेच. एवढ्यात धो-धो करत पावसाच्या सरी कोसळू लागल्या. आम्ही लगबगीने गाडीत बसलो.



पाऊस थांबल्यावर,आम्ही विठ्ठल-रखुमाईच्या मंदिराला भेट दिली.हे मंदिर १९६७ साली, बांधण्यात आल्याचे समजले.शिवाय, गावात या मंदिरात दरवर्षी मोठा सप्ताह आयोजित केला जातो,असे कळले.     

पुढे,मित्राच्या जुन्या घराला भेट दिली. तिथे कोणीच राहत नसल्याने घराची दुरावस्था झाली होती. घर अगदी मोडकळीला आले होते.मात्र, या वडिलोपार्जित वास्तूचा जीर्णोद्धार करणार असल्याचे आमच्या मित्राने आम्हाला सांगितले.

त्यानंतर गावातल्या एका परिचिताच्या घरी गेलो.त्याच्याकडे यापूर्वीच शेतातली ६.५ एचपी क्षमतेची मोटार आणून ठेवली होती. तिला पाईप जोडून विहिरीतून पाणी काढण्याचे प्रात्यक्षिक आम्हाला करावयाचे होते.


मात्र मोटार नवी असूनही काही केल्या सुरु होईना? आमचे अनेक प्रयत्न वाया गेले. नेहमीप्रमाणे गावात गर्दी जमली.प्रत्येकाने आपापले उपदेशाचे डोज पाजले.मात्र शेवटी, एका सभ्य गृहस्थाचा सल्ला कामी आला. एकदाची मोटार सुरू झाली.पण, ती पाणी काही बाहेर फेकेना? शेवटी,मोटार आहे त्या अवस्थेत ठेवून,दुसर्‍या दिवशी,बडेगावच्या मेकॅनिक कडून दुरुस्त करण्याचे निश्चित करून, आम्ही जवळपास रात्री सात वाजताच्या सुमारास आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो.



दरम्यान,भूक लागल्याने,'आपलं शिवार'या टुमदार, सुसज्ज अशा ढाब्यावर जेवणासाठी थांबलो.प्रत्येकाने,आवडीनुसार 'अंडाकरी''दाल-तडका' या व्यंजनांवर  मनसोक्त ताव मारून तृप्तीची ढेकर दिली. रस्त्यात पुन्हा एकदा 'बडेगाव'आमच्या स्वागतास हजर होतेच.तिथे रसरशीत मसाला पान खाल्ल्यानंतर,खरोखरचं,नावाप्रमाणे बडेगावात "बडेपणा"असल्याची जाणीव झाली. पुन्हा एकदा,' खापा -सावनेर' पार करत, 'उबाळी' येथे परिचिताकडे ठरल्याप्रमाणे थांबलो.नर्सरीतून आणलेल्या 'संत्र्याच्या-मोसंबीच्या' कलमा गाडीत ठेवल्या व रात्रीच्या काळोखात 'मंद-धुंद' गाण्यांचा आस्वाद घेत,हिंगण्याला कधी पोहोचलो, हे आमचे आम्हालाच कळलं नाही.                                
Courtesy:Unsplash-Provokar Pramanik

रात्री झोपी जाताना,या एका दिवसाच्या प्रवासाने काय मिळवलं? याचा क्षणभर विचार केला... तर जाणवलं..." आमची गावाशी,तिथल्या मातीशी,माणसांशी असलेली नाळ अधिकच घट्ट झाली होती.

१४ टिप्पण्या:

  1. उत्तम प्रवास वर्णन. भरीव शब्दांचा उपयोग. 👌👌👌👌🌹🌹🌹❤❤

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर प्रवासवर्णन. गावातील सर्वांगसुंदर अशा आठवणींना उजाळा देणारा हा कालचा प्रवास.

    उत्तर द्याहटवा
  3. Travelling is always joyful. Specially if it is to a remote and seclusive location. I have had a chance to be in this vicinity which you describe here. Marvelous and lucid travellers diary. Thanks for sharing your experiences.

    उत्तर द्याहटवा
  4. प्रवास माणसाला समृद्ध बनवीत असतो.आपल्या शाब्दिक प्रवासातून आम्हीही तृप्त झाल्याचा भास होत आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. प्रत्यक्ष गावला जाऊन येण्या चा अनुभव झाला सर!!!!!

    उत्तर द्याहटवा
  6. Nice journey...i also remember my journey to badegaon and khekadanala in 2010 after reading your journey.

    उत्तर द्याहटवा

Best of glocal marathi

गनिमीकावा

        गनिमीकावा संकटे बहु येतील, हरणे तुला ठाव नाही.. कोंडीत सापडाया, गड्या तू कुणाचा साव नाही..!!     भेटतील सरडे,      पदोपदी तुला रे.. ...