![]() |
Courtesy:Unsplash-Alka Jha |
मी उमेश,'देवळी' या गावचा.माझं गाव तसं जुनं.अगदी ब्रिटिश काळापासून त्यानंआपलंअस्तित्व व रूप जपलेलं.
नागपूरपासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असूनही शहरीकरणाचं वारं न लागलेलं.गावचा रस्ता म्हणाल तर वीस वर्षांपासून जसाचा तसा.त्यात तसूभरही सुधारणार नाही.किंबहुना दिवसेंदिवस त्याची अवस्था वाईट झालेली.गावची लोकसंख्या बरी असल्यामुळे व परिसरातील प्रमुख गाव असल्यामुळे गावाचे राजकीय महत्त्व फार जास्त. पण या राजकीय शक्तीचा गावाच्या विकासासाठी म्हणाल तर वापर शून्य.
महाराष्ट्रातील सर्वसाधारण गावासारखं 'देवळी' हे माझं गावं.
![]() |
Courtesy:Unsplash-Madhuvan Yadav |
गावाचं हेच रूप आजपर्यंत मी डोळ्यात साठवून होतो.कामानिमित्य बरीच वर्षे पुण्याला असल्यामुळे मी गावाला आलो नव्हतो. आज 'नागपूर-पुणे'सुपरफास्ट ट्रेनने नागपूरला पोहोचलो.रेल्वेस्टेशनच्या बाहेर येताच सायकल रिक्षाने बर्डी बसस्टॉपवर आलो.तेथून देवळी मार्गाने जाणाऱ्या बसमध्ये बसलो, तिकीट काढली.बस नागपूर शहराबाहेर येतांना,
मी नागपूरचं बदललेलं रूप पाहून थक्क झालो.
![]() |
Courtesy:Unsplash-Jani Godari |
"उगाच आपण इतकी वर्षे पुण्याला घालवली.", असं नकळत माझ्या मनात आलं. "देर आये दुरुस्त आये"असं मनाला सांत्वन देऊन, गाव येण्याची वाट बघू लागतो.
देवळीकडे जाणाऱ्या फाट्यावर बस थांबली.मी बसबाहेर उतरलो.तिथे ऑटोची वाट बघू लागलो.कारण या फाट्यावरून मला देवळीला जायचे होते. ऑटो निघायला उशीर होता. ऑटोचालक दहा-बारा सीट मिळाल्याशिवाय ऑटो पुढे नेणार नव्हता.म्हणून मी,पायीच गावचा रस्ता धरला. काही वेळ चालल्यानंतर,अचानक एक बाईकस्वार माझ्या बाजूला येऊन थांबला. "असेल कुणीतरी?"म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं.तो मात्र माझ्याकडे निरखून बघत होता.मी पुन्हा एकदा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण तो आता माझ्याशी नक्कीच बोलणार, असं मला त्याच्या चेहऱ्यावरून वाटलं. झालंही तसंच.तो म्हणाला,"उमेश ना तू ?"मी होकारार्थी मान डोलावली.मीही त्याची ओळख आठवू लागलो.
थोड्या वेळानंतर आठवलं,की तो गावात, माझ्या मित्राच्या घराशेजारी राहणारा, प्रकाश होता. त्याच्याकडे पाच-दहा एकर कोरडवाहू शेती होती, मात्र त्यातून फारसे उत्पन्न हाती येत नव्हते.म्हणून त्याची व त्याच्या कुटुंबीयांची सारी भिस्त दुधाच्या धंद्यावर होती.प्रकाशची ओळख पटल्यानंतर त्याच्याशी औपचारिक गप्पा केल्या.
"चल माझ्यासोबत,तुला सोडून देतो गावापर्यंत, रस्त्यात बोलणंही होईल." प्रकाश म्हणाला. मी लगेच तयार झालो व त्याच्या बाईकवर बसलो. "कुठुन येतआहेस तू ?","सध्या काय करतोस?", प्रकाशने मला विचारलं.हा प्रश्न तसा अपेक्षित होताच.मी म्हटलं,"मी पुण्याला एका खाजगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतो, झालेत आठ-नऊ वर्ष,गावाला थोडं काम होतं ,म्हणून इथे आलोय"."बरं आहे". प्रकाश म्हणाला. औपचारिकता म्हणून मी त्याला विचारलं ,"तू कुठे काम करतोस,प्रकाश?"त्यावर तो म्हणाला,
"मी नागपूरला कामाला जातो,परंतु मला वेळेचं काही बंधन नाही. पगाराचं म्हणशील,तर त्याची काही लिमिट नाही". प्रकाश म्हणाला. मला आश्चर्य वाटलं, की हा असं कोणतं काम करतो की याला वेळेचं व पगाराचं बंधन नाही?
अनलिमिटेड पगार देणारी कोणती नोकरी या सातवी नापास पोराला मिळाली? गाई-म्हशींच्या मागे फिरणारा हा, आज इतक्या मोठमोठ्या गोष्टी कशा काय करतोय? यासारखे अनेक प्रश्न माझ्या मनात पिंगा घालू लागलेे.उत्सुकतेपोटी मी त्याला आणखी विचारलं,"प्रकाश तरी किती हजार महिना पगार मिळतो तुला ?"प्रकाश म्हणाला,"कधी पंधरा ,कधी चाळीस हजार, कधी लाख रुपये महिना,माझी कमाई आहे".आता तर नक्कीच हा थापा मारतोय, असे मला वाटले.ठीक आहे, ऐकूया गाव येईपर्यंत याच्या थापा, आपलंही तेवढचं मनोरंजन.म्हणून मीही त्याच्या प्रत्येक गोष्टीला दुजोरा देऊ लागलो.
"उमेश तू किती कमावतो महिन्याला पगार?" अशी गुगली प्रकाशने टाकली.त्याच्या लाख रुपयांपुढे मी माझा पगार सांगणं,मला क्षणभर संकोचल्यासारखं वाटलं.'सातवी नापास लाखोंनी पैसा कमावतोय व आपण ग्रॅज्युएट असून, पंधरा हजारात घासतोय आठ वर्षापासून..'मन घट्ट करून त्याला सांगितलं,
"पंधरा हजार रुपये फक्त ,मिळतात मला महिन्याला". 'फक्त 'यासाठी ,कारण गावापासून सातशे-आठशे किलोमीटर अंतरावर राहून
हजारात कमावणारा मी व गावातच राहून लाखोंची कमाई करणारा प्रकाश,दोघांच्या कमाईत जमीन अस्मानाचा फरक होता. त्याच्या वागण्यात एक वेगळीच ऐट मला दिसत होती.श्रीमंती माणसाला आत्मविश्वास देत असते,पण तो नैतिक आत्मविश्वास नसून पैशांचा, क्षणिक आत्मविश्वास असतो,हे मला ठावूक होते.हाच आत्मविश्वास प्रकाशच्या ठाई मला दिसत होता.
"तुझा मित्र अजय,कुठे नोकरीला आहे ?त्याने इंजिनीअरिंग केलं होतं ना?" असा दुसरा प्रश्न प्रकाशने मला केला.हा इथेही अजयशी स्वतःची तुलना करणार,हे मला लगेच समजलं.
"अजय मुंबईला 'एशियन पेंट'या पेंट कंपनीत केमिकल इंजिनीयर आहे.कमावतोय साठ-सत्तर हजार रुपये महिन्याला".मी त्याला उत्तर दिलं ."फक्त साठ-सत्तर हजार !मग अजयही माझ्यापेक्षा कमीच कमावतोय की."प्रकाश म्हणाला."माझ्याकडे बघ.मी कसा प्रॉपर गावी राहून, मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत राहून, तुम्हा दोघांपेक्षा जास्त यशस्वी आयुष्य जगतोय,असे नाही का वाटत तुला?" पुन्हा एकदा प्रकाशने स्वतःचं गुणगान केलं.' पैसा म्हणजे यश. ज्याच्याजवळ जास्त पैसा ,तोच खरा यशस्वी. मध्यमवर्गीय व कष्टकरी मजूर हे तर या दुनियातले सर्वात अयशस्वी व निरुपयोगी जीव. नाही का?आपणही त्यातलेच. प्रकाश मात्र यांच्या पलीकडचा.असंच काहीसं, प्रकाशच्या 'भौतिकवादी'बोलल्याने ,काही क्षण माझं मत झालं. बालपणी शाळेत शिकलेली मूल्ये पाठ्यपुस्तकात बंदिस्त झालेली मला दिसली. हाच निकष सर्वांना लावला, तर महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस.. एवढेच नाही तर आजच्या काळातील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम.. यांच्यासारखे महान व्यक्ती यशस्वी कुठे ठरतात?? पैशानेच यश मोजायचे झाल्यास, बिल गेट्स,अंबानी, टाटा,बिर्ला.. एवढेच बोटावर मोजण्याइतके आजवरचे यशस्वी जीव.पण नाही, हे वास्तव नाही. 'जगात यशस्वी होणे म्हणजे सुखी-समाधानी आयुष्य जगणं.' मग खरचं, प्रकाश सुखी, समाधानी आयुष्य जगतोय का ??जरा डोकावून पाहायलाच हवं, नाहीतर त्याच्याशी तुलना करून मला माझं आयुष्यचं निरुपयोगी व टाकाऊ वाटायचं.
म्हणून मी प्रकाशच्या खासगी आयुष्याची सखोल चौकशी करण्याचे ठरवले.
![]() |
Courtesy:Unsplash-Deepak Kumar |
मी प्रकाशला म्हटलं ,"प्रकाश,तू नागपुरला व गावाला नेमकं कोणतं काम करतोस?", त्यावर प्रकाश म्हणाला,"मी प्रॉपर्टी एजंट आहे. साध्या शब्दात सांगायचं झाल्यास, मी एक दलाल आहे.मिहानमुळे आपल्या गावातील जमिनींचे भाव गगनाला भिडले .मोठमोठाल्या शहरातील 'पार्ट्या',(श्रीमंत लोकं) आपल्या गावातील जमिनीत गुंतवणूक करायला उत्सुक होत्या.
मी फक्त आपल्या गावातील शेतकर्यांना,त्यांची शेती बड्या पार्ट्यांना विकायला प्रवृत्त केलं.
जमिनीला 'वीस ते पन्नास लाख रुपये एकर 'या दरम्यान किंमत मिळवून दिली.दोन्ही पक्षांकडून 2% ने मला कमिशन मिळालं. यात मी लाखोंची कमाई केली व अजूनही करीत आहे.गावातील कास्तकारही खुश आहेत.कोरडवाहू जमिनीत राब-राब राबून,पुरेसं उत्पन्न न देणाऱ्या जमिनीला,लाखोंचा भाव मिळाल्यामुळे,
ते धडाधड शेती विकत आहेत. यात माझ्यासारख्या दलालांना भरपूर पैसा मिळाला. मी माझी शेतीही अशीच विकली. वर्धा जिल्ह्यात वीस एकर ओलिताची शेती त्याच पैशात घेतली. बघ ,मला तरी निदान यात तोटा दिसत नाही. माझ्याकडे बघून आजूबाजूच्या इतर शेतकऱ्यांनी, मला शेती विकून देण्यासाठी आग्रह धरला.मी माझी शेती ज्या पार्टीला विकली,त्याच पार्टीकडे शेतकऱ्यांच्या शेतीचा सौदा केला.शेतकऱ्यांना बक्कळ पैसा मिळवून दिला व मीसुद्धा लाखोंची कमाई केली.यात वावगे ते काय? मला सांग." प्रकाशला मी उगाचच म्हटलं ,"काहीच नाही.अजिबात वावगं नाही." "तर बरं ,सर्व शेतकऱ्यांनी असं केलं नाही.काही बसलेत आपल्या मातीला चिकटून. तूच बघ, आज त्यांची दशा काय आहे ?त्यांना दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण आहे आणि शेती विकलेले बघ,कसे बंगल्यासारखा घरात राहत आहेत.फोर व्हीलर, मोबाईल, टीव्ही, फ्रिज ई.सर्व चैनीच्या वस्तू त्यांच्याकडे आहेत. काम काहीच करीत नाहीत .मस्त मौज करीत आहेत. दररोज ते तुला बियरबार नाहीतर ढाब्यावर नक्कीच भेटतील. त्यांची मुलेही सीबीएसई शाळेत शिकत आहेत. सर्व काही आलबेल आहे. ते सोड, माझ्याकडे बघ काय होते? गाई-म्हशींच्या मागे हिंडायचो.आज,दोन फोर- व्हीलर,मोठं घर,वर्धा जिल्ह्यात 20 एकर ओलिताची शेती लाखोंचा बँक बॅलन्स, सर्वकाही आहे .ही सगळी मिहानची कृपा म्हणायची."प्रकाश म्हणाला. "आपल्या गावासाठी 'मिहान' म्हणजे चमत्कारच म्हणायला पाहिजे .जादूची कांडी फिरवावी तसा बदल यामुळे आपल्या गावात झाला. याआधी,दोन-चार तुमच्या सारखी पोरं, शिकून नोकरीवर लागायची.बाकीचे आपलं संपूर्ण आयुष्य शेतात राबत घालवायचे.खरचं, हा न्याय होता का ?"प्रकाश म्हणाला.
मी निमुटपणे त्याचे शब्द कानात साठवत होतो.
'जगात बेकायदेशीर काम करूनआत्मविश्वासाने जगणारे कमी नाहीत. आपल्या पापांचं,एवढं उघड प्रदर्शन करणं,त्यांना जमत तरी कसं ?आम्हाला तर आमच्या खऱ्या गोष्टींचेही समर्थन करणे जमत नाही. पुन्हा एकदा आपण सर्वसामान्य असल्याची मला जाणीव झाली. पण असेही लोकं सामान्य असतात ना?मग ते असामान्य असल्याचा आव, थोडे पैसे आल्यानंतर का आणतात?? मानव हा दानव कसा होतो? हे त्याचे त्यालाच कळत नाही.पैसा संवेदनांना मारून टाकतो.हे मला प्रकर्षाने जाणवू लागले.मिहानचे कित्येक राजकीय पक्षांनी व त्यांच्या पुढाऱ्यांनी भांडवल केले.मात्र आजतागायत मिहान प्रकल्प पूर्ण झाला नाही.तिकडे मात्र मिहानचे भूत, खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेले मला दिसले.
![]() |
Courtesy:Unsplash-Femker Ongena |
गावाजवळची जमीन
दलालांनी 'बिल्डर व लँड डेव्हलपर्स'यांच्या घशात ओतली. शेतकरी लाखो रुपये घेऊन खूश झाले. काही लुबाडले गेले, काही नागवले गेले,काही सुखी झाले, काही दुःखी झाले. ही सारी प्रॉपर्टी एजंट व बड्या पार्ट्यांची,तसेच मिहानची कृपा.कोणाच्या शेतीला वीस लाख रुपये, कुणाच्या तीस लाख,तर कुणाच्या शेतीला चाळीस लाख रुपये एकरी,असा भाव मिळाला.आपल्या शेजारच्या शेतकऱ्यांपेक्षा आपल्या शेतीला कमी भाव मिळाला म्हणून काहीजण पश्चाताप करू लागले .जास्त भाव मिळालेले,आणखी जास्त भाव मिळाला नाही म्हणून आणखी पश्चाताप करू लागले .शेवटी काय,सारेच अतृप्त.मिहानने, गावातील काही बेरोजगारांना एजंट बनवून श्रीमंत केलं. त्यांच्याजवळ सर्व चैनीच्या वस्तू आल्या .
त्यांनी आपल्या गावातील,आपल्याच नात्यातील- मैत्रीतील- संबंधातील ,लोकांना लुबाडले ,लुटले, एवढेच नाही तर,अक्षरशः ओरबडले. त्यांनी शहरातील लँड डेव्हलपर्सना यासाठी मोलाची मदत केली. असे दलाल,पैसा म्हणजे यश, पैसा म्हणजे सुख, पैसा म्हणजे समाधान,मानू लागले .प्रत्येकाशी आपल्या पैशाने तुलना करू लागले. वरकरणी सुखी दिसणारे मात्र आतून अतृप्तच राहिले. प्रकाशही या साखळीतला एक .मिहानने त्याला भरभरून दिलं, पण त्याने पोशिंद्या शेतकऱ्याला देशोधडीला लावलं. मिहान,हे विदर्भासाठी वरदान आहे की माहीत नाही मात्र ही पैशाची तहान आहे, हे मला प्रकाशकडे पाहून वाटलं .
अश्यात,गाव आलं,मी प्रकाशला गाडी थांबवायला लावली.
"अरे,थांब,थांब.माझं घर आलं",असे म्हणून मी खाली उतरलो .
"बरं मी निघतो आता. मला रामभाऊकडे जायचं आहे .तो शेती विकायची आहे ,असे म्हणत होता." प्रकाश म्हणाला."अरे ,घरीतरी ये."मी त्याला म्हटलं .
"नाही ,पुन्हा कधी येईल." असं म्हणून ,
तो रामभाऊला भेटायला निघून गेला .
![]() |
Courtesy:Unsplash-Jordan Opel |
दहा-बारा दिवसानंतर...,
आज मी पुण्याला परत जाणार होतो.
गावातलं काम झालं होतं. बसस्टॉपवर बसची वाट बघत उभा होतो.
तेवढ्यात,दुरून ,प्रकाश येतांना दिसला .
मी दिसताच, तो माझ्याकडे आला." पुण्याला जातोय वाटतं." मी ,"हो "म्हटलं .
"बरं ,जमल्यास ये पुन्हा गावाला". प्रकाश म्हणाला .
"आता मी घाईत आहे.मला रामभाऊच्या शेतीचा सौदा करायला जायचा आहे .पार्टी वाट बघत आहे.येतो ,भेटू पुन्हा"असं म्हणत प्रकाशने मला निरोप दिला.
त्याचं बोलणं ऐकून
मी काही वेळेसाठी बेचैन झालो ."आज पुन्हा एकदा
एक शेतकरी फसविला जाणार..!"...
"रामभाऊचा व त्याच्यासारख्या शेतकऱ्यांचा मिहानने खरंच विकास झाला का??"हा प्रश्न मात्र आजतागायत अनुत्तरीत आहे....??
भयानक वास्तव... मुळशी पैटर्न व्हायला वेळ लागणार नाही. अति संवेदनशील विषय
उत्तर द्याहटवाThanks
उत्तर द्याहटवावास्तववादी हृदयस्पर्शी लेखन
उत्तर द्याहटवा👌👌👌👌
Thanks
उत्तर द्याहटवासद्यस्तिथीची जाणीव करून देणारं लेखन
उत्तर द्याहटवाThanks
हटवाचिंतनीय,,,, याला विकास म्हणावं की भकास? साऱ्या जगाचा पोशिंदा अद्यापही "अच्छे दिन"च्या प्रतिक्षेत. खरंच अंतर्मुख करणार लेखन.
उत्तर द्याहटवाThanks
उत्तर द्याहटवासत्य परिस्थीची जाण करुण देणारा विषय आज याच कारणामुळे नागपुरात घर बाँधु इच्छिणाऱ्याना प्लॉट सुद्धा घेणे अशक्य झाले आहे. नक्कीच एक भयानक तत्थ्य माँडलेले आहे सर आपण
उत्तर द्याहटवाWhole Dewali(pendari) village is shifting to zilpi side....
उत्तर द्याहटवा